देवळा : रोटरी क्लब ऑफ देवळा टाऊन व तुलसी आय हॉस्पिटल नासिक यांच्या संयुक्त विद्यमाने देवळा येथे नुकतेच डोळ्यांचे शिबीर आयोजित केले होते. यात जवळपास २५३ नागरिकांची मोफत डोळ्यांची तपासणी, ५२ नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप, आणि ३० नागरिकांची मोफत डोळ्यांची यशस्वी शस्त्रक्रिया करत, मोफत असलेल्या चांगल्या गोष्टी नजरेआड करू नका असा संदेशच रोटरी क्लब ऑफ देवळा टाऊन ने दिला आहे.
कुठलीही गोष्ट जेव्हा मोफत मिळते तेव्हा त्या गोष्टीला कुणीही जास्त महत्व देत नाही, मोफत आहे मग ते दर्जाहीन असेल असा सर्वत्र समज आजकाल झाला आहे. त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी देखील दृष्टीआड होत असतात. आणि त्या चांगल्या गोष्टी समाजापर्यंत पोहचवणे देखील तितकेच जिकरीचे असते. देवळा रोटरी क्लब नेहमीच सामाजिक उपक्रम राबवित असते. हे उपक्रम राबवित असतांना नागरिकांना मोफत सेवा देण्यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. मात्र मोफत म्हणजे ते दर्जेदार कसे असू शकते, हा गैरसमज आधीच मनात घर करून असल्याने समाजातील अनेक घटक याकडे दुर्लक्ष करतात. ते गैरसमज दूर करत योग्य पद्धतीने या गोष्टी समाजापुढे मांडून देवळा रोटरी क्लब ने ३० नागरिकांची मोफत डोळ्यांची यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. इथून पुढे देखील असे सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून नागरिकांनी मोफत सुविधा मिळत आहेत म्हणून दुर्लक्षित न करता मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असे आवाहन देवळा रोटरी क्लब ने केले आहे.
हे शिबीर यशस्वीपणे राबविण्यासाठी रोटरीचे अध्यक्ष राकेश शिंदे, सेक्रेटरी सुनील आहेर, रोटे. डॉक्टर विश्राम निकम, वसंतराव आहेर, अरुण जी. पवार, कौतिक पवार, प्रितेश ठक्कर, सुनील देवरे, एस.टी. पाटील, अरुण डी. पवार, सतीश बच्छाव, दिनकर देवरे, माणिक सोनजे, विलास सोनजे, भारत गोसावी, संदीप पगार, रोशन अलीटकर, संजीव आहेर, दिनेश सोनार, कैलास बागुल, खंडू मोरे, अब्रार मनियार, सुनील जाधव, वैभव पवार, आदेश ठाकरे, डॉक्टर चंद्रकांत निकम, मोहनदास गवळी, पंकज आहेर तसेच तुलसी आय हॉस्पिटल चे डॉ. शेखर सोनवणे व त्यांचे सहकारी यांनी मेहनत घेतली.
प्रतिक्रिया : देवळा रोटरी क्लबच्या माध्यमातून नाशिक येथील तुलसी आय हॉस्पिटलमध्ये माझ्या एका डोळ्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया कुठलेही शुल्क न आकारता करण्यात आली. तेथे अनुभवी डॉक्टर असून, तेथील कर्मचारी देखील खूपच चांगल्या पद्धतीने सेवा देतात. रोटरी क्लब चे पदाधिकारी देखील घरातील सदस्य मानून तब्येतीची चौकशी करत होते.
– रेशमाबाई पवार, भऊर