दोन दिवसात मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक घेणार- मुख्यमंत्र्यांचे नाशिकमध्ये आश्वासन
नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलकांशी केली चर्चा
वेगवान नाशिक, Wegwan Nashik – २३ ऑगस्ट,विशेष प्रतिनिधी –
आगामी दोन दिवसात सर्वपक्षीयांनी बैठक घेऊन आपण मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका जाहीर करणार असून मराठा समाजाला ५० टक्क्याच्या ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची पुन्हा एकदा बैठक घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक येथील तपोवन परिसरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमादरम्यान आले असता मराठा आंदोलकांशी बोलतांना दिले आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात नाशिक येथील मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी विजय वडेट्टीवार व नाना पटोले यांना घेराव घालता.यावेळी मराठा आरक्षणाची भूमिका जाहीर करण्याची मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले. या निवेदनात आंदोलकांनी मराठा समाजाला ओबीसी मधून ५० टक्केच्या आत आरक्षण मिळावे व सगे सोयरे ह्या कायद्याची संविधानिक अंमलबजावणी या संदर्भात आपण आपली व आपल्या पक्षाची व सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यक्रम स्थळी आगमन होताच त्यांच्या व्हॅनिटी व्हॅन जवळ या मराठा आंदोलकांनी त्यांची भेट घेतली असता त्यांनी आपण लवकरच यासाठी सर्वपक्षीय बैठक घेणार असल्याचे स्पष्ट केले.यावेळी करण गायकर यांनी आपण याप्रश्नी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांची भेट घेतली असल्याचे सांगितले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विरोधक चर्चेला येत नसल्याचे सांगत त्यांनी आपण त्यांना याप्रश्नी पुन्हा विनंती करून इन कॅमेरा त्यांच्याशी चर्चा करून आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. यावेळी पालकमंत्री दादा भुसे,माजी खासदार हेमंत गोडसे हे देखील उपस्थित होते. यावेळी निवेदन देताना मराठा क्रांती मोर्चा समन्वयक करण गायकर,नानासाहेब बच्छाव, आशिष हिरे,योगेश कापसे, सुभाष गायकर, वैभव दळवी, भारत पिंगळे,राम निकम, राहुल काकळीज, चेतन शेवाळे, निलेश ठुबे, विकास रसाळ, ज्ञानेश्वर पालखेडे, मनोरमा पाटील, संगीता सूर्यवंशी, रोहिणी उखाडे, रेखा जाधव, रेखा पाटील, रागिणी आहेर,सविता वाघ, महेंद्र बेहेरे, विशाल निकम, दिनेश थोरात आदी समाज बांधव उपस्थित होते.
काय आहे निवेदनात :-
आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय राज्य घटनेनुसार एका संविधानिक पदावर काम करत आहात त्याच पदाला जबाबदार धरून आज सकल मराठा समाज आपल्याकडे लिखित मागणी करत आहे की गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाला ५० टक्केच्या आत ओबीसीतून आरक्षण मिळावे तसेच सगे सोयरे या कायद्याची अंमलबजावणी राज्य सरकारने तात्काळ करावी या करिता मराठा समाजाने आत्तापर्यंत अनेक आंदोलने केली,लाखोंचे मोर्चे काढले अनेक मेळावे घेतले निदर्शने केली ती फक्त आमच्या हक्का साठी.
या आंदोलनांमध्ये आत्तापर्यंत शेकडो मराठा समाज बांधवांनी आपले प्राण गमावले आहे,हजारो मराठा समाज बांधवांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले परंतु राज्य सरकार व विरोधी पक्ष यांच्यात मराठा आरक्षण संदर्भात एकमत होत नसल्यामुळे मराठा समाजाला आपल्या न्यायिक हक्कापासून वंचित राहावे लागत आहे.तरी मराठा आरक्षण संदर्भात आपण मुख्यमंत्री या नात्याने आपल्या पक्षाची व आपली वैयक्तिक भूमिका या पत्रावर सही करून स्पष्ट करावी.
मराठा समाजाला त्याचे संविधानिक आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी राज्य सरकारकडे मागणी करत असून आपण एक कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून मराठा समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून मराठा समाजाला ओबीसीतून 50% च्या आत आरक्षण व सगेसोयरे या कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी विरोधक व राज्य सरकार दोघांनी मिळून मराठा आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय घ्यावा अशी विनंती आपल्याला सकल मराठा समाजाच्या वतीने या पत्राद्वारे करत आहोत. आपण मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण दिल्यास मराठा समाज सुद्धा मतदान रुपी आपल्याला सत्तेची खुर्ची पुन्हा एकदा देईल कारण मराठा समाज हा प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकपणे योग्य व्यक्तींच्या पाठीशी आतापर्यंत उभा राहत आलेला आहे त्यामुळे आपण ही सुवर्णसंधी साधून मराठा समाजाला न्याय द्यावा अशी अपेक्षा करतो. आपण या पत्रावर पुढील दिलेल्या मागणीला आपला पाठिंबा असेल तर आपली सही करून मराठा समाजाला न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यावा ही नम्र विनंती. कारण लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाने आपल्या पक्षातील उमेदवाराला भरभरून मतदान दिले आहे तसेच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मराठा समाजाने आपल्या सोबत मतदान रुपी रहावे ही अपेक्षा आपण ठेवून आहात तर समाजाच्या उन्नतीसाठी सुद्धा आपण खालील मागणी क्रमांक एक ही मान्य करून आमच्या लेखी पत्रावर सही करून मराठा समाजाला आपली भूमिका स्पष्ट करावी ही नम्र विनंती.
कोट –
राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही मराठा समाजाला ५० टक्के आ =त ओबीसीतून आरक्षण द्या. सगे सोयऱ्याचा जीआर तात्काळ काढा ही मागणी केली विरोधक आणि सत्ताधारी यांचे ऑन कॅमेरासमोर पुन्हा एकदा एक बैठक घेऊन प्रत्येक पक्षाची भूमिका मराठा समाजाला समजावी यासाठी आपण ती बैठक लावावी अशी मुख्यमंत्र्यांना सकल मराठा समाजाच्या वतीने विनंती केली मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आमची मागणी मान्य करून लवकरात लवकर सर्व पक्ष बैठक घेऊन त्या बैठकीत मराठा समाजाला ५० टक्के च्या आत आरक्षण देण्याची भूमिका घेऊ असे आश्वासन आश्वासन दिले –
करण गायकर-मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक