
वेगवान नाशिक/Wegwan Nashik :-
विशेष प्रतिनिधी :- आज स्वातंत्र्याला 77 वर्ष पूर्ण झाली आहेत. या काळात आधुनिकतेची कास धरत देशात प्रगती झाली असली तरी आजही रुढी, प्रथा आणि परंपरा ह्या कायम आहेत. शिवाय संपूर्ण नागरिक हे अंधश्रद्धेतून पूर्णत: बाहेर पडले आहेत असेही नाही. त्याचे कारण नाशिक जिल्ह्यातील दाढेगांव येथे घडलेला प्रकार, या गावच्या स्मशानभूमीत कोणीतरी अज्ञातांनी अघोरी पूजा मांडली आणि ती पाहून ग्रामस्थांमध्ये घाबरगुंडी उडाली.
नेमका प्रकार काय घडला?
नाशिक शहरापासून ८ किमी असलेल्या दाढेगांव या गावालगतच वालदेवी नदी किनारी स्मशानभूमी आहे. अंदाजे मंगळवारी मध्यरात्री या स्मशानभूमीच्या प्रेत जाळण्याच्या जागेवर अज्ञात व्यक्तींकडून अघोरी पूजा मांडण्यात आली आहे . याठिकाणी हळद, कुंकू, हिरव्या बांगड्यांचा चुडा, नारळ, धोतरा सारखा पांढरा कपडा ठेवण्यात आला आहे .आज सकाळी सामाजिक कार्यकर्ते सागर भालके यांच्या हा प्रकार निदर्शनास आला . नेमका प्रकार काय हे समजू शकले नसले तरी या अघोऱ्या पूजेमुळे वातावरण बिघडले आहे.
गावात तर्क-वितर्क, चर्चेला उधाण
स्मशानभूमित अशा प्रकारची पूजा म्हणजे हा जादूटोणा आणि गुप्तधनाचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र ही अघोरी पूजा केली कुणी ? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र, दाढेगांव ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्मशानभूमी शेजारीच मागील काही दिवसांपूर्वी गावातील शेतकरी दिलीप सोनवणे यांनी वालदेवी नदीवर बसविलेला पाण्याचा मोटार पंप अज्ञात इसमांनी चोरुन नेला आहे. या ठिकाणी चोरीच्या घटना तसेच अघोरी प्रकार होत आहे. या प्रकाराची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेऊन या गावात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सागर भालके, समाधान जाधव, रोहिदास डेमसे, आदि ग्रामस्थांनी केली आहे.
