नाशिक ग्रामीण
आर्थिक परिस्थिती शिक्षणाला बाधा नको म्हणून श्री सिद्धेश्वर विद्यालयात एक हात मदतीचा उपक्रम
देवळा / बाबा पवार
आजचा विद्यार्थी हा देशाचा भावी नागरिक असतो आणि तो सर्वगुणसंपन्न झाला की, देशाचे भविष्य उज्वल होते. यामुळे शिक्षक हा आपल्याकडे अवगत सर्वच कलागुण आपल्या विद्यार्थ्यांना देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. हे सर्व करत असताना काही विद्यार्थ्यांना मात्र आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने शालेय साहित्य देखील घेता येत नाही. यामुळे ते विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून पर्यायाने दूर होत जातात. मात्र त्यांच्या शिक्षणात कुठलाच अडथळा येऊ नये यासाठी देखील सर्वतोपरी मदत करणारे देखील काही शिक्षक या समाजात असल्याने देशाचे उज्वल भवितव्य घडविण्यात या शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो.
शिकण्याची प्रचंड जिद्द मात्र आर्थिक परिस्थिती नसल्याने शालेय साहित्य घेता येत नाही, असे अनेक विद्यार्थी आज श्री सिद्धेश्वर विद्यालयात7 शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थी वर्गासाठी आपण काही करू शकतो का? अशी संकल्पना पुढे आणून विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. जे. खैरनार यांनी “एक हात मदतीचा” हा उपक्रम राबविण्याचा विचार केला. मात्र ही मदत आर्थिक स्वरूपात न घेता आर्थिक परिस्थिती नसलेल्या विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक साहित्य, शाळेला खेळाचे साहित्य आदी गोष्टी भेट घेण्याची संकल्पना त्यांनी पुढे आणली. यासाठी अनेक माजी विद्यार्थी देखील पुढे सरसावले त्यांनी विविध स्वरूपात मदत देखील केली.
हे सर्व घडत असतांना आपण देखील या समाजाचे काही देणं लागतो या भावनेतून मुख्याध्यापक खैरणार यांनी स्वतःच्या १९८४ साली दहावीच्या वर्गात सोबत असणाऱ्या वर्गमित्रांना देखील मदतीचे आवाहन केले. अर्थात ते या शाळेचे माजी विद्यार्थी नसतांना देखील त्यांनी मित्राच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर शाळेला लेखन साहित्य भेट दिले.
मदतीचा हा ओघ अजून माजी विद्यार्थी यांच्या माध्यमातून सुरूच असून आमच्या शाळेतील सहकारी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभत आहे. याकामी माझ्या आवाहनाला प्रतिसाद देणारे माझे वर्गमित्र, माजी विद्यार्थी, पालक यांचे मी विशेष आभार मानतो. कारण याच सर्वांचा मदतीसाठी पुढे आलेला एक हात उद्याचे देशाचे भवितव्य घडविणार आहे. असे मत मुख्याध्यापक खैरणार यांनी व्यक्त केले.
गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, वेगवान न्यूज, कसमादे मीडिया, माय महानगर, नाशिक सिटी न्युज, जागर जनस्थान, इंडिया दर्पण, बी.टी.एल. न्यूज मराठी इत्यादी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. मुख्यतः राजकारण, शेती, क्राईम, विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.