४५ दिवसांसाठी पर्यायी मार्गाला लष्कराकडून परवानगी
रेस्ट कॅम्प रोड दुरूस्तीकामी आमदार आहिरेंच्या प्रयत्नांना यश
वेगवान नाशिक,Wegwan Nashik/ विशेष प्रतिनिधी-
पाच कोटी रुपये खर्चून भगूर पांढुर्ली (रेस्ट कॅम्प) मार्गाचे कॉक्रीटीकरण होणार आहे. मात्र या रस्त्याचे काम होईपर्यत वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग मिळावा. याकरिता देवळाली विधानसभेच्या आमदार सरोज आहिरे या आठ दिवसापासून संरक्षण दलातील वरिष्ठांशी संपर्कात होत्या. डेप्युटी कमाडंट मेजर जनरल आर.आर. कुमार यांच्यासमवेत आ. आहिरे यांची रस्त्याप्रश्नी बैठक होउन डेप्युटी कमाडंट यांनी वाहनधारकांसाठी पर्यायी मार्गास परवानगी दिली असून भगूर-पांढुर्ली (रेस्ट कॅम्प) दरम्यानच्या रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यत वाहनधारकांना एमएच गेट ते मीलन गेट या मार्गाचा वापर करता येणार आहे.
……..
पंधरा वर्षापासून या रस्त्याचे काम रखडले होते. आ. सरोज आहिरे यांच्या पाठपुरवठयातून भगूर-पांढुर्ली (रेस्ट कॅम्प) रस्त्याला चकाकी येणार असून वाहनधारकांची त्रासातून कायमस्वरुपी सुटका होणार आहे. या बैठकीप्रसंगी आ. आहिरे यांच्यासह ब्रिगेडियर रंजन अग्निहोत्री, ब्रिगेडियर आशिष भारद्वाज,कर्नल अभिषेक बिस्त, छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अभियंता अभिषेक मनी त्रिपाठी उपस्थित होते. भगूर-पांढुर्ली (रेस्ट कॅम्प) रस्त्यासाठी आ. सरोज आहिरे यांनी नुकत्याच झालेल्या राज्याच्या पावसाळी अधिवेशनात पंधरा वर्षापासून रखडलेल्या रस्त्याचा मुद्दा मांडला होता. त्यानंतर या रस्त्यासाठी शासनाकडून पाच कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. पुढे या रस्ते कामासाठी निधीही आला. परंतु या रस्त्याचे काम होईपर्यत दोन्ही बाजुकडील वाहनधारकांसाठी पर्यायी रस्त्याची नितांत आवश्यकता होती. त्याशिवाय हे काम होणे शक्य नव्हते. ही बाब आ. आहिरे यांना अवगत असल्याने त्यांनी संरक्षण दलाचे डेप्युटी कमाडंट यांच्यासह वरिष्ठांशी संपर्कात होत्या. रेस्ट कॅम्प रस्ता लवकरात लवकर होण्याची नितांत आवश्यकता असून वाहनधारकांना अधिक त्रास होऊ नये, याकरिता आ. आहिरे यांनी संरक्षण दलाकडे आग्रही भूमिका मांडत पर्यायी रस्त्याची मागणी केली. आ. आहिरे यांच्या मागणीला डेप्युटी कमाडंट आर.आर.कुमार यांनी हिरवा कंदील देत भगूर-पांढुर्ली (रेस्ट कॅम्प) रस्त्याचे काम होईपर्यत एमएच गेट ते मिलन गेट दरम्यान वाहतुकीला परवानगी दिली. अवजड वाहने व चारचाकी वाहने वगळता दुचाकी,तीनचाकी व शालेय वाहतूक या वाहनांना नवीन मार्गाने जाता येणार आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय टळ्णार असून ४५ दिवसांची मुदत संरक्षण विभागाकडून मिळाली आहे. तोपर्यत वाहनधारकांना संरक्षण विभागाने परवानगी दिलेल्या मार्गाचा अवलंब करता येणार आहे.तसेच चारचाकी व अवजड वाहने ही बार्न्स स्कुल – शिगवे बहुला मार्गे वाहतूक केली जाणार आहे. दरम्यान सदर रस्त्याचे काम होताच दुरावस्था झालेल्या रस्त्यातून नागरिकांची सुटका होणार आहे.
पंधरा वर्षापासून भगूर-पांढुर्ली (रेस्ट कॅम्प) रस्त्याचे काम रखडले होते. आता यातून सुटका होणार असून ५ कोटी रुपये खर्चून कॉक्रीटीकरण रस्ता तर नागझिरा नाल्यावरील पुलासाठी २ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. सदर रस्त्याचे काम होईपर्यत कॅन्टोमेंट बोर्डाने पर्यायी मार्ग द्यावा, याकरिता संरक्षण दलाकडे विनंती करण्यात आली होती. त्यांनी विनंती मान्य करुन वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग दिल्याने त्यांचे आभार मानते. तसेच भगूर-पांढुर्ली (रेस्ट कॅम्प रोड) रस्त्याचे काम होईपर्यत कोणत्याही वाहनधारकाने आपले वाहन या मार्गावरुन घेऊन जाऊ नये. ही कळकळीची विनंती. – आमदार सरोज आहिरे, देवळाली विधानसभा