हो, वडाच्या झाडावर रात्री भूत असतेच
आदिवासी भागातील अनेक विद्यार्थ्यांचा आजही भूतकल्पनेवर ठाम विश्वास

वेगवान नाशिक/Wegwan Nashik
विशेष प्रतिनिधी दि.१२ सप्टेंबर हो सर, गावाबाहेरील वड ,चिंच, पिंपळ अशा मोठ्या झाडांवर भूत असतेच आणि ते अमावस्या- पौर्णिमेच्या रात्री खाली उतरते . त्यावेळी त्याला जी व्यक्ती सापडेल त्याला ते धरते, पछाडते, असे त्रंबकेश्वर तालुक्यातील मुळेगावच्या शाळेतील काही विद्यार्थी- विद्यार्थीनींनी महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. गोराणे यांच्याशी संवाद साधताना खात्रीने सांगितले. आजही त्यांचा भूत कल्पनेवर ठाम विश्वास असल्याचे दिसून आले.
याला उत्तर देताना डॉ. गोराणे म्हणाले की, जगात भूत नसतेच. या सर्व काल्पनिक आणि सांगावांगीच्या गोष्टी असतात. भूत असते आणि ते माणसाला पछाडते असा चुकीचा संस्कार, समज आपल्याकडे लहानपणापासूनच झाल्यामुळे आयुष्यभर आपल्या मनात हे भूत ठाण मांडून बसते. मात्र जर कुणाला भूत आहे ,अशी खात्री असेल तर त्यांनी भुताचा फोटो काढून दाखविल्यास त्या व्यक्तीला महाराष्ट्र अंनिसचे एकविस लाख रुपयांचे पारितोषिक मिळेल.
ते पुढे असे म्हणाले की, भूत असल्याची शहानिशा करण्यासाठी कोणत्याही अमावस्या किंवा पौर्णिमेच्या रात्री अंनिसचे कार्यकर्ते त्या वड, पिंपळ किंवा चिंचेच्या झाडाखाली रात्रभर मुक्कामाला राहतील. तुमच्यापैकीही कोणी येऊ इच्छित असेल तर जरूर या.त्यावर कोणीही मुक्कामाला सोबत येण्यास तयार झाले नाही.
अनेक विद्यार्थ्यांच्या गळ्यात किंवा दंडामध्ये रंगीबेरंगी गंडेदोरे , तावित बांधलेले दिसले. त्या मागील कारणांचा शोध घेतला असता असे समजले की कोणत्याही लहान मोठ्या आजारपणात आई-वडील मुलामुलींना भगताकडे घेऊन जातात. दैवी उपाय म्हणून भगत मंतरलेले गंडेदोरे ,तावित गळ्यात किंवा दंडात बांधण्यासाठी देतात.
म्हणून आज संध्याकाळी घरी गेल्यावर आपल्या आई-वडिलांना हे समजावून सांगा की गंडेदोरे तावीत बांधल्याने कोणताही आजार बरा होणार नाही. सकस, शुद्ध ,समतोल आहार सेवन केल्याने आजारपण येणार नाही आणि जर आजारपण आलेच तर डॉक्टरांकडे जा. भगताकडे चुकूनही जाऊ नका.
गळ्यातले आणि दंडातले गंडेदोरे ,तावित काढण्यासाठी आई-वडिलांना विनंती करा, असे आवाहनही डॉ. गोराणे यांनी विद्यार्थ्यांना केले. तेव्हा तसे करण्यास अनेक विद्यार्थ्यांनी अनुकूलता दर्शविली.
कोणत्याही आजारपणावर अंधश्रद्धायुक्त दैवी तोडगे,उपाय करण्याऐवजी आपल्या मुला-मुलींना तत्काळ दवाखान्यात घेऊन जावे, असे पालक शिक्षक सभेमध्ये शिक्षकांनी पालकांना समजावून सांगावे, असे डॉ. गोराणे यांनी शिक्षकांनाही आवाहन केले.
वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती व प्रयोग या पाच पायऱ्यांद्वारे कोणत्याही घटनेमागील सत्य कसे शोधता येते, पडताळता येते याबद्दल डॉ .गोराणे यांनी काही चमत्कार प्रात्यक्षिके सादर केली .त्यामध्ये विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले .
त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील अंधश्रद्धा दूर होऊन, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजण्यासाठी मोठी मदत झाली, असा विश्वास शिक्षकांनी व्यक्त केला. सर्व पालकांसाठीही अशा प्रकारचा कार्यक्रम घेण्याचे ही ठरले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब कानडे, अंनिसचे कार्यकर्ते मारुती नेटावटे, उपशिक्षक योगेश गोसावी, नंदू बागुल बाळासाहेब पावडे, काकासाहेब कवडे, सचिन कोकाटे, रामेश्वर शेंडगे, सोनाली परदेशी, अनिल खैरनार व काही पालक उपस्थित होते.
