बैलपोळ्यासाठी नांदगाव तालुक्यातील बाजारपेठा सजल्या
बैल पोळ्यासाठी नांदगाव तालुक्यातील बाजारपेठा सजल्या
वेगवान नासिक / wegwan Nashik
नांदगाव, दिनांक ,1 सप्टेंबर 2024, रविवार
नांदगाव तालुका प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :- बैल पोळ्यासाठी नांदगाव शहरासह नांदगाव तालुक्यातील बाजारपेठ हा सजल्या असून बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याचा मोठ्या प्रमाणात मागणी आणि आकर्षक मातीचे बैल हे देखील विक्रीसाठी बाजारपेठामध्ये दाखल झाले आहेत.
शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये बाराही महिने राब लाभणाऱ्या लाडक्या सर्जा राजाचा सण म्हणजे बैलपोळा होय. पोळा सणासाठी नांदगाव शहरातील बाजारपेठाबरोबरच नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील बोलठाण येथील बाजारपेठा सजल्या असून बैलांच्या सजावटीसाठी लागणारी साहित्य, साज आणि इतर साहित्य बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी दाखल झाले आहेत.
त्याचप्रमाणे घरात पूजेसाठी लागणारे प्रतिकात्मक विविध आकारातील आकर्षक मातीचे बैल हे देखील बोलठाण बाजारपेठेत विक्रीसाठी पाहायला मिळत आहेत. यात गोंडे, मोरख्या, माळा, कासरे, चाबूक, मोत्याच्या माळा, फुगे, चमकी, रंग, गेरू, हिंगळाचे डबे, इत्यादी साहित्यासह इतर साहित्यांचा देखील समावेश आहे.
दरम्यान यावर्षी काही प्रमाणात का होईना समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची स्थिती चांगली असल्यामुळे शेतकऱ्यांचा खरेदीकडे उत्साह दिसून येत आहे. परिणामी बैल सजावटीच्या साहित्याच्या दरामध्ये भरमसाठ वाढ झालेली असून देखील शेतकरी वर्षभर आपल्या शेतीमध्ये राबणाऱ्या साथ देणाऱ्या लाडक्या सर्जा राजासाठी बैलपोळा सण साजरा करण्यासाठी सरसवलेले दिसून येत आहे.
मुक्ताराम बागुल हे वेगवान नाशिकचे नांदगाव तालुक्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते पत्रकार म्हणून सक्रिय आहे.