नाशिक ग्रामीण
इमानदारीने पैसे परत करणाऱ्या त्या शेतकरी बांधवांना केले सन्मानित
वेगवान नाशिक / राहुल देवरे
उमराणे : शेतकऱ्यांना फक्त त्याच्या कष्टाचे मोल दिले तर अन्य कुठल्याही गोष्टीची लालसा या वर्गाला नसते हे पुन्हा एकदा दोघा शेतकरी बांधवांनी व्यापारी वर्गाचे स्वतःकडे आलेले जास्तीचे पैसे स्वतःहून परत करत सिद्ध केले आहे. त्यांनी दाखवलेल्या या इमानदारीमुळे संबंध शेतकरी वर्गाची मान अभिमानाने उंचावली असून उमराणे बाजार समितीच्या वतीने देखील यथोचित सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, देवळा तालुक्यातील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणे येथे कांदा विक्रीसाठी आलेले शेतकरी प्रभाकर दादाजी अहिरे रा. लोहोणेर हे कांदा विक्री नंतर अमोल दामू देवरे यांच्या आयुष पीयूष आडतीत पैसे घेण्यासाठी गेले होते.
यावेळी तेथील रोखपाल यांच्याकडून नजर चुकीने संबंधित शेतकरी वर्गाला १० हजार रुपये जास्त दिले गेले.
तसाच काहीसा प्रकार प्रल्हाद काशिराम देवरे रा. गिलाने ता. मालेगाव यांच्या बाबतीत देखील घडला. त्यांना देखील गौरव प्रमोद बाफना यांच्या गौरव ट्रेडर्स या आडतीत रोखपाल यांनी १० हजार जास्तीचे दिले गेले.
दोन्ही संबंधित शेतकरी बांधवांनी घरी गेल्यावर आपल्या माल विक्रीचे पैसे मोजले असता दहा हजार रुपये जास्त येत होते. दोघा शेतकरी बांधवांनी दुसऱ्या दिवशी थेट बाजार समितीत स्वतः येऊन त्या व्यापारी बांधवांना जास्तीचे आलेले पैसे वापस केले.
यावेळी त्यांच्या त्यांची इमानदारी पाहता दोघा शेतकरी बांधवांचा बाजार समिती, व्यापारी असोसिएशन यांच्यातर्फे सत्कार करण्यात येऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या कृतीचे सर्वच स्थरातून कौतुक करम्यात येत आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, वेगवान न्यूज, कसमादे मीडिया, माय महानगर, नाशिक सिटी न्युज, जागर जनस्थान, इंडिया दर्पण, बी.टी.एल. न्यूज मराठी इत्यादी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. मुख्यतः राजकारण, शेती, क्राईम, विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.