सरकारी माहिती

सख्खा भाऊ मला विचारत नाही..पण


वेगवान नाशिक

मुंबई, ता.  17 /8/ 24 –  मी आता तुम्हाला मुख्यमंत्री सर म्हणणार नाही तर भाऊ म्हणेन..’, ‘घरखर्चासाठी आता नवऱ्याकडे रोज हात पसरणार नाही.. सख्खा भाऊ मला विचारत नाही..पण मुख्यमंत्री साहेब माझ्या पाठीशी सख्ख्या भावाप्रमाणे उभे राहीले’, ‘मला मिळालेल्या तीन हजाराची किंमत ही तीन लाखाएवढी आहे..’, ‘माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त लवकर पैसे माझ्या खात्यात जमा झाले. रक्षाबंधनापूर्वी मला ओवाळणी मिळाली…!’ राज्यभरातील भगिनींनी आपल्या मुख्यमंत्री भावाकडे व्यक्त केलेल्या या भावना आहेत. या भावनांनी मुख्यमंत्रीही हेलावले आणि तुमच्या लाखो भगिनींचं आशीर्वादाचं बळ माझ्या पाठिशी आहे.. अशा शब्दांत त्यांनीही भगिनींच्या प्रेमाचा स्वीकार केला.

 

१४ ऑगस्टपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दोन हप्त्यांची एकत्रित रक्कम (तीन हजार रुपये) भगिनींच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच प्रातिनिधीक स्वरूपात ऑनलाईन संवाद साधला. त्यावेळी लाभार्थी भगिनींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin

 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेल्या पैशातून जर्मन भाषेचे शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल, अशा शब्दात ई संवादात सहभागी झालेल्या पुणे जिल्ह्यातील साक्षी सुरुशे यांनी लाभ मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी रक्षाबंधनपूर्वीच आम्हाला ओवाळणी दिली, अशी हृदयस्पर्शी भावना मैना कांबळे यांनी व्यक्त केली. पल्लवी हराळे यांनी शिलाई व्यवसाय वाढवता येईल असे सांगताना मुख्यमंत्री स्वतः बोलले याचा आनंद योजनेच्या लाभपेक्षा अधिक असल्याचे सांगितले. उमेद अभियानाने महिलांना आर्थिक उन्नतीची उमेद दिली अशा शब्दात कविता कंद यांनी शासन बचतगटांना करीत असलेल्या सहकार्याबाबत धन्यवाद दिले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

 

राज्यभरातील भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटल्याचे सांगत ही योजना कायम आहे. योजनेकरिता या आर्थिक वर्षासाठी पूर्णपणे तरतुद करण्यात आली असून तुम्हाला योजनेचा लाभ मिळत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आपल्या राज्यभरातील बहिणींना दिली.

 

‍मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे भगिनींच्या बँक खात्यात जमा झाल्याचा आनंद होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, भावाने बहिणीला दिलेला हा माहेरचा आहेर आहे. तुमचा भाऊ आज मुख्यमंत्री आहे. तो खंबीरपणे तुमच्या पाठिशी आहे. लाडक्या बहिणींना दिलेली ही मदत फक्त त्यांच्या पुरती मर्यादीत नाही तर त्यांच्या कुटुंबासाठीही मोलाची अशी ही भेट आहे. मुलांच्या शालेय साहित्यासाठी, तुमच्या औषधांसाठी, तसेच तुमचा सुरु असेलेला छोटा, मोठा व्यवसाय वाढवण्यासाठी या पैशांचा तुम्हाला उपयोग होणार आहे. घर कसे सांभाळावे हे महिलांना चांगले ठाऊक असते. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या हाताला बळ देण्याचे काम शासनाने केले आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही व्यवसाय वाढवालच त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही बळ मिळणार आहे. त्यातून तुम्ही नोकरी देणारे व्हा. त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटीबद्ध आहे. महिलांसाठी शासनाने १०८ योजना सुरू केल्या आहेत. या सर्व योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ बहिणींनी घ्यावा असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या संवादावेळी केले.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!