तब्बल चार वर्षानंतर त्या मार्गावर पुन्हा धावली बस
कोरोनानंतर भगूर ते पुणे बससेवा पूर्ववत सुरू

Wegwan Nashik/ वेगवान नाशिक:-
विशेष प्रतिनिधी,२० ऑगस्ट-
भगूर ते पुणे ही बससेवा आज मंगळवार दि. २० ऑगस्ट पासून पूर्ववत सुरू करण्यात आलेली आहे. बारा बलुतेदार, अठरा पगड जाती संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते कैलास भोर यांच्या पाठपुराव्यामुळे ही बससेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. कोरोना काळात बंद करण्यात आलेली ही लांब पल्ल्याची एकमेव बससेवा ४ वर्षांनी पूर्ववत सुरू झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त करून संबंधितांना धन्यवाद दिलेले आहेत.
एसटीचे नाशिक विभाग नियंत्रक अरुण सिया, सिन्नर आगार व्यवस्थापक हेमंत नेरकर, वाहतूक नियंत्रक भरत शेळके, जयंत चोपडे, सहाय्यक वाहतूक नियंत्रक अण्णा पवार, भगूर बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक हिरामण खोलमकर, एस आर बोकड यांनी भगूरकरांच्या मागणीची सकारात्मक दखल घेऊन ही बससेवा पुन्हा सुरू केली आहे.
मंगळवारी सकाळी ७.३० वा. भगुर स्थानकावर भगुर पुणे बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी बसला पुष्पहार अर्पण करून बसचे पूजन करण्यात आले. बसचालक योगेश सहाने, वाहक व्ही के घटे यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कैलास भोर यांनी केले. कार्यक्रमास नाशिक जिल्हा न्यायालयाचे सेवानिवृत्त प्रबंधक अनिल रहाणे, प्राचार्य डॉ. मृत्युंजय कापसे, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र वारके, सुभाष राजगुरू, मंगेश मरकड, राजेंद्र बलकवडे, समाधान धात्रक, नंदू बेलेकर, शिवाजी गायकवाड, काशिनाथ कुंडारीया तसेच एसटीचे कर्मचारी, प्रवासी यावेळी उपस्थित होते.
पहिल्याच दिवशी भगुर येथून १५ प्रवासी थेट पुण्यास रवाना झाले. रोज सकाळी ७.३० वाजेला सिन्नर आगाराची ही बस भगूरहून निघेल. नाशिक रोड, सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, खेड, मंचर, शिवाजीनगर मार्गे वाकडेवाडी पुणे येथे दुपारी १.३० वाजेला पोहोचेल. एसटीच्या सर्व सवलतींचा लाभ या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मिळणार आहे. जास्तीत जास्त प्रवाशांनी भगूर ते पुणे बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केले आहे.
