देवळा : तालुक्यातील अठरा वर्ष पूर्ण झालेल्या ज्या नागरिकांचे अद्याप आधार कार्ड काढलेले नाही त्यांना नवीन आधार कार्ड काढण्यासाठी देवळा तालुक्यातच सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी खामखेडा येथील सरपंच वैभव पवार हे सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून, संबंधित नागरिकांसाठी नवीन आधार काढण्याची सुविधा आता देवळा येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
देवळा तालुक्यातील १८ वर्ष पूर्ण झालेल्या बहुसंख्य नागरिकांनी अद्यापपर्यंत आधार कार्ड काढलेले नाही. यामध्ये महिलांचे प्रमाण सर्वाधिक असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी देखील या महिलांना अर्ज दाखल करता आलेले नाहीत. शासनाच्या यासारख्या अनेक योजनांपासून हे नागरिक आधार नसल्याने वंचित राहत होते.
नवीन आधार काढण्याची १८ वर्षापुढील नागरिकांसाठी तालुक्यात कुठेही सुविधा नसल्याने त्यांना नाशिक सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत होते. यासाठी मोठया प्रमाणावर पैसा व वेळ खर्च होत असे. तसेच काही ठिकाणी हे नवीन आधार काढण्यासाठी एजंट पाच ते दहा हजार पर्यंत पैशांची मागणी करत असल्याचे देखील प्रकार समोर आले होते.
त्यामुळे या नागरिकांना तालुक्यातच सुविधा उपलब्ध होऊन यांचा वेळ व पैसा वाचावा यासाठी खामखेड्याचे लोकनियुक्त सरपंच वैभव पवार यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि देवळा तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे नवीन आधार केंद्राची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेत देवळा शहरात नुकतेच देवळा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेजवळ असलेल्या महा ई सेवा केंद्रात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे संबंधित नागरिकांनी सरपंच पवार यांचे आभार मानले आहेत.
प्रतिक्रिया :
नागरिकांची गैरसोय पाहता शासनाकडे नवीन आधार केंद्राची मागणी केली होती, शासनाने या गोष्टीची दखल घेत देवळा येथे ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे १८ वर्षापुढील नागरिकांना आता नवीन आधार देवळा येथेच काढता येणार असून त्यांचा वेळ, पैसा वाचणार असून मानसिक त्रासापासून सुटका होणार आहे.
— वैभव पवार,सरपंच खामखेडा
प्रतिक्रिया :
देवळा शहरात १८ वर्षापुढील नागरिकांसाठी नवीन आधार नोंदणी व अपडेट करण्यासाठी आधार केंद्र सुरू करण्यात आले आहे. नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शासकीय शुल्क ठरलेले आहे. त्या शुल्कापेक्षा जास्त शुल्क देऊ नये तसेच जास्तीचे शुल्क कुणी घेत असल्यास नागरिकांनी संबंधित केंद्रांची तक्रार तहसीलदार कार्यालयाकडे करावी. संबंधित केंद्रावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
—-डॉ.मिलिंद कुलकर्णी, तहसीलदार देवळा