Life Styleनाशिक ग्रामीणमनोरंजन

जगातील मुल्यशिक्षण व व्यवस्थापन शिकावं तर वारीतच….


भाग ५

ऊन,वारा,पावसाची तमा न बाळगता अखंडपणे लाखो भाविक अनेक शतकांपासून या सोहळ्यात सहभागी होतात.वारी म्हणजे देहू-आळंदी पासून पंढरपुरापर्यंत विठ्ठल नामसंकीर्तन करीत करीत २८० कि.मी.चा केलेला पायी प्रवास.याला सातशे वर्षांची अगाध परंपरा आहे. ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांनी तेराव्या शतकात वारी केल्याचा उल्लेख आढळतो. निवृत्तीनाथांनी आपल्या भावंडांसह वारी केल्याचा उल्लेख आढळतो. जगद्गुरू तुकाराम महाराज ही पंढरीची वारी करत असत. पुढे त्यांचे चिरंजीव नारायण यांनी ती परंपरा चालू ठेवली.त्याकाळी म्हणजेच १६८० ते १८३० च्या दरम्यान वारी देहू व आळंदीहून एकत्रितपणे जात असे.ही पालखी ज्ञानदेव व तुकोबा यांच्या पादुकांसह पायी,बैलगाडी,

हत्ती-घोडे,अंबारी अश्या भव्य विलोभनीय लव्याजम्यासह मोठया दिमाखात जाई.१८६० नंतर काही कौटुंबिक कारणांमुळे देहू व आळंदीच्या पालख्या विभक्तपणे जाऊ लागल्या.हत्ती घोडे यांचा लवाजमा कमी कमी होऊ लागला; अश्या वेळी “हैबतबाबा” यांनी पालख्यांना पुन्हा एकदा शिस्त व वळण लावले. शितोळे सरकार यांच्यातर्फे वारीच्या व्यवस्थेची व घोडयांची व्यवस्था केली गेली. ती परंपरा आजपर्यंत चालू आहे.वारीच्या रिंगणातील दोन घोडे हे शितोळे सरकारांच्या घराण्याकडून आजही येतात.वारीतील आजची शिस्त,भक्तीभाव,एकरूपता,निश्चलता,सौहार्द,समर्पण आणि शरणागती याचे सर्व श्रेय हैबतबाबांना जाते. म्हणून आजही आळंदीस देवळात त्यांची पायरी आहे.प्रथम त्यांना नमस्कार होतो. आणि मग ज्ञानोबांना.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

वारी हे रसायन वेगळेच आहे.

वारीची पहिली सार्वजनिक जागतिक पातळीवरील नोंद B.B.C ने घेतली. त्यानंतर ‘पंढरीची वारी’ हा जागतिक आकर्षणाचा विषय ठरला. आज अनेक परदेशी वारकरी पण वारीत सामील होतात. एकानेव आईनाकोवा या जपानी महिला वारकरी गेली ३५ वर्षे वारी करीत आहेत. नव्हे तो एक अभ्यासाचा विषय झाला आहे.

 

महाराष्ट्रातला अलौकिक असा हा पंढरीच्या वारीचा सोहळा जगाच्या कौतुकाचा, अभ्यासाचा आणि कुतूहलाचा विषय बनलेला आहे. त्यामुळे वारी अनुभवण्यासाठी दर वर्षी भारतासह परदेशी पाहुणे येत असतात. गेल्या काही वर्षांत डॉक्टर्स, इंजिनीअर्स, आय. टी. क्षेत्रातील मंडळी, कॉर्पोरेट क्षेत्रातले आणि सरकारी अधिकारी तसेच उच्चशिक्षितांचा वारीतला सहभाग वाढतो आहे. उत्कृष्ट व्यवस्थापनाचा उत्तम वस्तुपाठ म्हणून वारीकडे पाहायला हवे. अगदी शिस्तीने पन्नास माणसे एकत्र निघाली, तरी गोंधळ होतो. मग ही हजारो माणसे एवढ्या शिस्तीत कसा काय प्रवास करतात? ‘विठ्ठल’ नावाचे ध्येय कसे गाठतात? यासाठी वारीतले व्यवस्थापन जाणकारांनी अभ्यासले पाहिजे. वारीतल्या यशस्वी व्यवस्थापनाचे गमक खालील सूत्रात सापडते.

