महाराष्ट्रात या ठिकाणी होणार लष्करासाठी खुली भरती
पात्र उमेदवारांना मिळणार देशसेवेची संधी
वेगवान नाशिक/Wegawan Nashik-
मुंबई, दि.२४ ऑक्टोबर, – लष्कराच्या टीए बटालियनची खुली भरती प्रक्रिया हि कोरोना काळापासून बंदच होती. मात्र नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून महाराष्ट्रासह अन्य सात राज्यातील तरुणांना खुल्या भरतीद्वारे लष्करात देशसेवेची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबत १२ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेल्या रोजगार समाचार मार्फत आधीच जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
येथील ११६ टीए पॅरा बटालियनसह ११८ टीए, १२३ टीए (ग्रॅनेडियर्स) या तिन्ही इन्फ्रट्री बटालियनमध्ये ८१ सोल्जर व ५७ ट्रेडमनच्या पदांसाठी सोमवार ४ ते शनिवार दि. १६ नोव्हेंबर दरम्यान एकत्रित खुली भरतीप्रक्रिया येथील आनंद रोड मैदानासह टीए बटालियनमध्ये तब्बल १२ दिवस राबविली जाणार आहे.
यादरम्यान सोमवार दि.४ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राबाहेरील तेलंगणा, गुजरात, गोवा, दादरा-नगर हवेली, दीव-दमण, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी मधील उमेदवार,मंगळवार दि. ५ रोजी आंध्र प्रदेश, बुधवार दि. ६ रोजी तामिळनाडू व केरळ, गुरूवार दि. ७ रोजी कर्नाटक, शुक्रवार दि. ८ व ९ रोजी राजस्थान (जिल्हानिहाय), तर रविवार दि. १० ते मंगळवार दि. १२ रोजी दरम्यान महाराष्ट्रातील जिल्हानिहाय उमेदवारांच्या निवड चाचण्या होणार आहे.
बुधवार दि.१३ ते शनिवार दि.१६ नोव्हेंबर दरम्यान कागदपत्रे तपासणी, ट्रेड टेस्ट, मेडिकल टेस्ट पात्र उमेदवारांच्या अन्य समस्यांसाठी तीन दिवस राखीव ठेवण्यात आले आहे.
या सरळ भरतीद्वारे ८१ सोल्जर (जनरल ड्युटी )तर ५७ जागांसाठी ट्रेडमन पदाच्या भरती होणार असून यामध्ये शेफ (कुक), हेअर ड्रेसर, हाऊसकिपर, वॉशरमॅन, क्लर्क अशा जागा असतील. पात्र उमेदवारांनी आधीच जाहीर केल्यानुसार आपल्या राज्य व जिल्ह्यानुसार होणाऱ्या तारखेला पहाटे ६ वा. मैदानावर हजर होणे अनिवार्य आहे.