देवळा : कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या जनावरांच्या वाहनाचा सिनेस्टाइल पाठलाग करुन गोरक्षक आणि देवळा,चांदवड पोलिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील चिंचवे गावाच्या शिवारात तब्बल २७ जनावरांची सुटका केली. या कारवाईत ८ लाख ३८ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. देवळा येथील गोरक्षक योगेश आहेर यांच्या फिर्यादीवरून देवळा पोलीस ठाण्यात या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघा जणांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवड वरून मालेगावच्या दिशेने आयशर (एम.एच. ०६ बी.डब्लू. ६३००) गाडीत दोरीच्या सहाय्याने निर्दयतेने कोंबून २७ गोवंश जनावरे मालेगाव येथे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती देवळा येथील गोरक्षक योगेश आहेर आणि त्यांच्या साथीदारांना मिळाली. त्यांनी दि.१९ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास चिंचवे गावाच्या शिवारात सिनेस्टाइल या गाडीचा पाठलाग करून गाडी थांबवली. यावेळी गोरक्षकानी पोलीस हेल्पलाईन ११२ फोन करत या घटनेची माहिती दिल्यानंतर देवळा आणि चांदवड पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहचले.
देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दामोदर काळे, पोलीस नाईक एस.व्ही.खुरासणे, रामदास गवळी, मोरे तसेच चांदवड पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि गोरक्षक यांची संयुक्त कारवाई करत आयशर गाडीतुन ६ गायी व १९ गोऱ्हे तसेच मृत्यूमुखी पडलेले एक गाय आणि एक बैल अशा एकूण २७ गोवंश जनावरांची सुटका केली.
याप्रकरणी देवळा पोलिसांनी गोवंश जनावरांसह आयशर असा एकूण ८ लाख ३८ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज ताब्यात घेऊन शेख इमरान शेख रफिक (३ आणि शाहिद अब्दुल रशीद (२३)दोघेही राहणार मालेगाव यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील, पोलीस उपनिरीक्षक कैलास गुजर, दामोदर काळे, विनय देवरे आदी करत आहेत.