या महिला आमदाराचा झाला राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते सन्मान
संसदीय मंडळाचा उत्कृष्ट भाषण पुरस्कार आ.सरोज आहिरे यांना प्रदान
वेगवान नाशिक/Wegwan Nashik.3 सप्टेंबर. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेकडून महाराष्ट्र विधानसभेतील उत्कृष्ट भाषणासाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कार देवळाली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या आ. सरोज आहिरे यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात प्रदान करण्यात आला.
विधिमंडळाच्या कामकाजातील नियमित सहभाग, विधिमंडळाच्या नियमांचे काटेकोर पालन, विधिमंडळात उपस्थित करावयाच्या विषयांचे आकलन, उपस्थिती, विषय मांडताना वापरलेले ज्ञान, निवडलेले मुद्दे, वत्तृत्व शैली, उत्कृष्ट भाषणे या सर्व गोष्टी पडताळून पाहून पुरस्कारांसाठी नेमलेल्या तज्ञ समितीकडून उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण यासाठीच्या पुरस्कारांची शिफारस केली जाते. त्यानुसार राष्ट्रकूल संसदीय मंडळाकडून हे पुरस्कार जाहीर केले जातात. यंदा 2018- 19 ते 2023-24 पर्यंतचे पुरस्कार एकाचवेळी जाहीर केले आहेत. त्यात देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांची उत्कृष्ट भाषणासाठीच्या पुरस्कारासाठी निवड होऊन राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आ. सरोज आहिरे या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत मोठया मताधिक्यांने निवडून आल्यानंतर पाच वर्षात मतदारसंघात तब्बल तेराशे कोटींचा सर्वाधिक निधी आणून विकासाची मोठी कामे त्यांनी केली. महत्वाचे म्हणजे आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये आ.सरोज आहिरे यांनी ज्याप्रमाणे मतदारसंघात छाप पाडली. त्याचप्रमाणे त्यांनी विधीमंडळातही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत वकृत्वाद्वारे प्रभाव पाडला. काही वेळेस तर मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आक्रमकपणे विधीमंडळात मांडलेत. आ. आहिरे यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान झाल्याने त्यांचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व मतदारसंघातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करत, शासनाने आ. आहिरेंच्या कामाची दखल घेत त्यांचा सन्मान केल्याची भावना मतदारसंघातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.
हा माझा नव्हे तर मतदारसंघाचा गौरव
देवळाली विधानसभा मतदासंघातील अनेक प्रश्न गेले कित्येक वर्ष प्रलंबित होती. मात्र मतदारसंघातील नागरिकांनी भरभरून मते देत मला विधानसभेत पाठविले. त्यामुळे मतदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळोवेळी विधिमंडळात आवाज उठवला. त्यासाठी विधिमंडळात अग्रक्रमाने मुद्दे मांडावे लागले. मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न मार्गी लागले याचे विशेष समाधान आहे. त्यामूळे होणारा सन्मान माझा नव्हे तर देवळाली मतदारसंघातील प्रत्येक मतदाराचा आहे.
-आ. सरोज अहिरे, देवळाली मतदारसंघ.