नाशिक ग्रामीण
अर्ध्या तासाची मिटिंग ग्रामसेवक दिवसभर कार्यालयात फिरकलेच नाही ; हालचाल बुक नाही, बायोमेट्रिक बंद, कार्यालयीन वेळेचे पालन नाही : करवाईची प्रतीक्षा

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : देवळा तालुक्यातील भऊर ग्रामपंचायतीत ग्रामसेवकाचा मनमानी कारभार सुरू असून कार्यालयीन वेळेचे पालन न करणाऱ्या ग्रामसेवकामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी तसेच विविध दाखले घेण्यासाठी येणाऱ्या शालेय विद्यार्थी व नागरीकांना ग्रामपंचायत कार्यालयात नाहक हेलपाटे घालावे लागत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
भऊर हे जवळपास सहा हजार लोकसंख्या असलेले तालुक्यातील प्रमुख बागायतदार गाव आहे. गावातील बहुतांश नागरीक शेतावस्तीवर राहतात. गाव मोठे असल्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार मोठा असून विविध शासकीय योजना, कागदपत्रे घेण्यासाठी येणाऱ्या नागरीकांची कार्यालयात नेहमी वर्दळ असते. परंतु ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एकनाथ गावित हे मनमानी कारभार करत असून कार्यालयीन वेळेचे पालन करत नाहीत, ग्रामस्थांनी विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेतात, यामुळे नागरीकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
दि.११ जुलै २०२४ रोजी ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी आदींची देवळा येथे बैठक बोलविण्यात आली होती. दुपारची २ वा. मिटिंग असतांना सकाळी कार्यालयीन वेळेत ग्रामसेवक यांनी हजर होऊन किमान एक ते दीड वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाज पाहणे अपेक्षित असतांना, ते भऊर गावात फिरकले देखील नाही. विठेवाडी येथील अतिरिक्त भार त्यांच्याकडे देण्यात आल्याने ते तेथे गेले असतील, असा अंदाज बांधून ग्रामस्थांनी तेथे देखील तपास केला मात्र ते तेथे देखील आले नसल्याचे नागरिकांना समजले. अंदाजे अर्ध्या ते एक तासाची मिटिंग आटोपून ते कार्यालयात येतील अशी अपेक्षा असतांना ते तेथून सरळ घरी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या बाबत नाममात्र ग्रामपंचायत कर्मचारी यांना माहिती देण्यात आली होती. आधीच ग्रामसेवक हे मुख्यालयी राहत नाहीत. तेव्हा किमान गावातील सोशल मीडियावर मी आज येणार नाही, असा संदेश देणे अपेक्षित होते. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना या बाबत माहिती न मिळाल्याने शेत वस्तीवरून तसेच बाहेर गावाहून कागदपत्रांच्या कामासाठी भऊर गावात आलेल्या नागरिकांना खाली हाताने माघारी फिरावे लागले.
या बाबत सोशल मीडियावर ग्रामस्थांनी अनेक प्रश्नांचा भडिमार सुरू करताच माझ्याकडे अतिरिक एक गावाचा भार आहे. तुम्ही मला गाव व वार ठरवून द्या, माझा कामकाजाचा वेळ ११ ते ४ असल्याचे उडवाउडवीची उत्तरे भऊर येथील ग्रामसेवक गावित यांनी दिली. या बाबत दुसऱ्या दिवशी गावातील काही ग्रामस्थांनी नेमका प्रकार जाणून घेण्यासाठी भऊर ग्रामपंचायत येथे जाऊन ग्रामसेवक यांच्याकडे हालचाल बुक ची मागणी केली. मात्र, हालचाल बुक ठेवणे बंधनकारक नसल्याने ते ठेवलेले नाही. मी गावाची खूप सेवा केली, आता तुम्हाला पूर्णवेळ देणारा कर्मचारी मागवून घ्या. माझ्याकडे काल विठेवाडी गाव होते म्हणून आलोच नाही, अशी उर्मट उत्तरे देत यावेळी ग्रामसेवक यांनी दिली. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी ते तपकीर घासत कार्यालयात वावरत होते. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक संजय पवार, कैलास पवार आदी उपस्थित होते.
