आषाढी एकादशी निमित्त अडीच इंच बाटलीची चर्चा
काचेच्या बॉटलवर रंगवले विठुरायाचे चित्र
Wegwan Nashik/वेगवान नाशिक.
विशेष प्रतिनिधी,16 जुलै-
सध्या आषाढ महिना सुरू असून गावोगावी खेडोपाडी तर शहरात देखील या महिन्यात भक्तीला उधान आलेले असते.हरी कीर्तन, भजन यातून विठ्ठलाचे गुणगान केले जाते त्या भक्तीचे एक प्रतीक म्हणून सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा येथील मायक्रो आर्टिस्टने चक्क 2.5 इंचाच्या बाटलीवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विठुरायाचे चित्र साकारले आहे.
प्रदीप भाऊसाहेब शिंदे असे या कलाकाराचे नाव असून हे चित्र साकारताना त्याने विशेष मेहनत घेतली आहे. गेल्या दोन वर्षापासून त्याला वारीला न जाता आल्याने आपल्या कलेच्या माध्यमातून विठ्ठल भक्तांना आणि वारकऱ्यांना एक वेगळा आनंद देण्याचा त्याने प्रयत्न केला आहे.
मायक्रो पेंटिंगसाठी विशेष ब्रश अशा पद्धतीची चित्र साकारायला खूप कष्ट आणि मेहनत लागते. आकाराने लहान असल्याने खूपच संयमाने आणि काळजी घेऊन अशी चित्रे सकारावी लागतात. त्यासाठी ब्रशसुद्धा तशाच पद्धतीचे वापरावे लागतात. त्यासाठी प्रदीप शिंदे यांनी तसा ब्रश बनवून घेतला. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एका विटेवर विठ्ठलाचे चित्र साकारले होते, यावर्षी आषाढी एकादशीनिमित्त चक्क बाटलीवर साकारलेल्या विठ्ठलाच्या चित्राची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.याआधीही त्यांनी पिंपळाच्या पानावरील चित्रे, स्वतःच्या रक्ताने काढलेली ब्लड पेंटींग, पेन्सिल स्केच असे अनेक चित्रांतून त्यांचे कौतुक केले जात आहेच पण वेगळे काही तरी करण्याच्या नादाने खूप बारकाईने अवघ्या २.५ सेमी बाटलीवर चित्राचे रेखाटन करून हे काम पूर्ण केले.