वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभेच्या उमेदवारांची घोषणा नाशिक मधील दोन उमेदवारांची नावे जाहीर
अविनाश शिंदे यांना देवळालीत तर भाऊराव डगळे करणार 'वंचित'ची उमेदवारी
वेगवान नाशिक/WEGWAN NASHIK –
१७ ऑक्टोबर,विशेष प्रतिनिधी :-
राज्यात विधानसभा निवडकीचे वारे वाहायला लागले आहे. त्यात महायुती व महाविकास आघाडी आपापल्या उमेदवारांची चाचपणी करत असताना डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्याभरातील विविध मतदार संघातील ३० उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात नाशिक जिल्ह्यातील देवळाली मतदारसंघातून नाशिकचे महानगराध्यक्ष अविनाश शिंदे तर इगतपुरी येथून भाऊराव डगळे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करून या निर्णयाचे स्वागत केले.
देवळालीतील उमेदवार यांच्या समर्थकांनी ‘अविनाश शिंदे आगे बढो-हम तुम्हारे साथ है ‘, ‘प्रकाश आंबेडकर यांचा विजय असो ‘ ,’ वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ‘ आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे. पक्षाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी एका सच्चा कार्यकर्त्याला न्याय दिल्याचा सूर कार्यकर्ते आणि सामान्यांमध्ये उमटला आहे.अविनाश शिंदे हे पक्षाचे खणखणीत नाणे असून त्यांच्यात निवडून येण्याची क्षमता आहे.सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.सर्वांशी मिळून मिसळून वागणे,गरजूंच्या मदतीला धावून जाणे आणि अफाट जनसंपर्क असलेला नेता नव्हे तर हाडाचा कार्यकर्ता म्हणजे अविनाश शिंदे हे समीकरणात जणू रूढ झाले आहे आणि म्हणूनच पक्षाने त्यांची उमेदवारी जाहीर करून एका हाडाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.प्रथितयश बांधकाम व्यावसायिक,धुरंदर राजकारणी आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे. देवळाली मतदारसंघातील जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना निश्चितच विजयी करतील विश्वास व्यक्त केला जात आहे.
आरपीआयचा शाखाध्यक्ष म्हणून त्यांचा राजकारणात शिरकाव झाला.परंतु लोकांचे प्रश्न सोडविण्याची तत्परता आणि दांडगा जनसंपर्क तसेच उत्कृष्ट वक्तृत्व शैलीच्या जोरावर त्यांचा जम बसला.आरपीआय नंतर भारिप आणि आता डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीचे महानगराध्यक्ष म्हणून गेल्या सहा वर्षांपासून ते सक्षमपणे धुरा सांभाळत आहेत.त्यांच्यामुळे वंचित बहुजन आघाडीत येण्याचा लोकांचा ओघ वाढत असून एक कुशल संघटक व उत्कृष्ट प्रशासक म्हणून ते सर्वांना परिचित झाले आहेत. नाशिक महानगरात वंचित बहुजन आघाडीचा मोठा विस्तार झाला आहे त्याचे खरे श्रेय अविनाश शिंदे यांनाच जाते.राजकारणाबरोबरच समाजकारणातही शिंदे यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. कार्यकर्तृत्वाच्या जोरावरच त्यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे देवळाली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली होती.सूक्ष्म नियोजन आखून त्यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या. समस्याही जाणून घेतल्या आहेत. ते जेथे जातात तेथे त्यांचे होत असलेले उत्स्फूर्त स्वागत बघून मतदार संघात ते किती लोकप्रिय आहेत याची साक्ष पटते.
‘पक्षाचा विश्वास सार्थ ठरवणार’
पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला त्याला मी कदापि तडा जाऊ देणार नाही.देवळाली मतदारसंघ हा आंबेडकरी विचारांचा मतदारसंघ आहे.यावेळी या मतदारसंघात मतदारांना क्रांती घडवायची असून ते वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.- अविनाश शिंदे,उमेदवार,देवळाली मतदार संघ