मोठ्या बातम्या
वसाका ची विक्री होऊ नये हीच सर्वांची भावना ; आ. डॉ. राहुल आहेर
वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : वसाका सोबत जोडलेल्या सर्व घटकांचे मार्ग वेगवेगळे असतील तरी वसाकाची विक्री होऊ नये, हीच सर्वांची भावना असून यासाठी सर्वसमावेशक समितीची स्थापना करून त्या समितीला सर्वाधिकार देण्यात येऊन सर्वांनी प्रत्यक्ष व प्रामाणिकपणे एका दिशेने जाणे गरजेचे असल्याचे मत चांदवड – देवळ्याचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी व्यक्त केले. बुधवार दि. २४ रोजी वसाका कार्यस्थळी झालेल्या लाक्षणिक उपोषण प्रसंगी बोलत होते. यावेळी वसाका संस्थापक अध्यक्ष स्व. ग्यानदेव दादा देवरे यांच्या धर्मपत्नी श्रीमती लक्ष्मीबाई देवरे तसेच त्यांचे नातू केशव निवृत्ती देवरे हे आंदोलनात सहभागी झाले होते.
वसाका विक्री बाबत निघालेली निविदा रद्द करून वसाका विक्री न करता तो भाडे तत्वावर देण्यात यावा यासाठी बुधवार दि.२४ रोजी वसाका कार्यस्थळावर लाक्षणिक उपोषणाची हाक वसाका बचाव समितीचे विलास देवरे, योगेश आहेर, पंडित निकम, विजय पगार, सुनील देवरे, रवींद्र सावकार आदींनी दिली होती. या लाक्षणिक उपोषणाला वसाकाशी सलग्न असलेल्या सर्व घटकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
यावेळी पुढे बोलतांना आ.डॉ.आहेर म्हणाले की, माझे वडील माजी आरोग्यमंत्री स्व.डॉ. दौलतराव आहेर यांनी वसाकाची चिमणी पेटल्यावर अंतिम श्वास घेतला, प्रदीर्घ काळ रूग्णालयात असतांना त्यांनी रुग्णालयातून सुट्टी झाल्यानंतर घरी न येता वसाका संदर्भात हर्षवर्धन पाटील यांची भेट घेऊन मग ते घरी आले. या माझ्या वडिलांच्या भावनेमुळे माझी वसाकाशी भावनिक नाळ जुळलेली आहे. त्यामुळे तो विक्री होऊ नये ही माझी ठाम भूमिका आहे.
फक्त भाषण करून वसाका सुरू होणार नाही, वसाका निगेटिव्ह नेटवर्क मध्ये असून, वसाकाची खरी परिस्थिती जाणून घेऊन त्या दिशेने सर्वांनी सोबत येऊन पावलं उचलणे गरजेचे आहे.
वसाका सुरू करण्यासाठी कोणीही पुढे येत असेल त्याला माझे संपूर्ण सहकार्य राहील. कुठलाही कारखाना चालू असेल तरच त्याला शासकीय अर्थसहाय्य मिळते, आणि ज्या काळात वसाकाला शासकीय अर्थसहाय्य मिळत नव्हते त्यावेळी मुंबई डी.सि.सि.बँकेला माझी स्वतःची मालमत्ता गहाण ठेऊन वसाका उर्जित अवस्थेत आणण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्या काळात वसाका सुरू होत असल्याने कामगार, ऊस उत्पादक, अशा सर्वच घटकांनी सहकार्य केले होते. वसाका बाबत जेथे कुणी मला हाक दिली, त्यावेळी मी सर्वात पुढे होतो, असे आ.डॉ.आहेर यांनी स्पष्ट केले.
यावेळी नाफेडचे संचालक केदा आहेर यांनी मत व्यक्त करताना सांगितले की, वसाका हा सभासद व कामगार यांच्या मालकी हक्काचा आहे. वसाका विकत घेण्यासाठी कुणी पुढे येत असेल तर आपण सर्वांनी पुढे येऊन त्यांना विरोध करणे गरजेचे आहे. यासाठी साम, दाम, दंड, भेद याचा वापर करण्याची आमची भुमिका आहे.
यावेळी विलास देवरे, योगेश आहेर, गणेश निंबाळकर, यशवंत गोसावी, पंडित निकम, प्रभाकर पाटील, सुनील आहेर, सुनील पवार, वसंतराव निकम, विलास सोनवणे, शशिकांत निकम, कुदळे नाना, हिरामण बिरारी, कुबेर जाधव आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी सभासद, कामगार, ऊस उत्पादक शेतकरी, वसाकाशी सलग्न सर्व घटक, सर्व पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांना यावेळी निवेदन देण्यात आले.
गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, वेगवान न्यूज, कसमादे मीडिया, माय महानगर, नाशिक सिटी न्युज, जागर जनस्थान, इंडिया दर्पण, बी.टी.एल. न्यूज मराठी इत्यादी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. मुख्यतः राजकारण, शेती, क्राईम, विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.