रास्त भाव दुकानदारांना कमिशन मोबदला वाढवून देण्यास सरकार सकारात्मक – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ
रास्त भाव दुकानदारांना कमिशन मोबदला वाढवून देण्यास सरकार सकारात्मक - अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ
वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला दि. 21 ऑगस्ट : राज्यात 2017 नंतर रास्त भाव दुकानदारांचा मोबदला वाढवला नाही. वाढती महागाई आणि वाढता खर्च याचा विचार करता या दुकानदारांचा मोबदला वाढवून देण्यास सरकार सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठपुरावा करून मंजूर करून घ्यावा, अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.
मंत्रालयातील परिषद सभागृहात या विषयावर मंत्री श्री. भुजबळ यांच्या अध्यक्षतखाली बैठक झाली. या बैठकीस वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांच्यासह रास्त भाव दुकानदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
रास्त भाव दुकानदारांना फक्त कमिशनवर अवलंबून राहून दुकान चालवणे कठीण होत आहे हे लक्षात घेता काही दिवसांपूर्वी रास्त भाव दुकानात स्टेशनरी आणि भाजीपाला विकण्यास परवानगी दिली आहे. राज्यातील ५६ हजार रास्त भाव दुकानदारांना यांचा फायदा होईल.
तसेच सध्या केंद्रीय एन.आय.सी. संस्थेच्या सर्व्हर डाउन असल्यामुळे ई पॉस मशीनद्वारे अन्न धान्य वितरणामध्ये अडचणी येत आहेत. त्यामुळे ऑफलाईन वितरण करण्यास परवानगी दिली आहे. जोपर्यंत अडचण दूर होत नाही तोपर्यंत ऑफलाईन वितरण सुरू राहील. तसेच ई-पॉस मशीनची समस्या तातडीने दूर करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, रास्त भाव दुकानदारांना उत्पन्नाचा स्रोत निर्माण व्हावा यासाठी शासकीय जाहिराती या दुकानात लावाव्यात आणि त्याचे कमिशन द्यावे अशा प्रकारचा प्रस्ताव तयार करून तो मंत्रिमंडळ बैठकीत ठेवावा. यामुळे राज्यात सध्या असलेली ५६ हजार रास्त भाव दुकानदारांना त्याचा फायदा होईल. तसेच किमान महिन्याला १ कोटी ६० लाख पेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहचता येणार आहे.
वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी,लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान न्यूज येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम,शेती, उद्योग, खेळ,बीजनेस विषयातील बातम्यांमध्ये