देवळा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत देवळा तालुक्यात मोलाची भूमिका बजावत २९ हजार महिला भगिनींचे अर्ज नोंदणी झाले असून १९ हजार महिलांच्या बँकखात्यावर प्रत्येकी तीन हजार रु.चा लाभ मिळालेला असून, याकामी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका यांनी मोलाची भूमिका बजावत शेवटच्या घटकापर्यंत शासनाची योजना पोहोचविण्याचे काम केले, त्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांचा सन्मान आमदार डॉ. राहुल आहेर, नाफेडचे संचालक व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी भरत वेन्दे यांनी केले.
यावेळी बोलताना आमदार डॉ. आहेर म्हणाले की, देवळा तालुक्यातील एकूण २९ हजार महिलांचे अर्ज दाखल झाले असून यापैकी १९ हजार महिला भगिनींना आत्तापर्यंत पाच कोटी सत्तर लाख रुपयाचा लाभ मिळाला आहे. उर्वरित अर्ज दाखल केलेल्या दहा हजार महिलांना देखील त्याचा लाभ मिळणार आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात उर्वरित भगिनींना जुलै ऑगस्ट व सप्टेंबर असा तीन महिन्याचा संपूर्ण लाभ मिळणार आहे.
या योजनेत सुरवातीला अनेक अडचणी आल्या मात्र महायुती सरकारने कुठलाही किंतु परंतु न लावता सर्व अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला. देवळा तालुक्यात तर या योजनेला प्राथमिकता देत लक्षांक पेक्षा अधिकचे काम केल्याने जास्तीत जास्त महिला भागीनांना याचा लाभ मिळणार असून यात अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका यांनी मोलाची भूमिका बाजवल्याने त्या खऱ्या अर्थाने आपण अभिनंदनास पात्र असल्याचे आ.डॉ. आहेर यांनी यावेळी सांगितले.
नाफेडचे संचालक केदा आहेर म्हणाले की, गोरगरीब महिला भगिनींना खऱ्या अर्थाने आधार मिळावा, यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे पैसे महिला भगिनींच्या खात्यावर वर्ग झाल्यावर खऱ्या अर्थाने सर्वाधिक समाधान हे अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका यांना झाले असेल. कारण अनेक अडचणींना सामोरे जात त्यांनी रात्रपहाट करून महिलांची नोंदणी केली. आपली मेहनत याकामी महत्वाची ठरली आहे. कोविड काळात देखील जेव्हा सर्व घरात बसले होते, तेव्हा आपण घराबाहेर पडून प्रत्येकाची काळजी घेण्याची काम केले. शिक्षण असो, आरोग्य असो, वा शासकीय कुठलीही योजना तळागाळापर्यंत पोहचविण्याचे कार्य आपण नेहमीच करत असतात. या योजनेसाठी देखील आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करत कमी कालावधीत दिलेल्या उद्दिष्टपेक्षा जास्तीची नोंदणी केली. म्हणून आपण सन्मानास पात्र असल्याचे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्षा भाग्यश्री पवार यांनी सांगितले की, आपल्या या कार्याची दखल घेत येत्या २७ ऑगस्ट रोजी केदा आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त या योजनेत सक्रिय योगदान देणाऱ्या महिलांच्या विविध स्पर्धा व खेळांच्या माध्यमातून बक्षिसरुपी व वैयक्तिक सन्मान करण्यात येणार आहे.
यावेळी मंदाकिनी आहेर, शोभा जाधव, लिला शेळके, भिकुबाई सोनवणे या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनीही आपले अनुभव मनोगतातून व्यक्त केले. उपस्थित महिलांनी राज्यशासनाचे प्रतिनिधी म्हणून व्यासपीठावरील मान्यवरांना राखी बांधत याबाबतची कृतज्ञता व्यक्त केली.
या सन्मान सोहळ्यास माजी उपनगराध्यक्ष व नगरसेवक जितेंद्र आहेर, उपनगराध्यक्ष मनोज आहेर, नगरसेवक योगेश नानू आहेर, कैलास पवार, शीला आहेर, भूषण गांगुर्डे, भाजपचे किशोर चव्हाण, बापू देवरे, सुनील देवरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुधीर पाटील, गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव, बालविकास अधिकारी जयश्री नाईक यांच्यासह इतर पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोठाभाऊ पगार यांनी केले.