देवळा : कुठल्याही परिस्थितीमध्ये वसाका कारखान्याची जमीन व कारखाना विकला जाऊ नये. वसाका नेहमीच उर्जित अवस्थेत असावा, यासाठी सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेऊन एकत्र येणे गरजेचे आहे. असे मत देवळा – चांदवड चे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी व्यक्त केले.
वसाका कृती समितीने पत्रकार परिषद घेत स्थानिक आमदारांनी वसाका बाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असा उल्लेख केला होता. त्या अनुषंगाने आमदार डॉ. आहेर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
या बाबत बोलतांना आ.डॉ.आहेर म्हणाले की, वसाका बाबत माझी भूमिका आधीपासूनच स्पष्ट आहे. वसाका हे आपल्या परिसराचे वैभव आहे. वसाका वरती अनेक घटकांचे संसार अवलंबून आहेत त्यामुळे तो नियमित चालू राहिला पाहिजे.
मागील काळात देखील बँकेने वसाका विक्रीची जाहिरात काढली होती, तेव्हा वसाका विक्री होऊ नये व तो भाडे तत्वावर किंवा चालवायला द्यावा या बाबत मी आग्रही भूमिका मांडली होती. जे वसाका विकत घेण्यासाठी येत होते त्यांना देखील परावृत्त केले होते. मात्र त्या वेळेस कुणीही सोबत आले नाही.
वसाका नेहमीच उर्जित अवस्थेत असावा यासाठी भाडे तत्वावर किंवा कुणीही पुढे येऊन चालवायला तयार असेल तर यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे. मात्र यासाठी स्थानिकांची साथ देखील तितकीच गरजेची आहे. वसाका चालविण्यासाठी कुणी पुढे येत असेल तर यासाठी मी पूर्णपणे मदत करण्यास नेहमीच तयार आहे.
वसाका कृती समितीला देखील माझे आवाहन आहे की, आपण सर्व राजकीय जोडे बाजूला ठेऊन एकत्र येत यासाठी प्रयत्न करायला हवे. या बाबत माझी नेहमीच सकारात्मक भूमिका होती व असेल, असे मत शेवटी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी व्यक्त केले आहे.