देवळा : विंचूर प्रकाशा राष्ट्रीय महामार्ग (क्र.७५२ जी) गेल्या चार महिन्यापासून जमीन अधिग्रहण व मोबदल्याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने रखडले काम शनिवारी दि.२७ रोजी पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात आले.
राष्ट्रीय मार्गावरील देवळा, भावडे, रामेश्वर, गुंजाळनगर , सटवाईवाडी येथील रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी जमीन अधिग्रहण व मोबदल्याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने भावडे ते रामेश्वर दरम्यान शेतकऱ्यांनी हरकती घेऊन चार महिन्यांपासून महामार्गाचे काम बंद पाडले होते.
दरम्यान कंपनी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी यांच्यात अनेकवेळा बैठका झाल्या असून यात गटधारक शेतकऱ्यांनी स्वखर्चाने तातडीने गट मोजण्याचा निर्णय घेतला होता. याकामी भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीचे पैसे भरले असून अद्याप सदर गटांच्या मोजणी झालेली नसतांना शनिवारी दि.२७ रोजी सदर रस्ते बांधकाम कंपनीने भावडे ते रामेश्वरफाटा ह्या ७ किमी दुसऱ्या लेनच्या रखडलेल्या काँक्रिटीकरणाचे काम पोलिस बंदोबस्तात सुरवात केली. यामुळे संबंधित गटधारक शेतकरी आक्रमक होऊन आंदोलनाच्या पावित्र्यात असतांना देवळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी शेतकऱ्यांची समजूत काढत शांतता राखण्याचे आवाहन केले. परंतु शेतजमिनीच्या गटांची मोजणी पूर्ण होईपर्यंत काम होऊ देणार नाही हि शेतकऱ्यांची भूमिका मात्र कायम आहे. यामुळे संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांचे मनातील संभ्रम दूर करण्यासाठी त्यांच्या गटांची तातडीने मोजणी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभाग नाशिक कार्यालयाच्या उप अभियंता सतीश आहेर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, भावडे ते रामेश्वरफाटा या ७ किमी रस्त्याच्या एका लेनचे काम पूर्ण झाले असून, दुसऱ्या बाजूच्या लेनचे काँक्रिटीकरणाचे काम अपूर्ण आहे. यामुळे अपघात होऊन जिवीतहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दुसऱ्या लेनचे काम पूर्ण होणे अतिशय महत्त्वाचे असून, संबंधित गटधारक शेतकऱ्यांनी त्यासाठी सहकार्य करावे. तसेच भावडे ते रामेश्वरफाटा ७ किमीचे काम झाल्यावर शेतकऱ्यांच्या हरकती निकाली निघाल्याशिवाय पुढील काम केले जाणार नाही असेही शेवटी त्यांनी सांगितले.