देवळा : तालुक्यातील खामखेडयाच्या ‘फांगदर’ आदिवासी वस्तीवर वस्तीशाळेतून शिक्षणाचे नंदनवन फुलवणा-या खंडू मोरे यांना सन २०२३/२४ चा राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झाला. वस्तीशाळा शिक्षकातून राज्यपुरस्कार मिळविणारे ते पहिले शिक्षक ठरले आहेत.
सात वर्ष पाचटाच्या कोपीत शिकणारी फांगदर वस्ती शाळेचू मुलं आज समृद्ध इमारतीत डिजिटल शिक्षण घेतांना दिसून येतात. समाज संपर्क व लोकांच्या सहभागातून अंतरराष्ट्रीय स्तरावरून पंधरा लाखांहून अधिक लोकसहभागातून शाळेला भरघोस शैक्षणीक मदत मिळवत शाळेचा कायापालट घडवून आणत आदर्शवत डिजिटल शाळा घडविण्याचे काय खंडू मोरे यांनी मागील काळात केले आहे.
विशेष बाब म्हणजे या वस्ती शाळेवरील नव्वद टक्के विद्यार्थी हे शेतमजूरांच्या घरातील असून आज ते ई लर्निंगच्या माध्यमातून हायटेक शिक्षण घेत आहेत. इतकेच नव्हे तर शाळेचा परिसरातील बाग फुलवंतांना येते दोनशेवर झाडे जगवत औषधी बाग देखील फुलवली गेली आहे.
शाळेला आकर्षक रंगरंगोटी, दहा संगणक, इंटरअॅक्टीव बोर्ड, स्मार्टपॅणल, पेवरब्लॉक, सोलरसिस्टीम, सहाशे फुट पाईपलाईन, बोअरवेल, बाक, फर्निचर यासह शैक्षणिक साधनांमुळे भौतिक व शैक्षणिक विकास घडवून आणत एक वेगळा आदर्श या शाळेने निर्माण केला आहे. विविध शैक्षणिक उपक्रम, क्षेत्रभेट शैक्षणिक सहली, वाचन कट्टा, आईची डायरी, माझा अभ्यास, माइंड मॅप उपक्रमांची याला जोड दिली असून, शाळेत पंधराशेहून अधिक पुस्तकांचे बाल वाचनालय येथील शिक्षकांनी तयार केले आहे.
आदिवासी वस्तीतल्या ज्या मुलांच्या स्वप्नात विमान येत नाही त्या विद्यार्थ्यांना चक्क विमानातुन मुंबई सफर घडवणारी राज्यातील ही पहिली शाळा ठरली. इतकेच नव्हे तर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याशी देखील विद्यार्थ्यांचार संवाद घडवून आणला.
आदिवासी वस्तीवरील शाळा लोकसहभागातून कशी उभी राहू शकते. हे वास्तव जाणून घेण्यासाठी दहा हजाराहून अधिक शिक्षण प्रेमी, शिक्षणतज्ञ, व्यवस्थापन समित्या, पदाधिकारी अधिकाऱ्यांनी या शाळेला भेटी दिल्या आहेत.
शिक्षणाच्या वारीत शाळेला स्टॉल लावण्यास संधी मिळाली. राज्यातील पहिली आयएसओ मानांकन प्राप्त वस्तीशाळेचा सन्मानही शाळेच्या नावावर आहे. शाळेच्या छतावरून वाहून जाणाऱ्या पाण्याने बंद पडलेला बोरवेल विध्यार्थ्यांच्या मदतीने पुनर्जीवित केलेला उपक्रम राष्ट्रीय स्तरावर निवडला गेला.
वस्तीशाळेचा प्रवास ते राज्यातील आयडीयल स्कुलची वाटचाल शिक्षक खंडू मोरे यांच्या धडपडी कर्तृत्वाचे फलित आहे. अंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय विविध नियतकालिका मधून लेखन तसेच शोध निबंध प्रसिद्ध व पुरस्कार प्राप्त. शासनाच्या दीक्षा अपच्या व्हिडीओ निर्मितीत देखील त्यांनी योगदान दिले आहे. अशा प्रयोगशील व चाकोरीबाहेर जाऊन प्रयोग करत कल्पकतेने व रंजक सोप्या अनुभवातून विध्यार्थ्यांना शिकवणाऱ्या या शिक्षकाला राज्य शासनाचा राज्य पुरस्कार जाहीर झाल्याने सर्वच स्थरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.