
वेगवान नाशिक/ Wegwan Nashik. १० सप्टेंबर./ विशेष प्रतिनिधी.-
विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनापाठोपाठ येणाऱ्या ज्येष्ठा-कनिष्ठा, महालक्ष्मी-गौरी, सखी-पार्वती अशा जोडीने त्यांना घरात आणण्याची पद्धत आहे. लाकडी, पितळी सांगाडे त्यांना आकर्षक रंगाच्या साड्या नेसवून साजश्रृंगार केला जातो.
या गौराईंच्या प्रतीक्षा संपली असून आज . ‘ये गं गौराई ये’…’आली का गौराई… आले गं बाई, कशाच्या पायी… हळदी-कुंकवाच्या पायी ‘ असं म्हणत झिम्मा फुगडीच्या तालात आज दिवसभर मुहूर्त असल्याने थाटामाटात गौराईचे आगमन घरोघरी करण्यात आले आहे.
गौराईचे घरात आगमन करण्यासाठी महिलांमध्ये कमालीचा उत्साह आहे. प्रथेनुसार गौराईंना घरात आणताना, जिच्या हातात गौरी असतात त्या महिलेचे पाय दुधाने व पाण्याने धुऊन त्यावर कुंकवाचे स्वस्तिक काढले जाते. घराच्या दरवाजापासून ते गौरी बसवायच्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत गौरीचे मुखवटे आणले जातात. गौरीच्या पूजनानंतर पारंपरिक पद्धतीने नैवेद्य दाखविण्यात येतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी गौरी, महालक्ष्मी पूजा-आरती करून केलेल्या फराळाचा नैवेद्य दाखविला जातो, तर महानैवेद्यासाठी पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबिल, अंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ पदार्थांचा नैवेद्य केला जातो. आज आगमन, दुसऱ्या दिवशी पूजा हळदी कुंकवाचा कार्यक्रम, तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते.आज गौराईच्या नैवेद्याला मिक्स पालेभाजी, भाकरी आणि पाटवडी असा नैवेद्य दाखवला. गौरी आवाहनाचा मुहूर्त मंगळवारी सकाळी सूर्योदयापासून सायंकाळी ६ वाजून २७ मिनिटांपर्यंत शुभमुहूर्त आहे तर दुपारी ३ ते ४.३० या वेळेत राहू काळ आहे. शुभ मुहूर्त काळात ज्यांच्या घरी गौराई येतात त्यांनी करून घेतले गौरी आगमन करून घेतले.
शिवाच्या शक्तीचे आणि श्रीगणेशाच्या आईचे रुप म्हणून ओळखले जाणाऱ्या गौराई मातेचे अर्थात गौरीचे आगमन हा एक सोहळाच असतो. विविध गाणी म्हणत गौराईचा घरात प्रवेश करण्यात येऊन गौरी सजवून उभ्या केल्या गेल्या.
गौरी पूजनादिवशी सुहासिनी ओटी भरणार आहेत, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी किंवा सप्तमी तिथीला गौरीचे आगमन होते. यंदा हे आगमन आज मंगळवारी होत आहे. हिंदू पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी मंगळवार रात्री ६ वा.२७ मि.पर्यत आहे. त्यामुळे तिथीनूसार गौराईचे आगमन आज थाटामाटात सुरू आहे.
