नाशिक ग्रामीण
एसकेडी स्कूलमध्ये शिक्षण सप्ताह ; सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षक सरसावले
वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : एसकेडी इंटरनॅशनल स्कूल मध्ये २२ ते २८ जुलै दरम्यान “शिक्षण सप्ताह” आयोजित करण्यात आला असून या सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिक्षण सप्ताह निमित्ताने विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा, त्यांना व्यवहार ज्ञान मिळावे, विविध संस्कृतीची ओळख व्हावी, या गोष्टींवर विशेष भर दिला जात आहे. यामुळे शालेय जीवनात शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्यांच्या सामाजिक ज्ञानात भर पडून सर्वगुणसंपन्न विद्यार्थी तयार होण्यास मदत होणार आहे.
विद्यार्थी वर्गाला व्यवहारिक ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना बाजारात नेत तेथील दैनंदिन व्यवहार समजवून सांगणे, विद्यार्थी वर्गाने तयार केलेल्या कवितांचे स्कूल मध्ये प्रदर्शन, मजेशीर शिक्षण पद्धती, बांबू सारख्या वस्तूंपासून विविध वस्तूंची निर्मिती, सुलभ गणिती पद्धतीसाठी सांकेतिक कोडे, असे विविध उपक्रम या सप्ताह अंतर्गत स्कूल मध्ये राबविण्यात येत आहेत.
आज दि. २५ रोजी शिक्षण सप्ताह च्या चौथ्या दिवशी देखील मुख्याध्यापक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मराठमोळ्या वासुदेवाच्या आगमनाने कार्यक्रमाची सुरुवात करून, विठ्ठल नामाच्या गीतांनी शाळेचा परिसर भक्तिमय झाला होता. यावेळी महाराष्ट्र सह विविध राज्यातील प्रसिद्ध भोजन, कला, कृती, वास्तु, भाषा, व्यक्ती ईत्यादी पारंपरिक गोष्टी आकर्षक पद्धतीने सादर केल्याने विविधतेतून नटलेला भारतच जणू येथे अवतरल्याचे चित्र दिसत होते.
आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री जाधव व शिक्षक बच्छाव यांनी केले. कार्यक्रमाला प्रियांका जावडा, पूनम सावंत, रजनी आहेर, स्वप्नजा देवरे यांचे सहकार्य लाभले.
या सप्ताहामुळे विविधांगी विद्यार्थी घडत असून, शाळेतून बाहेर पडणार विद्यार्थी हा शिक्षणा सोबत सर्वगुणसंपन्न होऊनच बाहेर पडावा यासाठी सर्वच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मेहनत घेत असल्याने संस्थापक संजय देवरे, सेक्रेटरी मीना देवरे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, वेगवान न्यूज, कसमादे मीडिया, माय महानगर, नाशिक सिटी न्युज, जागर जनस्थान, इंडिया दर्पण, बी.टी.एल. न्यूज मराठी इत्यादी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. मुख्यतः राजकारण, शेती, क्राईम, विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.