मोठ्या बातम्या
देवळा तालुक्यातील संतापजनक प्रकार ; गावाजवळ बस न थांबवता विद्यार्थिनींना सोडले सुनसान ठिकाणी!
वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : देवळा – कळवण आगाराची पाचोरा – कळवण ह्या एसटी बसने वरवंडी येथे जाणाऱ्या शालेय विद्यार्थिनींसाठी वरवंडी येथे बस उभी न करता गावापासून पुढे तीन किलोमीटर अंतरावर बसमधून उतरवून देण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी सायंकाळी घडला, याबाबत देवळा तालुका शिवसेनेच्या वतीने देवळा वाहतूक नियंत्रक राजेश चव्हाण यांना निवेदन देण्यात आले असून संबंधित बसचा चालक व वाहकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वरवंडी येथील काही शालेय विद्यार्थिनी बुधवारी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर देवळा बसस्थानकावर कळवण आगाराच्या पाचोरा -कळवण या बस मध्ये बसल्या. सदर विद्यार्थीनींनी वरवंडी येथे बस थांबवण्यासाठी संबंधित बसचा वाहकाला विनंति केली, परंतु वाहकाने उर्मटपणे उत्तर देत बस येथे थांबणार नाही असे सांगून वरवंडी येथे बस थांबवली नाही, वरवंडी पासून पुढे तीन किलोमीटर अंतरावर बस थांबवून ह्या विद्यार्थीनींना रस्त्यावर उतरवून दिले. हा परिसर सुनसान असल्यामुळे हया विद्यार्थीनी घाबरून गेल्या. रस्त्यावरून जाणाऱ्या एका नागरीकाच्या मोबाईलवरून त्यांनी घरी संपर्क साधून घडलेली घटना कथन केली. यानंतर भाऊसाहेब चव्हाण हे गावातून आपल्या दुचाकीने ह्या विद्यार्थीनींकडे आले व त्यांना सुखरूप घरी पोहोच केले.
सदर घटनेची माहीती गावात समजल्यानंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. तसेच सदर बसच्या वाहक व चालक यांच्यावर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन देवळा तालुका शिवसेनेच्या वतीने वाहतूक नियंत्रक देवळा यांना देण्यात आले आहे. निवेदनावर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या संगिता भामरे, तालुका प्रमुख भाऊसाहेब चव्हाण, प्रतिक आहेर, नाझिम तांबोळी, गणेश धवळे, गौरव मेतकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, वेगवान न्यूज, कसमादे मीडिया, माय महानगर, नाशिक सिटी न्युज, जागर जनस्थान, इंडिया दर्पण, बी.टी.एल. न्यूज मराठी इत्यादी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. मुख्यतः राजकारण, शेती, क्राईम, विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.