मोठ्या बातम्या
वसाका विक्री प्रक्रिया त्वरित थांबवावी ; १०५ कोटी साठी ५०० कोटीच्या मालमत्तेचा व्यवहार करणार का?
वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाण्याची विक्री प्रक्रिया त्वरित थांबविण्यात यावी व कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधीनी मंत्रालय स्थरावर शासन दरबारी सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी देवळा येथील पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी मविप्रचे संचालक विजय पगार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, कामगार युनियनचे अध्यक्ष विलास सोनवणे, अरुण सोनवणे, हिरामण बिरारी उपस्थित होते.
वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाण्याचे राज्य सरकारी बँकेचे १०५ कोटी रुपये व्याजासह परतावा देणे बाकी असल्याने त्यांनी दि.१९ जून २०२४ रोजी कारखाना विक्रीची निविदा काढली असून, निविदेत १६२ कोटी ४४ लाख ७० हजार रु. किंमत ठरवण्यात आली आहे. त्यात कामगार देणी, शेतकरी, व्यापारी देणी, कामगारांचे प्रॉव्हिडंट फंड इ. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खरेदीदाराने त्यांच्या सोयीने देणे आहे. सदरचा प्रस्ताव म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कामगार यांना मान्य नसून या कारखान्याची विक्री होऊ नये याकामी स्थानिक आमदार डॉ. राहुल आहेर यांनी पुढाकार घेवुन शासनदरबारी बैठक बोलवावी व सदर प्रक्रिया बंद करून पुन्हा भाडेतत्त्वावर देण्यात यावा, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.
सभासदांनी कारखाना सहकार तत्त्वावर चालवावा :‘वसाका’ची विक्री होऊ न देता खरंतर तो सभासदांनी एकत्रित येत सहकार तत्त्वावर चालवला, तर अधिक उत्तम होईल. मात्र तसे न झाल्यास तो भाडेतत्त्वावर चालवला तरी चालेल. प्रमाणापेक्षा अधिक भाडेपट्ट्याची मागणी केली जात असल्याने त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने याबाबत सर्वंकष विचार होण्याची गरज या वेळी व्यक्त करण्यात आली.
कारखाना खरेदीदारास कार्यस्थळावर पाय ठेऊ देणार नाही :कुठल्याही परिस्थितीत कारखाण्याची विक्री होवु देणार नाही, जर अशा प्रकारे विक्री झाली तर खरेदीदाराला कारखाण्यावर पाय ठेवू देणार नाही. याबाबत स्थानिक सभासदांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच वसाका ला बँकेचे १०५ कोटी देणं आहे आणि सभासदांची मालमत्ता ५०० कोटींची आहे, तेव्हा १०५ कोटीसाठी ५०० कोटींचा लिलाव करणार का? असा सवाल देखील यावेळी निकम यांनी उपस्थित केला आहे.
कै. देवरेंच्या स्वप्नांशी खेळ नये :वसाका उभारणी कार्यात कै. ग्यानदेवदादा देवरे यांनी रक्ताचे पाणी करून कारखाण्याची उभारणी केली आहे. कसमादेचे वैभव म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेल्या वास्तूचे शासनाने हे वैभव विकून कै. देवरेंच्या स्वप्नांशी खेळ करू नये. असे मविप्रचे संचालक विजय पगार यांनी सांगितले.
कामगार व त्यांचे कुटुंब उद्धवस्त होतील :गेल्या अनेक वर्षांपासूनचा कामगारांचा प्रॉव्हिडंट फंड त्यांच्या खात्यात जमा झाला नसून गेल्या पाच महिन्यांचा कामगारांचा पगार बाकी आहे. कामगारांचा बोनस इ. याअगोदर कारखाना भाडे तत्वावर घेतलेल्या ठेकेदाराने दिला नसून, जर कारखान्याची विक्री झाली तर अनेक कामगार व त्यांचे कुटुंब उद्धवस्त होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार असल्याचे यावेळी कामगार युनियनचे अध्यक्ष विलास सोनवणे यांनी सांगितले.
गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, वेगवान न्यूज, कसमादे मीडिया, माय महानगर, नाशिक सिटी न्युज, जागर जनस्थान, इंडिया दर्पण, बी.टी.एल. न्यूज मराठी इत्यादी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. मुख्यतः राजकारण, शेती, क्राईम, विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.