उत्पादन शुल्काच्या चालकाच्या मृत्यूस कारणीभूत आरोपी अटकेत

वेगवान नाशिक/ अरुण थोरे
चांदवड:
७ जुलैच्या रात्री अवैध दारू तस्करी करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करतांना उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाचा चालक ठार झाल्याची घटना घडली होती.त्या घटनेत लासलगाव पोलीस स्टेशनचे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी सखोल चौकशी करत पोलीसांनी आरोपींना अटक केली आहे.
दि.७ जुलै रोजी रात्री गुजरात नोंदणी असलेली ८ ते १० वाहने अवैध दारू घेऊन सिल्वासा येथुन नवापुर, नवसारी येथे मुंबई आग्रा महामार्गाने जाणार असल्याची खबर राज्य उत्पादन शूल्क यांना मिळाली होती. भरारी पथक व ब विभाग राज्य उत्पादन शूल्क यांनी मुंबई आग्रा महामार्गावरील गरवारे पॉईट, द्वारका व आडगांव आदी ठिकाणी सापळा रचुन सदर क्रेटा गाडीस थांबविण्याचा प्रयत्न केला असता, सदर गाडी शहरात न थांबता औरंगाबाद रोडने निफाड दिशेला भरधाव वेगात निघुन गेली. राज्य उत्पादन शूल्क यांनी सदर संशयीत वाहनाबाबत नियंत्रण कक्ष व नाशिक ग्रामीण यांना कळवुन लासलगांव मोबाईल वाहनास संपर्क करून सदरच्या क्रेटा गाडीचा पाठलाग करणेकामी मदत करा असे कळविले. यावरून लासलगांव पोलीस ठाणे कडील शशिकांत निकम व अरुण डोंगरे यांनी लासलगाव रेल्वे फाटक, येथे नाकाबंदी करून सदर गाडीस थांबविण्याचा प्रयत्न केला असता, गाडीवरील चालकाने गाडीचा वेग वाढवुन भरधाव वेगाने चांदवड च्या दिशेने गेला.
लासलगाव येथील रेल्वे फाटकावर नाकाबंदीसाठी असलेले कर्मचारी हे राज्य उत्पादन शुल्क वाहनातील अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या वाहनात सदर गाडीचा पाठलाग करण्यासाठी गेले असता हर्नोल येथील बंद पडलेल्या टोल नाक्याजवळ सदर संशयित गाडीने सरकारी वाहन स्कॉर्पिओ वाहनाला धडक दिल्याने उत्पादन शुल्काची गाडी पलटी झाली त्यात उत्पादन शुल्काचा चालक ठार झाला तर लासलगाव पोलिस स्टेशनचे दोन कर्मचारी जखमी झाले होते त्या अनुषंगाने
पोलीस अधिक्षक,नाशिक ग्रामीण यांनी गंभीर दखल घेत संशयित वाहनाचा शोध घेण्यासाठी पर जिल्ह्यात व राज्यांमध्ये पदके रवाना केली होती.गुन्हयात वापरलेली राखाडी कलरची क्रेटा कार चालक देवीश कांतीलाल पटेल, वय ३७ वर्षे, रा. चिंचवाडा, ता.जि.वलसाड, गुजरात हा चांदवड न्यायालयामध्ये हजर झाला असुन. त्याचेकडे गुन्ह्याची चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीवरून त्याने गुन्ह्यात वापरलेली जी.जे.१९ डी.ई.८८८६ ही कार तटीया पोलीस ठाणे हद्दीतील कोस्टल हायवे, वडचौकी, नाणी, दमन या ठिकाणाहुन पथकाने ताब्यात घेतली आहे.
संशयीत इसम अश्पाक अली मोहम्मद शेख, वय २२, रा. फलॅट नं १०३, युनिक अपार्टमेंट, दर्गारोड, नवसारी, गुजरात हा घेवून जात असल्याने त्यास व त्याचेकडील अवैध दारू वाहतुक करण्यासाठी वापरलेले वाहन काळया रंगाची क्रेटा पुढील तपासकामी ताब्यात घेतले आहे. सदरचे इसम हे एकत्रीतरित्या अवैध दारू वाहतुक करत असल्यामुळे त्यांनी कट रचुन गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने वाढीव कलम भारतीय न्याय संहिता कलम ६१ (२) हे लावण्यात आले आहे.
ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती, सहा.पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.राजु सुर्वे, पो.उ.नि.री कांभीरे, श्रेणी.पो.उप.नि शिरोळे, सपोउनि ठोंबरे, पो.हवा.सानप, खराटे, जगताप, वराडे, गुंजाळ, शिलावटे, महीरे, पो.ना.झाल्टे, पो.शि.बागुल, कासार, चव्हाण तसेच तांत्रिक विभागाचे पो.ना. बहिरम, गिलबिले, टिळे या पथकाने ही कामगिरी केली आहे.

अरुण थोरे गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.