दारू न दिल्याच्या कारणावरून हॉटेल मालकासह कर्मचाऱ्यास गावगुंडांकडून मारहाण
दारू न दिल्याच्या कारणावरून हॉटेल मालकासह कर्मचाऱ्यास गावगुंडांकडून मारहाण
वेगवान नाशिक /नाशिक नितिन चव्हाण ता :, ५ सप्टेंबर २०२४
अंबड येथील महाराजा हॉटेलमध्ये रात्री उशिरा दारू मिळाली नाही या कारणावरून आठ ते दहा जणांच्या गावगुंडांच्या टोळीने हल्ला चढवून हॉटेल मालक, वेटर आणि इतर कर्मचाऱ्यांना जबर मारहाण करून जखमी केले.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी पाच ते सात जणांना ताब्यात घेतले आहे.
हॉटेलच्या आत आणि बाहेर झालेल्या या मारहाणीचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दुसरीकडे, पोलीस प्रशासन सर्वकाही नियंत्रणात असल्याचे सांगत आहे.
परंतु, प्रत्यक्षात मात्र परिसरात गावगुंडगिरी, घरफोड्या, चोऱ्या आणि टवाळखोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
या टवाळखोरांना वेळीच आळा घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
हॉटेल मालकाला मारहाण करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, पोलिसांकडून नेमकी काय कारवाई केली जात आहे,
याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रकरण दाबण्यासाठी काही राजकीय नेते दबाव आणत असल्याचीही चर्चा सुरू आहे.