महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नांदगाव तहसील कार्यालयात….
महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नांदगाव तहसील कार्यालयात...

- वेगवान नाशिक / Wegwan NASHIK
नांदगाव दि.16 जुलै 2024 मंगळवार, प्रतिनिधी (मुक्ताराम बागुल) :– महसूल कर्मचाऱ्यांनी दिनांक 12 जुलै 2024 शुक्रवारपासून पुकारलेल्या बेमुदत संप सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कर्मचाऱ्यांच्या या संपामुळे नांदगाव तहसील कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. टपाल विभागातही खुर्च्या मोकळ्या दिसल्या त्यामुळे नागरिकांना या संपामुळे मनस्ताप होऊन माघारी परतावे लागले. आर्थिक झळ दखील नागरिकांना सोसावी लागली.
महसूल कर्मचाऱ्यांच्या या बेमुदत संपामुळे नांदगाव तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून संजय गांधी निराधार योजनेसह पुरवठा विभाग, महसूल शाखा, अभिलेख कक्ष टपाल विभागातील अधिकाऱ्यांतील कर्मचारी संपावर गेल्यामुळे तहसील कार्यालयामध्ये सर्वांचे कामकाज ठप्प असल्यानचे चित्र सोमवारी देखील दिसून आले.
सध्या नांदगाव तालुक्यात ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक, पोट निवडणुका लागल्या असून त्यांच्या प्रभाग निहाय मतदार याद्या देखील प्रसिद्ध झाल्या असून या प्रभाग निहाय मतदार याद्या आक्षेप घेण्यासाठी 15 जुलै 2024 शेवटची देण्यात आली होती. परंतु टपाल विभागातील कर्मचारी देखील संपावर असल्यामुळे टपाल विभागात तक्रार अर्ज देता आले नाही. त्यामुळे रोहिले बुद्रुक येथील नागरिकाने नायक तशिलदार यांची भेट घेतली असता त्यांनी त्या कार्यालयातील शिंदे साहेब यांच्याकडे सदरचा अर्ज देण्यास सांगितला परंतु शिंदे साहेब यांनी निवडणुकीबाबत असलेला आक्षेपाचा तक्रार अर्ज स्वीकारला परंतु पोहोच दिली नाही. त्यामुळे निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभाग निहाय मतदार याद्या बाबत अक्षेप तारीख लांबवण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कामात देखील यामुळे ठप्प असल्याचे चित्र दिसून आले. सध्या लाडकी बहीण योजनेत सहभागी होण्यासाठी महिला वर्गाकडून अनेक दाखले जमवण्याचे काम सुरू असून नांदगाव तहसील कार्यालयात येऊन देखील कामे न झाल्याने महिला वर्गांना निराशा होऊन आपल्या घरी परतावे लागत असून आर्थिक झळ या संपामुळे त्या महिलांना सोसावी लागण्याची वेळ आली आहे.
सदर महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महिला वर्गांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे, रेशन कार्ड मधील नावे कमी करणे, नावे काढणे आधी कामासाठी तहसील कार्यालयात गेल्या आठ दिवसापासून मोठी गर्दी पहायला मिळत आहे. आधीच गर्दीत ताटकळत उभ्या राहणाऱ्या महिलांना महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
