देवळा : वसंतदादा पाटील सरकारी साखर कारखाण्याची निघालेली विक्री निविदा रद्द व्हावी, वसाका विक्री होऊन कुणाच्या घशात जाऊ नये, त्याचा कुठल्याही परिस्थितीत लिलाव होऊ नये, याकामी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवार दि. २४ रोजी वसाका कार्यस्थळावर सकाळी १० वा. एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती उमराणे बाजार समितीचे मा. सभापती विलास देवरे व देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
कै. ग्यानदेव दादा देवरे यांनी वसाका उभा करण्यासाठी प्रचंड अशी मेहनत घेतली होती. लोकांच्या घरी जाऊन शेअर्स गोळा करून या कारखान्याची निर्मिती केली. याकाळात परिस्थिती नसतांना नागरिकांनी शेअर्स घेऊन हा वसाका उभा करण्यासाठी योगदान दिले. तो वसाका आज विक्रीच्या उंबरठ्यावर उभा आहे. सभासदांच्या हातातून एकदा वसाका गेला तर तो पुन्हा कधीच हाती लागणार नाही. त्यामुळे त्याची विक्री न होता तो पुन्हा उर्जित अवस्थेत येऊन भविष्यात सभासदांच्या मालकीचा झाला तरच कै. दादांचे स्वप्न भंग होणार नाही. त्यामुळे आपला कारखाना वाचविण्यासाठी, कारखाना विक्रीस विरोध म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी होत असणाऱ्या लाक्षणिक उपोषणाला स्वतः कै. ग्यानदेव दादा देवरे यांच्या धर्मपत्नी लक्ष्मीताई देवरे येणार असून वसाका सभासद, कामगार, सर्वपक्षीय नेते यांनी देखील उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी विलास देवरे यांनी केले.
कै. ग्यानदेव दादा देवरे यांच्या निधनानंतर देखील अनेकांनी या वसाकाचे सूत्रे हाती घेतल्यावर त्याच्या वैभवात भर घालण्यासाठी प्रयत्न केले. मात्र दुर्दैवाने काही कारणांमुळे तो आर्थिक अडचणीत येऊन बंद झाला. आणि आज तो विक्रीस निघाला आहे. केंद्र शासनाकडून बंद कारखाने उर्जित अवस्थेत येण्यासाठी ११०० कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे, त्या योजनेत वसाका बसवावा, स्थानिकांच्या सहभागातून तो चालवायला द्यावा, सभासदांच्या ताब्यात पुन्हा देऊन सहकारी तत्ववार चालवावा असे अनेक पर्याय पुढे येऊ शकतात. अनेक घटकांचे अर्थार्जन या वसाका वरती अवलंबून आहे, आपल्या परिसरातील सर्वांची भावनिक नाळ त्याच्याशी जोडली गेली आहे. त्यामुळे वसाकाची विक्री होऊ नये यासाठी राजकीय मतभेद विसरून एकत्र येणे गरजेचे आहे, आजची प्राथमिकता ही वसाका बचावाची आहे. यासाठी सर्व घटकांची साथ गरजेची आहे. आम्ही सर्व राजकीय लोकांना या उपोषणाला येण्याबाबत आवाहन करणार आहोत. त्यासाठी सर्वांनी जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी योगेश आहेर यांनी केले.
नाशिक ग्रुप Whatsapp Group | Join |
गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, वेगवान न्यूज, कसमादे मीडिया, माय महानगर, नाशिक सिटी न्युज, जागर जनस्थान, इंडिया दर्पण, बी.टी.एल. न्यूज मराठी इत्यादी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. मुख्यतः राजकारण, शेती, क्राईम, विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.