स्वशिस्त (self discipline) सौहार्द , सहचर्य, सहकार्य, समर्पण आणि शरणागती या षटसुत्रींवर हे सर्व चालते व ती कुणीही कुणावरही लादत नाही.

 

*स्वयंस्फूर्त सहभाग*

जाहीरात नाही, विनंती नाही,कोणतेही निमंत्रण न देता, एसएमएस न करता, मेल न पाठवता, मिस् कॉल न देता, व्हॉटस्अॅपवर चॅट न करता लाखो वारकरी एकाच वेळी एकाच ठिकाणी जमा होतात. आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर हा प्रवास अतिशय शिस्तबद्ध .रीतीने करतात. हा त्यांचा सहभाग स्वयंस्फूर्त असतो. त्यामुळे उत्साहात ते ध्येय गाठण्यासाठी वाटचाल करीत असतात.

 

*अचूक नियोजन*

दिंडीचा एक कार्यक्रम निश्चित केलेला असतो. पालखी निघण्यापूर्वी जेव्हा माउलींच्या पादुकांची पूजा केली जाते, तेव्हा पालखी निघण्याची वेळ झाली आहे हे समजण्यासाठी पाच-दहा मिनिटांच्या अंतराने तीन वेळा कर्णा होतो. पहिला कर्णा झाला की वारकारी निघण्याच्या तयारीला लागतात. सामानाची आवराआवर होते. दुसरा कर्णा होतो. तेव्हा सर्वजण पालखी सोहळ्यात सहभागी होतात. तिसरा कर्णा झाला की, पालखी निघते. काही अंतर चालले, की विसावा घेतला जातो. अर्ध्या तासाच्या विश्रांतीनंतर पुन्हा वाटचाल सुरू होते. दुपारच्या विश्रांतीसाठी पालखी थांबते. तेव्हा तिथेच भोजनाची व्यवस्था केलेली असते. भोजनानंतर विश्रांती घेऊन वारी चालून पुन्हा विसाव्यासाठी थांबते. आणि सूर्यास्ताच्या सुमाराला मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचते. हे नियोजन इतके अचूक असते की व्यवस्थापन शास्त्राच्या जाणकारांनी तोंडात बोट घालावे.

 

*स्वयंशिस्त*

एरवी सार्वजनिक आणि नागरी जीवनात अभावानेच दिसणारी स्वयंशिस्त वारीत आपला वेगळा ठसा उमटवून जाते. नियोजनातल्या क्रमाची घडी कुठेही विस्कटताना दिसत नाही. शे-पाचशे किंवा हजार लोकांची व्यवस्था करणे तुलनेने सोपे असते. पण जिथे लक्षावधी लोक सहभागी झालेले असतात. तिथेच व्यवस्थापनाचा खरा कस लागतो. पण स्वयंशिस्तीमुळे नियोजन कोलमडत नाही.

 

*समूहभावना*

वारी हे एकात्म आणि समूह भावनेचे उत्तम उदाहरण आहे. वर्षभर आपण ‘मी’ म्हणून जगत असतो. वारीत सहभागी होताना ‘मी’ विसरावा लागतो. मी चे ‘आम्ही’त रूपांतर करून वारी माणसांमध्ये समूह भावना निर्माण करते. माणसाला व्यापक आणि प्रसरणशील बनविते. मानव ही जात आणि मानवता हा धर्म हा विचार घेऊन एकात्म भावनेने वारकरी वारीत सहभागी झालेले असतात. गरीब-श्रीमंत, लहान-मोठा, सुशिक्षित-अशिक्षित असा कोणताही भेद वारीत नसतो.

ध्येयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा

वारी हे अलौकिक भक्तिनाट्य आहे. चैतन्य स्वरूप परब्रह्म पांडुरंग हे त्यांचे ध्येय आहे. वारकरी तहानभूक हरपून, प्रसंगी गैरसोयींवर मात करीत, संकटांचा सामना करीत वाटचाल करीत असतात. केवळ ‘ध्येय’ केंद्रस्थानी ठेवून इतर गोष्टी गौण मानून ध्येयाप्रती वाटचाल कशी करायची हे वारकऱ्यांकडून शिकायला हवे.

