मेळाव्यात बुथप्रमुख व पदाधिकाऱ्यांना काय म्हणाले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते रवींद्र मिर्लेकर
वेगवान नाशिक/wegwan nasik-
विशेष प्रतिनिधी ,२५ जुलै. –
देवळाली कॅम्प :- देवळाली विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे १९८९ ते २०१९ पर्यंत या मतदार संघात शिवसेनेचा भगवा फडकला आहे. मात्र गेल्या वेळी गाफील राहिल्याने हा मतदार संघ शिवसेनेच्या हातून गेला असला तरी आता पुन्हा सर्व पदाधिकारी व बुथप्रमुख यांनी संघटना मजबूत करत व कुठेही आपल्या पदाचा बडेजाव न मिरवता या मतदार संघाबरोबर राज्यात देखील परिवर्तन घडविण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी विहितगाव येथे आयोजित मेळाव्याप्रसंगी केले.
येथील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी नियोजन व शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याच्या उद्देशाने उपजिल्हाप्रमुख केशव पोरजे यांनी हांडोरे लॉन्स येथे बुथप्रमुख व पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी मंचावर लोकसभा संपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, संपर्क प्रमुख रिटा वाघ, महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी आमदार योगेश घोलप,तालुका प्रमुख प्रकाश म्हस्के, माजी महापौर नयना घोलप,सुनीता कोठुळे, लीलाबाई गायधनी, राहुल ताजनपुरे, काकासाहेब देशमुख, सुधाकर जाधव,उत्तमराव खांडबहाले आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावरील प्रमुख मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यानिमित्ताने बोलताना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर म्हणाले कि, शिवसेनेची खरी ताकद हि ग्रामीण भागात असून आगामी भगव्या सप्ताहातून प्रचार व त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण केली आहे, योगेश घोलप यांच्यासारख्या तरुण आमदार पुन्हा या मतदार संघातून विधानभेवर पाठविण्यासाठी सर्वांनी सज्ज राहण्याचे आवाहन करताना आपली ताकद हि देवळाली, नांदगाव, मालेगाव बाह्य, निफाड, सिन्नर, इगतपुरी,नाशिक मध्य व पश्चिम या मतदार संघापैकी आगामी निवडणुकीत किमान ६ मतदार संघातून भगवा फडकावू असा विश्वास व्यक्त केला. उपनेते रवींद्र मिर्लेकर हे बोलण्यासाठी उभे राहिले असता जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदादास अशी नारेबाजी त्यांनी केली. राज्यात भाजपच्या सोबत असलेले गद्दारांचे सरकार पाडण्यासाठी व पुन्हा संयमी नेतृत्व असलेल्या उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्यासाठी बुथप्रमुख व पदाधिकारी यांच्या कामासोबत प्रत्येक शिवसैनिकाने आपल्यासह परिसरातील प्रत्येक घरोघरी शिवसेना व सदस्य तयार करणे आवश्यक असल्याचे नमूद करतांना बेरोजगारी व महागाईवर कोणतेही नियंत्रण नसलेले हे सरकार आगामी निवडणुकीत घरी पाठवण्याचे आवाहन देखील केले.