खेळ मांडला…मांडला.. मांडला देवा… वारीतील खेळ-

वारीतील खेळ आणि भारुड ही आत्मभानाला देवभान देणारी आहेत.पंढरीची वाट चालताना वारीच्या विसाव्याच्या स्थळी वारकऱ्यांच्या खेळांना बहर येतो. फुगडी-झिम्म्यापासून हमामापर्यंतचे खेळ रंगत आणतात. हे खेळ म्हणजे प्रत्यक्ष विठुरायाशी चालेलला वारकऱ्यांनी साधलेला मेळ असतो…
शेकडो किलोमीटरचा वारीचा टप्पा पायी चालताना वारकरी किती थकत असतील ना? वारीत शरीराला थकवा येऊ शकतो. कारण त्याला श्रमांचं बंधन आहे. परंतु मनाला तसं काही होणार नाही.कारण ते विठ्ठलमयच झालेलं असतं. पण या शारीरिक शिणालाही विसरायला लावणाऱ्या खूप साऱ्या गोष्टींचा समावेश वारीत असतो.
नोहे एकल्याचा खेळ , अवघा मेळविला मेळ’ हे सूत्र आहे. पंढरपूरचा विठोबा आणि त्याच्या लाखो भक्तांचं. पंढरीची वारी म्हणजे, विश्वाला कवेत घेणाऱ्या विठुरायाच्या डिंगरांचा एक अनुपम्य सोहळा. या सोहळ्यात वारकऱ्यांच्या अंतरातील पांडुरंग जेव्हा खेळिया होऊन नाचू लागतो. तेव्हा ‘आत हरी बाहेर हरी’ अशी उन्मनी अवस्था वारकऱ्यांची होते. आणि विठ्ठल खेळिया बरोबर त्याचे सवंगडीही खेळू लागतात, नाचू लागतात. पंढरीच्या वारीत ‘तुम्ही आम्ही एकमेळी गदारोळी आनंदे’ अशी अवस्था सर्वांचीच होते. वारकरी संप्रदायाचं भक्तीचं कृतिरूप म्हणजेच वारीतले खेळ आणि भारूडासारखं भक्तिनाट्य. ‘लावोनि मृदुंग श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने’ ब्रह्मरसाची प्रचिती ही वारीतल्या खेळांनी आणि भारूडांनी येते. ‘टाळाटाळी लोपला नाद, अंगोअंगी मुरला छंद’ अशी अवस्था या खेळांनी होते. कीर्तन आणि नर्तन दोहोंचा मिलाप वारकऱ्यांच्या भक्तिनाट्यात आहे. किंबहुना कीर्तनातील नर्तन संतांना अभिप्रेतच होतं. त्यामुळेच ‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’ असं म्हटलं आहे.आपला आजचा विषयही तोच आहे. वारीतील खेळ! जे मनोरंजकही आहेत.आणि आरोग्याकारकही!
वारीत अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात. त्यातील महत्वाचा खेळ म्हणजे रिंगण ! ज्यात माऊलींच्या पालखीला केंद्रस्थानी ठेवून गोलाकार प्रदक्षिणा घातली जाते. रिंगणाचे बरेच प्रकार आहेत मेंढ्यांचे, विणेकऱ्यांचे, अश्वाचे, उभे इ. या रिंगणात आणि स्वतंत्रपणे सुद्धा झिम्मा, फुगडी, मनोरे, काटवटकणा, फेर धरणे, उड्या मारणे इ. खूप सारे खेळ खेळले जातात.
या खेळातील एक फार चांगला पण नव्या पिढीला जास्त माहिती नसलेला असा एक खेळ म्हणजे ‘काटवटकणा’! या खेळात बसून पायाचे अंगठे धरले जातात. व ते न सोडता पाठीच्या, कमरेच्या, पायाच्या आधाराने गोल फिरले जाते. असा काटवटकणा घालणाऱ्या महिलांना कंबरदुखी व गर्भाशयाचे विकार होत नाहीत. आणि हो हा खेळ पुरुषांसाठी देखील फायदेशीर आहे बरं ! कारण यात एवढा पाठीचा व्यायाम होतो. जो कदाचित इतर कुठल्याच प्रकारात होणार नाही. या आणि अशा खेळांमुळेच या वारकऱ्यांचे आरोग्य, उतारवयात ही निरोगी आणि सुदृढ राहत असावे.
दुसरा फार प्रसिद्ध खेळ आहे.ज्याचं जास्त वर्णन सांगायची गरज नाही. कारण महाराष्ट्रात तरी तो सर्वश्रुत आहे. आणि तो म्हणजे ‘फुगडी’! यात दोन व्यक्ती एकमेकांच्या हातात हात देतात आणि गोलाकार फिरतात. फुगडी बद्दल अजून एक सांगायचे आहे. यात पुढच्याचा हात घट्ट पकडून आपल्या शरीराचा भारमागे टाकत गोल फिरावं लागतं. या खेळाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर पुढच्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेऊन फिरता यायला हवं. एकदा का हात सुटलानां तर…. न सांगितलेलंचं बरं! फुगडीच्या खेळातून एक फार चांगली गोष्टं शिकायला भेटली, जी दैनंदिन जीवनातही उपयोगी आहे… जर पुढची व्यक्ती तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवत असेल, तर आपणही त्या व्यक्तीवर तसाच विश्वास ठेवावा. त्याचबरोबर आपल्याकडून ही त्याचा विश्वासघात होणार नाही. याचीही जाणीव ठेवावी.
हे खेळ आपल्या पारंपारिक लोकनृत्याचाच एक भाग जरी असले , तरीही ते एक सर्वांगसुंदर व्यायामाचाच प्रकार आहेत. कारण या खेळांतून शरीर लवचिक बनते .आणि हालचालींवर नियंत्रण मिळवता येते. खरं तर हे खेळ नुसते वर्णन करून समजणार नाहीत. तर ते स्वतः तिथे जाऊन अनुभवण्याचे आहेत! आम्ही तुम्हाला फक्त नावं सांगू शकतो .फार-फार तर वर्णन सांगू शकतो, परंतु वाचण्यापेक्षा ते बघणे आणि अनुभवणे जास्त आनंददायी असेल.
*लेखक*
उध्दव बापु फड
महाराष्ट्र शासनाच्या प्रबोधन दिंडी प्रमुख म्हणून १२ वर्षे काम केले असून संत साहित्याचे अभ्यासक आहे.
*संकलन*
“आनंदतरंग” शाहीर उत्तम रामचंद्र गायकर
भारत सरकार व महाराष्ट्र शासन पुरस्कृत !
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड नोंद तथा मा. राज्यपालांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरस्काराने सन्मानित !