 

*समर्पण*

इतर कार्यक्षेत्रात अभावानेच आढळणारी समर्पण वृत्ती वारीत आढळते. वारकरी नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या तर पार पाडतच असतात. पण त्याखेरीज आयत्या वेळी अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्याही बिनबोभाट पार पाडत असतात. कार्याप्रती समर्पण कसे असावे हे वारीतून अवश्य शिकावे.

 

*सुसंवाद आणि सहकार्य*

‘पांडुरंग’ हे ध्येय गाठण्यासाठी वारीत सहभागी झालेली माणसे अहंकार आणि स्वाभिमान विसरून वाटचाल करीत असतात. एकमेकांना ‘माऊली’ म्हणून साद घालत असतात. त्यांच्यात सुसंवाद असतो. सहकार्याची भावना असते. त्यातून हा जगन्नाथाचा रथ पुढे जात असतो.

 

*परिस्थितीला समर्थपणे सामोरे जाण्याची मानसिकता*

एका बंदिस्त इमारतीतल्या ए. सी. कार्यालयाच्या खुर्चीत बसून उत्तम व्यवस्थापक म्हणून नाव मिळवणे वेगळे, कारण तो परिघ मर्यादीत असतो. माणसे आणि समस्या मर्यादीत असतात. त्या तत्काळ सोडविण्याची सक्षम यंत्रणा उपलब्ध असते. वारीत रोज नवे गाव, नवीन परिस्थिती आणि मुख्य म्हणजे येणाऱ्या समस्यांचे प्रकार आणि आकारही वेगळे. या साऱ्यावर मात करीत वारी सुरूच राहते. वाटेत एखादा अपघात होतो, दुर्घटना घडते. पण मागचे मागे सोडून पुढची वाटचाल सुरूच राहते. परिस्थितीला समर्थपणे तोंड देण्याची वृत्ती वारीतून शिकली पाहिजे. उपलब्ध साधन सामग्रीचा सुयोग्य वापर करून गरजा भागविणे. हे आदर्श व्यवस्थापनाचे सूत्र मानले जाते. ते वारीत प्रत्ययाला येते.

 

*आनंद आणि समाधान*

नफा, मोठे पद, लठ्ठ पगार, इन्क्रीमेंट, प्रमोशन या गोष्टी मिळूनही माणसे आनंदी नसतात. समाधानी असणे, ही तर खूप दूरची गोष्ट आहे. ‘जॉब सॅटिस्फॅक्शन’च्या चर्चा करीत अशी माणसे अस्वस्थ होत असतात. वारीत लाभ कोणताच नसतो. तरीही आनंद आणि समाधान वारकऱ्यांना मिळत असतो. निरपेक्ष वृत्तीने कसे काम करावे ? याचा तो वस्तुपाठ असतो. कामाशी पूर्णत: एकरूप झाल्यानंतर आनंद आणि समाधान मिळते. याचा तो अनुभव असतो.

 

वारी हा पाहण्याचा किंवा ऐकण्याचा विषय नाही. अनुभूतीच्या पातळीवर वारीचे जे दर्शन घडते. ते माणसांना जीवनाचे व्यवस्थापन कसे करावे ? याचे मार्गदर्शन करते. ‘ध्येय हेच पंढरपूर’ आणि ‘प्रयत्नांची पराकाष्ठा’ हीच वारी समजून वाटचाल केली तर ‘यशाचा पांडुरंग’ भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच ‘होय होय वारकरी। पाहे पाहे रे पंढरी। असे संतांनी म्हटले आहे. वारीतले हे आदर्श व्यवस्थापन पाहिल्यानंतर ‘कितीही विद्वान फक्त पहातच रहातो.

 

*लेखक :*

उध्दवबापु फड

संत साहीत्याचे अभ्यासक आहेत. १२ वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या वारीचे नियोजन प्रमुख !

 

*संकलन :*

शाहीर उत्तम रामचंद्र गायकर

भारत सरकार व महाराष्ट्र शासन पुरस्कृत !

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड नोंद तथा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरस्काराने राज्यपालांच्या हस्ते सन्मानित !


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!