वारीचं आकर्षण,ऊर्जा…. रिंगण

भाग – ८
टाळ-मृदंगाचा गजर अन् विठ्ठलाचे अभंग आळवीत पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या पावलांना एका अनोख्या चैतन्याचे बळ मिळत असते. पण, सलग वाट चालत असताना वारीला काहीतरी वेगळेपण मिळाले, तर हे बळ द्विगुणीत होत असते. पालखी सोहळ्यातील हे वेगळेपण म्हणजेच रिंगण सोहळा !
वारकऱ्यांचे शीण घालवणारा सोहळा म्हणजे “रिंगण”. टाळ मृदुंगाचा गजर, भगव्या पताकांची दाटी, अश्वाकडे रोखलेल्या नजरा ,अश्वांची भरधाव
दौड,ग्यानबा तुकाराम, ग्यानबा तुकाराम” असं उत्साहवर्धक आणि स्फूर्तीदायी वातावर अश्वांच्या दौडीनंतर माती कपाळी लावण्यासाठी अक्षरशः झुंबड
उडते. हे सगळं काही नेत्रदीपक डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. हे सगळं अनुभवता आलं. रिंगणानंतर होणारा उड्यांचा खेळ , पावली , फुगडी हे सार पाहताना आम्ही ही त्यात दंग होतो. आम्ही सुद्धा फुगडी , पावली खेळत वारी जगलो. म्हातारी बाई तरूणींना लाजवेल अशी फुगडी घालते. म्हातारा टाळ वाजवत उड्या मारतो,नाचतो. या सर्वांना जर विचारलं ,की या वयात हे कसं शक्य होतं? तर सगळ्यांचं उत्तर एकच आहे की,आमचं सगळं आयुष्य आम्ही विठ्ठलाला वाहिलेलं आहे आणि तोच हे करवून घेतो.
*भान हरपून खेळ खेळतो,
दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा..*
भक्तिने भारलेला रिंगण सोहळा
पाहावा ‘याचि देही याचि डोळा’*
रिंगण हा पालखी सोहळ्याचा एक अविभाज्य भाग असला, तरी वारीच्या परंपरेत त्याला वेगळे स्थान नाही. वारकऱ्यांची पाऊले वाटेवर असताना केवळ चालण्याबरोबर मध्येच काही खेळ खेळायला मिळाले, तर वारीचा आनंद वाढून पुढच्या वाटचालीचा उत्साह वाढतो. त्यामुळेच या रिंगणाचे पालखी सोहळ्यामध्ये स्थान आहे. मुळात वारीच्या वाटेवर शिण, भार दूर करण्यासाठी काही खेळ खेळले जातात. वारीचा पालखी सोहळा झाला व त्यानंतर हा सोहळा एका शिस्तीत व दिमाखात पुढे जाऊ लागला. शिस्तीची हीच परंपरा वारकऱ्यांच्या खेळात ही आली .अन् त्यातून शिस्तबद्ध रिंगण सोहळा निर्माण झाला.
वारीच्या वाटेवरील हे रिंगण सोहळे आता सुरू होणार आहेत. १३ जुलैला चांदोबाचा लिंब येथे माउलीच्या सोहळ्याचे पहिले उभे रिंगण होणार आहे. याच दिवशी बेलवाडीत तुकोबांच्या पालखीचे पहिले गोल रिंगण होणार आहे. उभे व गोल असे रिंगणाचे दोन प्रकार आहेत. गोल रिंगण हा शब्दप्रयोग एकवेळ ठीक वाटत असला, तरी रिंगण उभे कसे असू शकते. असा प्रश्न काही जण विचारतात. उभे रिंगण हे पालखी मार्गावरच केले जाते. टाळ-मृदंगाचा गजर करीत मार्गाच्या दुतर्फा वारकरी उभे राहतात व त्यामधून अश्व धावतात. अश्वाच्या काही फेऱ्या झाल्यानंतर रिंगणाचा हा सोहळा पूर्ण होतो.
गोल रिंगण हा वारकऱ्यांच्या व भाविकांच्या दृष्टीनेही पालखी सोहळ्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण ! रिंगणासाठी एक मोठे मैदान सज्ज करण्यात येते. मैदानाची गोलाकार आखणी केली जाते. केंद्रभागी पालखी ठेवण्याची जागा, त्याच्या भोवती वारकरी उभे राहण्याची जागा व त्यानंतर अश्व धावण्याच्या गोलाकार जागेची आखणी केली जाते. या सर्व परिघाबाहेर भाविकांना उभे केले जाते. रिंगण सुरू होण्यापूर्वी ‘रिंगण लावणे’ हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. पालखी मार्गावरून रिंगणाच्या दिशेने येताना ध्वनिक्षेपकावरून सूचना दिल्या जातात व त्यानुसार एकेक दिंडी शिस्तबद्धपणे आखलेल्या रिंगणात दाखल होते. प्रत्येक दिंडीतील विणेकरी, टाळकरी, पखवाज वादक, झेंडेकरी व डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वेगवेगळ्या गटाने गोलाकार उभ्या राहतात. पालखी व दिंडय़ा रिंगणात दाखल झाल्यानंतर शेकडो मृदंगाच्या व टाळांच्या गजरात लाखोंच्या मुखातून ‘ज्ञानोबा-तुकाराम’ असा घोष करीत ठेका धरला जातो अन् रिंगण सोहळा सुरू होतो. झेंडेकरी, विणेकरी, टाळकरी, मृदंग वादक, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला क्रमाने रिंगणातून धावतात. शेवटी अश्व रिंगणात धावतात अन् रिंगण सोहळा आनंदाची सर्वोच्च पातळी गाठतो. त्यानंतर याच जागी फुगडय़ा घालण्याबरोबरच विविध खेळ रंगतात.
साठ ते सत्तर वयाच्या महिला, पुरुष वारकरी तरुणांनाही लाजवतील अशा आवेशात रिंगणात धावत असतात. वाटेवर चालून पाय थकतात, मग रिंगणात धावायला हे बळ येते कुठून, हे एक कोडेच आहे.
*लेखक*
उध्दवबापु फड
संत साहीत्याचे अभ्यासक व बारा वर्षांपासून महाराष्ट्र शासनाच्या प्रबोधन दिंडी प्रमुख व पायी वारी करतात…
*संकलन*
शाहीर उत्तम रामचंद्र गायकर
भारत सरकार व महाराष्ट्र शासन पुरस्कृत !
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड नोंद तथा मा. राज्यपालांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरस्काराने सन्मानित !
