- वेगवान नाशिक / विशेष प्रतिनिधी
खड्ड्यात रस्ता. की रस्त्यांत खड्डा.. …. !!
सटाणा ( प्रतिनिधी ) : दि. २२ ऑगस्ट येथील नवीन वसाहतीतील अभिमन्यू नगर, क्रांतीनगर मधील रस्त्यावर पावसाच्या पाण्याचे मोठं मोठे तळे साचले आहेत. रस्त्यावर पाण्याचा निचरा होण्यासाठीचे नैसर्गिक स्त्रोत बंद झाल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे. रहदारीच्या रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा वाहनचालकांसह नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत असून, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. रस्त्यावर पावसाच्या दिवसांत पाणी साचून राहत आहे. हे पाणी वाहून जाण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने वाहनचालकांसह नागरिकांना या पाण्यातूनच ये-जा करावी लागते.
नवीन वसाहतीतील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली असुन त्याला मोठं मोठे खड्डे पडल्याने चिमुकल्यांनाही शाळेत जाताना मोठी कसरत करावी लागते. रहदारीचा मुख्य रस्ता असल्याने ह्या रस्त्यावरून नेहमी वर्दळ असते. रस्त्यावरील खड्डे पाण्याखाली गेल्याने वाहन चालविताना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यांना साचलेल्या पाण्यातूनच रस्त्याने जावे लागत आहे. नगर परिषद प्रशासनाने यावर काही तरी उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.
प्रतिक्रिया@
आमच्या अभिमन्यू नगर येथील मुख्य रस्त्यावर अनेक दिवसांपासून मोठं मोठे खड्डे पडले आहेत ह्या खंड्यामध्ये मोठयाप्रमाणात पावसाचे पाणी साचत असुन नगर परिषद प्रशासन याकडे लक्ष दयायला तयार नाही. ज्या भागात नागरिक रहात नाही अश्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे परंतु मुख्य रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. नगर परिषदेत लोकप्रतिनिधी नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
प्रशांत कोठावदे-अध्यक्ष: साई सावली फाउंडेशन
गणपती मंदीरामागील रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. नगर परिषदेने हे खड्डे लवकरात लवकर बुजवून जनतेला या त्रासातुन मुक्त करावे.
भूषण निकम-सामाजिक कार्यकर्ते