मोठ्या बातम्या
नाशिक जिल्ह्यात प्रवाशांनी भरलेल्या बसला कट मारल्याने बस उतरली खाली !

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : विंचूर प्रकाशा राष्ट्रीय महामार्गवरील भावडबारी घाट परिसरात एसटी बसला अज्ञात वाहनाने कट मारल्याने अपघात झाला. या मध्ये बस संपूर्ण गर्दीने भरलेली होती. याच वेळी हा अपघात झाल्यामुळे सर्वच प्रवाशी यामुळे भयभीत झाले. बस चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या कडेला उतरवल्याने सुदैवाने पुढील अनर्थ टळला.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, बुधवार दि. २ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास विंचूर-प्रकाशा राष्ट्रीय महामार्ग वरील देवळा येथील भावडबारी घाट परिसरातील जिओ पेट्रोल पंप नजीक सटाणा आगाराची बस (क्रमांक एम. एच. २० बी. एल. ३९१६) देवळ्याच्या दिशेने येत असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने बसला कट मारला.
यावेळी बस चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेच्या साईट पट्ट्यावर आणून उभी केल्याने पुढील अनर्थ टाळला. यावेळी बस प्रवाशांची खच्चून भरली होती.
विंचूर प्रकाशा राष्ट्रीय महामार्ग (क्र.७५२ जी) चे काम गेल्या अनेक महिन्यापासून रखडले आहे. त्यात भावडबारी घाट ते रामेश्वर फाटा परिसरातील रस्त्याचे एका बाजूने काम झाले असून दुसऱ्या बाजूचे काम रखडले आहे.
यामुळे येथे एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. दरम्यान या ठिकाणी वारंवार छोटे मोठे अपघात होत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी केली आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, वेगवान न्यूज, कसमादे मीडिया, माय महानगर, नाशिक सिटी न्युज, जागर जनस्थान, इंडिया दर्पण, बी.टी.एल. न्यूज मराठी इत्यादी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. मुख्यतः राजकारण, शेती, क्राईम, विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.