या सर्व प्रकरणामुळे ग्रामसेवक यांना नेमका काही राजकीय वरदहस्त आहे का? की अधिकारी वर्ग यांचा धाक यांना राहिलेला नाही, सामान्य जनतेशी उर्मटपणे वागणे, कार्यालयीन वेळेचे बंधन न पाळल्याने नागरिकांना वेठीस धरणे हा मनमानी कारभार कधी बंद होईल, वरिष्ठ अधिकारी या बाबत आता नेमकी काय कारवाई करतील याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून आहे.
बायोमेट्रिक हजेरी बंद ;ग्रामपंचायत कार्यालयात अधिकारी, कर्मचारी हे वेळेवर कार्यालयात येतात व जातात का? यासाठी बायोमेट्रिक हजेरी चे मशीन लावले आहेत, मात्र हे मशीन देखील बंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे मशीन लवकरात लवकर दुरुस्ती करून कार्यालयात आल्यावर व जातांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
प्रतिक्रिया : भऊर गावातील बहुतांश नागरिक हे मळ्यात राहत असतात. त्यात ग्रामसेवक गावित हे मुख्यालयी राहत नाहीत, त्यामुळे ग्रामसेवक जर दुसऱ्या गावाला जाणार असतील किंवा येणार नसतील, मिटींगला किती वेळ जाणार आहेत, या बाबत त्यांनी सोशल मीडियावर तसे नागरिकांना कळवायला हवे. जेणेकरून मळ्यातून गावात येणाऱ्या किंवा बाहेर गावाहून कागदपत्रांच्या कामासाठी येणाऱ्या नागरिकांचा वेळ वाया जाणार नाही व त्यांना मनस्ताप सहन करावा लागणार नाही.– रविकुमार पवार, भऊर ग्रामस्थ
प्रतिक्रिया : साधारण अर्धा एक तासाची देवळा येथे बैठक असतांना ग्रामसेवक एकनाथ गावित हे कार्यालयीन वेळेत आलेच नाही, याचा नेमका प्रकार जाणून घेण्यासाठी हालचाल बुक बाबत ग्रामस्थांनी माहिती मागितली यावेळी हालचाल बुक ठेवणे बंधनकारक नाही, दुसरा ग्रामसेवक पाहून घ्या अशी उर्मटपणे उत्तरे ग्रामसेवक यांनी दिली.–संजय पवार, भऊर ग्रामस्थ
प्रतिक्रिया : भऊर येथील प्रकाराबद्दल सखोल माहिती घेऊन चोकशी करणार असून योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच कार्यालयीन कामकाजाची वेळ ही सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ अशी असुन, या वेळेत कर्मचारी यांना कार्यालयात हजर राहणे बंधनकारक आहे. कुणी कर्मचारी उशिरा येत असेल किंवा वेळेआधी जात असेल असे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर देखील योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच असे प्रकार आढळून आल्यास माझ्याकडे रीतसर तक्रार करावी. —भरत वेंदे, गटविकास अधिकारी देवळा
सद्या सर्वत्र शालेय कागदपत्रे व लाडकी बहिण योजनेच्या कागतपत्रांची जुळवाजुळव करण्यात सर्वजण दंग आहेत. लाडकी बहीण योजनेच्या कामात कोणी कसूर केल्यास त्याचेवर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले असतांना शासकीय अधिकारी निष्काळजीपणे वागत असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. तालुक्यातील वाजगाव येथे देखील ग्रामसेवक वेळेवर येत नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी मागील आठवड्यात ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले होते. जोपर्यंत दंडात्मक कारवाई होत नाही तोपर्यंत या गोष्टींमध्ये सुधारणा होणार नसल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, वेगवान न्यूज, कसमादे मीडिया, माय महानगर, नाशिक सिटी न्युज, जागर जनस्थान, इंडिया दर्पण, बी.टी.एल. न्यूज मराठी इत्यादी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. मुख्यतः राजकारण, शेती, क्राईम, विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.