देवळा : भऊर ता. देवळा येथे लग्नसमारंभासाठी आलेला भूषण पिराजी वाघ रा. मुलूकवाडी ता. देवळा या चोवीस वर्षीय तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याने हा तरुण जबर जखमी झाला. मोठ्या हिमतीने तरुणाने स्वतःची सुटका करून घेतल्याने सुदैवाने पुढील अनर्थ टळला.
भऊर येथील आदिवासी वस्ती येथे काल दि. १४ रोजी मांडव व आज दि. १५ रोजी विवाह सोहळा होता. यासाठी दि. १४ रोजी तालुक्यातील मुलूकवाडी येथील भूषण हा त्याचे मेहुणे बाजीराव लाला माळी यांच्याकडे मुक्कामी भऊर येथे आला होता.
दि. १५ रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भूषण प्रातर्विधीस जवळच असलेल्या नदीपात्रात गेला. तो खाली बसताच जवळच असलेल्या झाडावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. याच वेळी नदीतील वाळू, दगड भूषणच्या हाताला लागले. त्याने मोठ्या हिमतीने हातातील वाळू दगड बिबट्याला मारल्याने बिबट्याने धूम ठोकली.
भूषण ने लागलीच फोन करून नातेवाईकांना बोलावले. बिबट्याच्या हल्ल्यात भूषण च्या तोंडावर, डोक्यावर खोलवर जखमा झाल्याने नातेवाईकांनी भूषण ला कळवण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, त्याच्यावर सद्यस्थितीत उपचार सुरू आहेत.
पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करा :
या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असून कुत्रे, कोंबड्या यांची नेहमीच शिकार होत असते. आता मात्र माणसावर हे बिबटे हल्ला करू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
चांगले उपचार करून आर्थिक मदत द्यावी :
भूषण हा मोलमजुरी करून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्यामुळे त्याला वन विभागाच्या वतीने तत्पर आर्थिक मदत मिळावी तसेच त्याच्या उपचाराचा पूर्ण खर्च करून त्याला चांगले उपचार देण्यात यावे अशी मागणी भऊर ग्रामस्थांनी केली आहे.