धक्कादायक ; देवळा तालुक्यातील एकाच गावातील १४ दुकाने फोडली
वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : शनिवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी तालुक्यातील वाजगाव येथे १४ दुकाने फोडल्याची घटना घडली असून हजारो रूपयांची रोकड चोरीला गेली आहे.एकाच ठिकाणी असलेली १४ दुकाने फोडण्याची तालुक्यांतील हि पहिलीच घटना घडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
वाजगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गावातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी ग्रामपंचायतीच्या जागेवर टपरी उभारून छोटे मोठे व्यवसाय सुरू करून आर्थिक स्वावलंबन मिळवत बेरोजगारीवर मात केली आहे. वाजगाव येथे देवळा- खर्डा, व भऊर_ वडाळे चौफुलीवर ह्या व्यावसायिकांच्या पत्र्याचे टपऱ्या आहेत.
शुक्रवारी सायंकाळी आपली दुकाने बंद करून हे व्यावसायिक घरी गेल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी जगन्नाथ आहेर यांचे गणेश वेल्डिंग वर्कशॉप, वैभव पवार यांचे वक्रतुंड मेडिकल, शुभम पवार यांचे पवार ॲग्रो सर्विसेस, प्रशांत पगारे, धर्मा पगारे, दिलिप पगारे यांचे सलून सेंटर, विनोद महाले यांचे टेलरिंग दुकान, चेतन बच्छाव यांचे झेरॉक्स दुकान, पांडुरंग देवरे यांचे मोटर रिवायडींग शॉप, तसेच संदीप देवरे, शैलेंद्र देवरे, पुंडलिक देवरे, किरण नलगे, बाळू महाले आदिची किराणा दुकाने अशी एकूण १४ दुकानांच्या शटरचे कुलूप तोडून गल्ल्यातील रोकड लंपास केली.
पुंडलिक शंकर देवरे यांच्या किराणा दुकानात सर्वाधिक ८ हजार रुपयांची रोकड पळवली गेली आहे. देवळा पोलिसांत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून ग्रामपंचायतीचे सीसी टिव्हि फुटेज तपासले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
देवळा शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून चोरांना पोलिसांचा धाक राहीला नाही की काय ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, वेगवान न्यूज, कसमादे मीडिया, माय महानगर, नाशिक सिटी न्युज, जागर जनस्थान, इंडिया दर्पण, बी.टी.एल. न्यूज मराठी इत्यादी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. मुख्यतः राजकारण, शेती, क्राईम, विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.