चोरीचा माल घेणं पडलं महागात; सहा महिन्यांची सक्तमजुरीची झाली सजा

वेगवान नाशिक/अरुण थोरे
निफाड
चोरीचा माल विकत घेणाऱ्यासह चोराला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, निफाड यांनी शिक्षा ठोठावण्यात आल्याने चोरीचा माल घेणाऱ्याला चांगलंच महागात पडलं आहे.
याबाबत ची अधिक माहिती अशी, १६ फेब्रु. ते १७ फेब्रु.२०१७ सायखेडा येथील बाजार समिती व्यापारी गाळा मालक यांचे दुकानातुन अज्ञात आरोपींनी २,८६,०८१ रुपयांचे एम.आर.एफ कंपनीचे १०५ टायर्स, संगणक, टीव्ही संच असा मुद्देमाल घरफोडी करुन चोरुन नेला होता.
तत्कालीन पोलिस निरीक्षक उपासे व त्यानंतर पोलिस निरीक्षक मोरे यांनी गुन्ह्याचा तपास करून उघडकीस आणला होता. त्यात आरोपी अशरफ हमीद शेख, फैय्याज अल्लाउदीन अन्सारी, साजिद अन्वर पटेल, गफार मुक्तार सैय्यद रा.जेलरोड नाशिक यांनी ही चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना व चोरीचा माल खरेदी करणारा आरोपी जावेद अहमद मोहमद अन्सारी रा.लालानगर मालेगांव याने सदरहू माल खरेदी केल्याने सदरहू गुन्ह्यात भा.द.वि.कलम ४११ असे वाढीव कलम लावण्यात येऊन त्यालाही अटक करण्यात आली. त्याच्याकडून गेलेल्या मालापैकी ७२,५०० रु.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर गुन्ह्यातील आरोपीं विरोधात निफाड न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येऊन लोकसभा निवडणुक काळात अशरफ हमीद शेख यांस सायखेडा पोलिसांनी अटक करून त्याचे विरुद्द
पुरवणी दोषारोप सादर करण्यात आले होते. सदर खटल्याची अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी मा.जे.व्ही.भेंडे साहेब यांचे न्यायालयात सुनावणी होऊन चोरी करणाऱ्या तीन आरोपींना ३ वर्ष सक्तमजुरी व २०० रुपये द्रव्यदंड व न भरल्यास १५ दिवस कारावास तसेच चोरीचा माल घेणारा आरोपी जावेद अहमद मोहमद अन्सारी यास ६ महिने सक्तमजुरी व २०० रुपये द्रव्यदंड व न भरल्यास ५ दिवस कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता मनोज तोरणे यांनी कामकाज पाहिले.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने, अपर पोलिस अधिक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पालवे यांनी वेळोवेळी
दोषसिद्दीसाठी मार्गदर्शक सुचना दिल्या. पोलीस ठाण्याचे पैरवी अधिकारी पो.उ.नि.शशिकांत सैंदाने व कोर्ट पैरवी पो.ना महाजन यांनी मा. वरिष्ठांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे कामकाज केले. न्यायालयाच्या या निकालामुळे चोरी करणारे व चोरीचा माल खरेदी करणाऱ्या गुन्हेगारांवर अंकुश बसण्यास मदत होणार आहे.

अरुण थोरे गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.