पोळ्याच्या निमित्ताने ‘ एक लाडका बैल योजना’ आणण्याचा संदेश
शिगवे बहूला येथील शेतकऱ्यांनी दिला संदेश
वेगवान नाशिक/Wegwan Nashik. विशेष प्रतिनिधी, २ सप्टेंबर-
प्रत्येक गावातील बैलांची संख्या पाहता एक लाडका बैल योजना पण आली पाहीजे जेने करून त्या कारणाने का होईना, बैल पालनाला प्रोत्साहन मिळेल असा संदेश शिगवे बहूला येथील देवराम गावंडे व उत्तम गावंडे या शेतकऱ्यांनी आपल्या बैलाच्या अंगावर पोळ्यानिमित्त सजावट करताना दिला असून येथील तरुण विक्रम कडाळे याने ही संकल्पना मांडली होती.
मशागतीसाठी जुंपलेली बैलजोडी व त्यांच्यासोबत कष्ट करणारा बळीराजा या सवंगड्यांचं जिवा-भावाचं नातं असतं. सकाळी सकाळी गोठय़ातील बैल सोडून त्यांना सोबत घेऊन शेतशिवारात जाण्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत होते; पण आता त्याचे प्रमाण पंधरा-वीस टक्केच उरले आहे. वाढते शहरीकरण व विभक्त कुटुंबपद्धतीसह आधुनिकीकरणामुळे बैलांची संख्या कमी होत चालली आहे.
विभक्त कुटुंबपद्धतीमुळे शेतीचे तुकडे झाल्याने शेतकरी अल्पभूधारक होत आहेत. याचा परिणाम त्यांच्या उत्पन्नात होऊन पशुधन पाळणे अवघड होत आहे. घटलेले शेती क्षेत्र, चार्याचा भेडसावणारा प्रश्न, खाद्याचे वाढणारे दर यामुळेही बैल सांभाळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आधुनिकीकरणाच्या युगात कृषिक्षेत्रातही मोठे बदल घडू लागले आहेत.
शेतजमिनीवर बैलांचे पाण्याचा मान असायचा, तो काळ मागे पडला. आता तर शेतीच्या कामात नांगरण, वखरण, पेरणी, फवारणी अशी सर्वच कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जात आहेत. कृषिकार्यात यांत्रिकीकरण आल्याने पारंपरिक औजारांची जागा यंत्राने घेतली.
बैलजोडीद्वारे दिवसभर चालणारी कामे काही तासांतच होऊ लागली. यांत्रिकीकरणामुळे शेतीची कामे सोपी होऊन वेळ व श्रमही कमी झाले. त्यामुळे शेतकरी बैलांच्या ऐवजी ट्रॅक्टर खरेदीला प्राधान्य देत आहेत. या ट्रॅक्टरने इतरांची कामे केल्यास आर्थिक उत्पन्नातही भर पडते. त्यामुळेच ट्रॅक्टरला प्राधान्य दिले जात आहे.
वाढत्या महागाईबरोबर बैलजोडी पाळणे, त्यांची निगा राखणे, दररोज चारा उपलब्ध करणे, खाद्य पुरविणे या बाबी आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने बळीराजाकडे बैल पोसण्याचे प्रमाण कमी-कमी होत चाललेले आहे. काही मंडळी ही उदरनिर्वाहासाठी बैलजोडीचा उपयोग म्हणून बैलांना पोसत आहेत.
अल्पभूधारक शेशेतकऱ्यांचीा वाढत चाललेली संख्या, मशागतीसाठी यंत्राचा वापर, चारा उपलब्धतेत होणारी घट व बैलांचे संगोपण करणे अवघड बनत असल्याने शेतकर्यांकडील बैलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.