देवळा : युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी चांदवड देवळा विधानसभेची उमेदवारी केदा आहेर यांनी करावी, अशी आग्रही मागणी देवळा येथील युवा संवाद मेळाव्या प्रसंगी युवकांनी केली.
देवळा येथील डॉ. दौलतराव आहेर सभागृह येथे शनिवार दि. ३ रोजी देवळा शहरातील युवकांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपा जिल्हा नेते केदा आहेर हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर, अतुल पवार, विद्यमान उपनगराध्यक्ष मनोज आहेर, चांदवड भाजपाचे तालुका अध्यक्ष प्रशांत ठाकरे, किरण आहेर, उमेश आहेर, योगेश नानू आहेर, पवन अहिरराव, आदि. व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी तरुणांनी देवळा शहर व तालुक्यातील येणाऱ्या बेरोजगारीचा प्रश्न, शाळा कॉलेजमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींना वेळेवर बसेसची व्यवस्था तसेच शहरातील आरोग्य विषयक सुविधा, शासकीय अधिकाऱ्यांकडून येणाऱ्या अडीअडचणी या विषयावर केदा आहेर यांच्याशी संवाद साधला.
त्यावेळी चर्चेतून आगामी विधानसभेच्या निवडणुकीत केदा आहेर यांनी उमेदवारी करावी, अशी आग्रही मागणी हजारो युवकांनी एकमुखी केल्याने केदा आहेर यांनी आपले मौन सोडले, युवकांची खंबीर साथ माझ्या पाठीशी असेल तर युवकांचे प्रश्न सोडविण्याकामी आपण निश्चित आगामी विधानसभेची निवडणूक लढू अशी ठाम भूमिका या संवाद मेळाव्या प्रसंगी आहेर यांनी घेतली. त्यांच्या या भूमिकेचे युवकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.