नाशिक जिल्हात लोकांना चुना लावणारा पोलीसांच्या जाळ्यात

वेगवान नाशिक/सागर मोर
वणी – आदिवासींचे आर्थिक शोषण करुन अमिष दाखवुन ठकबाजीचा गुन्हा दाखल असलेल्या फरार संशयीत संदिप अवधुत याला अभोणा पोलिसांनी दिंडोरी पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाईत जेरबंद केले.
अभोणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुकापुर येथील आदिवासी शेतकरी सुभाष सोमा बागुल याना शेतजमीनीच्या वारस नोंदिचे अमिष दाखवुन दिड लाख रुपयांना कथित तोतया पत्रकार संदिप भिकाजी अवधुत रा.दत्तनगर कसबे वणी ,ता,दिंडोरी याने फसवणुक केल्याच्या तक्रारीनंतर सखोल चौकशी अंती सपोनी यशवंत शिंदे यांनी अवधुत याचे विरोधात ठकबाजीचा गुन्हा दाखल केला होता.अटक टाळण्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालयात अटकपुर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
तो फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात अटक पुर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.तो न्यायालयाने 4 सप्टेंबर 2024 रोजी फेटाळला होता.त्यानंतर संदिप अवधुत हा फरार झाला होता.तब्बल 44 दिवसानंतर फरार असलेला संदिप अवधुत हा दिंडोरी तहसील कार्यालय येथे असल्याची गोपनीय खात्रीशीर माहीती अभोणा पोलिसांना मिळाली,अभोणा पोलिसांनी ही माहीती व अवधुतयाचे तपशीलवार वर्णन दिंडोरी पोलिसांना दिले
त्याचक्षणी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर दिंडोरी पोलिसांनी झडप घालुन अवधुत याच्या मुसक्या आवळुन अभोणा पोलिसांच्या ताब्यात दिले.दरम्यान अवधुत याचे विरोधात वणी पोलिस ठाण्यात आदिवासी शेताकर्याला ट्रक्टर आदिवासी विकास भवनातुन अनुदानातुन कमी किमतीत घेऊन देतो असे अमिष दाखवुन 91,500 रुपयांचे आर्थिक शोषण केल्याचाही गुन्हा दाखल असुन वणी पोलिसही त्याचा शोध घेत होते.याबरोबर अभोणा व सुरगाणा पोलिस ठाण्यात त्याचे विरोधात फसवणुकीच्या तक्रारी प्रलंबित आहेत
यापुर्वी वणी पोलिस ठाण्यात त्याचे विरोधात बनावटीकरण व फसवणुक व अॕट्रासिटी असे दोन गुन्हे दाखल आहेत,आजपावेतो एकुण चार गुन्हे दाखल असलेल्या अवधुतचा शोध पोलिस गेल्या अनेक दिवसांपासुन घेत होते,अखेर दिंडोरी तहसील कार्यालयाच्या गेटवर संयुक्त कारवाईत त्यास जेरबंद करण्यात आले.अवधुत याने परीसरात विविध अमिष दाखवुन अनेकांना चुना लावल्याच्या चर्चा असुन अभोणा पोलिसांनी सखोल चौकशी करुन कडक कारवाई करण्याची मागणी त्रस्त पिडीत यांनी केली आहे.
