पाईपलाईन दुरुस्तीसाठी खणलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू
भगूर नगरपालिकेचा अनागोंदी कारभाराचा एक बळी
वेगवान नाशिक/Wegwan Nashik:- 25 ऑगस्ट, विशेष प्रतिनिधी :–नाशिक तालुक्यातील भगूर गावात वेताळबाबा रोडवर नगरपालिकेकडून पाईपलाईन दुरुस्तीसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये पडून एका ४४ वर्षीय इसमाचा काल सायंकाळच्या सुमारास जागीच मृत्यू झाला आहे.
शनिवार दि.२४ रोजी वेताळबाबा रोडवरील तुळसा लॉन्स जवळ पाण्याची पाईपलाईन गळत असल्याने सकाळी या ठिकाणी दुरुस्तीसाठी खड्डा करण्यात आला होता.मात्र पाईपलाईन दुरुस्त केल्यानंतर देखील हा खड्डा लागलीच बुजवण्यात आला नव्हता. काल सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास पाऊस सुरू असताना कामानिमित्त बाहेरून घरी येत असताना या रस्त्यावर असलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने डोक्यावर हेल्मेट घालून दुचाकीवरून जात असलेल्या ४४ वर्षीय अमित रामदास गाढवे या इसमाचा या घटनेत जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी त्यास दवाखान्यात दाखल केले मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला होता. अमित रामदास गाढवे हा आपल्या कुटुंबाचा प्रमुख आधार होता. नाशिकच्या गोळे कॉलनी येथील औषधांच्या दुकानात तो कामाला होता त्या आई-वडील पत्नी व तीन मुली असा परिवार आहे. सदर घटनेचा व्हिडिओ जवळील एका सोसायटीमधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. घटनेनंतर या सीसीटीव्हीचे फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी प्रसारित केले.याप्रकरणी भगूर येथील नागरिकांनी या घटनेस जबाबदार असणाऱ्या नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.