दीड एकर उत्पादनात शेतकरी झाला लखपती. वाचा किती व कोणत्या पिकाला मिळाला एवढा भाव
गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक उच्चांकी भाव
Wegwan Nashik/वेगवान नाशिक –
देवळाली कॅम्प, देशातली पहिली खाजगी बाजार समिती म्हणुन देशात व देशाबाहेर नावलौकिक असलेली परफेक्ट कृषी मार्केट यार्ड नाशिक येथे शिरूर कासार तालुक्यातील वारणी या गावातील शेतकरी रामनाथ रावसाहेब केदार यांनी पिकविलेल्या डाळिंबास प्रति किलो ३०१ रू. उच्चांकी भाव मिळाला.
मागील १० वर्षातला हा सर्वाधिक भाव असल्याचे या खाजगी बाजार समितीचे अध्यक्ष बापुराव पिंगळे यांनी सांगितले. हा उच्च प्रतिचा माल मलेशिया देशात पाठविला जाणार असुन खरेदीदार व्यापारी दुबई येथील बक्रावी फ्रुट कंपनी आहे.
परफेक्ट कृषी मार्केट यार्ड ही खाजगी बाजार समिती याच क्षेत्रात पुर्वीपासून काम करत असलेले बापुराव पिंगळे यांनी १० वर्षांपूर्वी नाशिक येथे स्थापन केली.
इतर बाजार समित्या करत असलेले कामकाज व आपल्या बाजार समितीचे कामकाज हे आगळेवेगळे सेवाभावी असावे, शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम पुरेपूर व त्वरित मिळावे, बाजार समितीत शेतकऱ्यांचा शेतमाल आल्यावर त्यांच्या मोबाईल वर लगेच त्याची माहिती पाठविणे,स्पर्धेमधुन उघड पध्दतीने लिलाव बोली करून पारदर्शी व्यवहार करणे, लिलाव झालेल्या सर्व शेतमालाची माहिती उदा. वजन, भाव, रक्कम पट्टीव्दारे शेतकऱ्याला लिलाव प्रक्रिया झाल्यावर लगेचच त्यांच्या मोबाईल वर पाठवणे.
शेतकऱ्यांना संरक्षणासह सर्व सोयी सुविधा पुरविणे अशा एक ना अनेक सेवा देत असल्यामुळे परफेक्ट कृषी मार्केट यार्डात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामधील शेतमाल येत असल्याचे पिंगळे यांनी सांगितले.
वास्तविक शेतकरी हे नेहमी प्रयोगशील शेती करून उत्कृष्ठ प्रकारचा शेतमाल आपल्या शेतात पिकवतात. पण त्यांना योग्य बाजारपेठ व योग्य मार्गदर्शनाअभावी आपला माल योग्य भावात विकता येत नाही तर कधी कधी त्या मालाचे कृषी उत्पन्न बाजार समितीत आणावे लागणारे भाडेही मिळत नाही.
याची खंत स्वतः शेतकरी असलेले बापुराव पिंगळे यांच्या मनात नेहमी होती. परफेक्ट कृषी मार्केट यार्डाच्या वतीने शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल स्वतः दुबईत पाठवता येईल व त्या शेतमालाचे पेमेंट नाशिकमध्ये आम्ही देऊ असे बापुराव पिंगळे यांनी सांगितले.बळीराजाला त्याच्या घामाचे दाम मिळावे, त्याच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा, त्यांची फसवणुक होऊ नये, त्यांना त्यांच्या शेतमालाचे पैसे त्वरित मिळावे, त्यांना योग्य मार्गदर्शन, मदत, सहकार्य उपलब्ध व्हावे अशा संकल्पनेमधुन खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन केल्याचे पिंगळे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या शेतात पिकलेला शेतमाल फक्त भारतातच न जाता तो शेतमाल दुबई, मलेशिया, सिंगापुरसह सर्व जगात गेला पाहिजे, त्याकरिता राज्य व केंद्र सरकारने सुलभ व जलद वाहतूक सेवा उपलब्ध करून द्यावी. हवाई, रस्ते व समुद्रमार्गे अशा सर्व वाहतूक सेवा पुरवाव्या म्हणजे शेतकरी जगाच्या मागणीप्रमाणे दर्जेदार व उत्कृष्ठ पिके घेतील. त्यामुळे बळीराजाला त्याच्या घामाचे योग्य दाम मिळेल असे यावेळी डाळिंब उत्पादक शेतकरी रामनाथ रावसाहेब केदार यांनी सांगितले.