Life Styleमनोरंजन

पंढरीच्या वारीचे आगळे-वेगळेपण…


भाग 3

ज्ञानेश्वरीमध्ये ‘वारी’ म्हणजे येरझारा. वारकरी संप्रदायात पंढरीच्या वारीला नितान्त महत्त्व आहे. वर्षातून एकदा वारकर्‍याने पंढरीच्या विठूरायाचे दर्शन घ्यावे . असा प्रघात आहे. गळ्यांत तुळशीमाळा, कपाळी बुक्का, कानाच्या दोन्ही पाळ्यांना गोपीचंदन, खांद्यावर पताका आणि हातात टाळ मृदुंग अशा थाटात वारकरी वारीला जाताना दिसतात. पंढरपूरच्या वारीचा हा सोहळा अभूतपूर्व असतो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचे ते एक अंग आहे.

पुणे,सातारा,सोलापूर या तीन जिल्ह्यातून हा सोहळा चालतो. याचे नियोजन ज्ञानेश्वर संस्थानातर्फे केले जाते. दरवर्षी जेष्ठ वदय अष्टमीला आळंदीहून विधीपूर्वक पालखीचे प्रस्थान होते. आषाढ शुद्ध एकादशीला पंढरपूरात तिचे आगमन होते. आषाढ पौर्णिमेपर्यंत पंढरपूरात माऊलीचा उत्सव असतो. आषाढ वद्य एकादशीला पालखीचा परतीचा प्रवास सुरु होऊन आषाढ वदय दशमीला पालखी आळंदीला परत येते.

नाशिक व्हॅाटसअप ग्रुपJoin
नाशिक व्हॅाटस्अप चॅनलJoin

प्रत्येक मुक्कामात व सोहळ्याबरोबर पोलिस व होमगार्ड यांचा बंदोबस्त असतो. ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्यामार्फत सोहळ्याला विविध सोयी सुविधा पुरवल्या जातातच. पण सर्व ठिकाणी दानशूर मंडळी वारकर्‍यांना भोजन, शिधा, फराळाचे पदार्थ वाटत असतात. कोणी रहाण्या झोपण्याची व्यवस्था करतात. पूर्वी बैलगाड्या, घोडे, पायी असा हा प्रवास व्हायचा आता ट्रक, मोटारी यांचा समावेश झाला आहे. अर्थात वारकरी पायीच चालतो, शिधा, तंबू, गॅस, रॉकेल, झोपण्याचे साहित्य इ. सामान गाडीमध्ये असते.

वारीच्या मध्यभागी ज्ञानदेव माऊलीच्या चांदीच्या पादुका ठेवलेला रथ असतो. रथापुढे मानाच्या सत्तावीस दिंड्या असतात. मान्यता मिळालेल्या अन्य दिंड्या रथाच्या मागे असतात. अर्थात पहिली दिंडी माऊलीची असते. भजन, कीर्तन करीत वारकरी मार्गस्थ होत असतात. वारीची ही एक पदयात्राच असते. तिचा मार्ग ठरलेला, मुक्काम ठरलेले असतात. ठराविक मुक्कामाच्या ठिकाणी, माऊलींच्या घोड्यांची रिंगणे होतात. पहिले उभे रिंगण ‘चांदोबाचा लिंब’ येथे, लोठांद- तरडगांव या मार्गावर होते. दुसरे गोल रिंगण ठाकूरबुवांच्या समाधीजवळ, भंडी -शेगाव या गावाजवळ खुड्रसफाटा येथे होते. वाखरी पंढरपूर या गावाजवळ शेवटची रिगणे होतात. वाटेत माऊलीच्या पादुकांना नीरा नदीत स्नान व पौर्णिमेला स्नानानंतर विट्ठल रखुमाई यांच्या चरणी भेट हा महत्त्वाचा कार्यक्रम असतो.

पंढरीच्या वारीची वैशिष्ट्ये :-

 

१) दिंडी :- प्रत्येक दिंडीमध्ये एक वीणेकरी एक पखवाज वादक असतो. दिंडीपुढे पताकाधारी वारकरी असतो. शिवाय डोक्यावर तुळशी वृंदावन किंवा पाण्याचा हंडा घेतलेल्या महिला व टाळकरी असतात. दिंडीमागून महिला वारकरी जातात. वीणेकरी हा दिंडीचा प्रमुख असतो. तो सांगेल त्याप्रमाणे भजने, हरीपाठ इत्यादिचे गायन करत टाळ मृंदुंगाच्या तालात नाचत वारकरी पुढे जातात.

 

२) रिंगण- वारीला पायी जाताना येणारा थकवा जाण्यासाठी एकूण सहा ठिकाणी रिंगण घातली जातात. खडे रिंगण व गोल रिंगण असे रिंगणाचे दोन प्रकार आहेत. खडे रिंगणाच्या वेळी माऊलीच्या दिंडीतील चोपदार वारकर्‍यांना दोन बाजुला उभे करून घोड्यांना पळण्यासाठी वाट करतात. माऊलीच्या घोड्यावर नुसतेच जीन टाकलेले असते. जरिपटक्याच्या अश्वावर चोपदार बसलेला असतो. त्याने इशारा करताच दोन्ही घोडे दिंड्यांच्या शेवटपर्यंत पळत जातात व परत फिरून मध्यभागाच्या माऊलीच्या रथावर पाय टेकवून माऊलीच्या पादुकांवर मस्तक टेकवतात. मग त्या घोड्यांना हार, बुक्का, खारीक, खोबर्‍याचा प्रसाद व चारा मिळतो. फुगड्या, झिम्मा, “पुंडलीक वरदा हारी विट्ठल”चा गरज करत वारकरी नाचत असतात. गोल रिंगाणात चोपदार सर्व दिंड्यांना गोलाकार उभे करतात. पालखी मध्याभागी येईपर्यंत दिंड्यातील वारकरी विविध खेळ खेळतात. पालखी मध्यभागी आली की सर्व पताकेवाले पालखीला स्पर्श करून आशीर्वाद घेतात. रिंगणात फुगड्या ,झिम्मा आदि खेळ खेळतात. “ज्ञानोबा तुकाराम”, “पुंडलिक वरदा हरि विट्ठला”चा गजर करतात. एका घोड्यावर चोपदार हातात झेंडा घेऊन असतो. दुसरा घोडा माऊलीचा असतो.सेवक त्याला पालखीच्या ठिकाणी आणतो. पालखीचे दर्शन घेऊन थोडे अंतर फिरवून चोपदाराच्या घोड्यामागे घोडा सोडला जातो. त्याने धावत जाऊन चोपदाराच्या घोड्याला मागे टाकले की रिंगण पूर्ण होते. त्यानंतर सर्व दिड्यांतील टाळकरी, मृदुंगवाले, विणेकरी एकत्र येतात. चोपदारच्या इशार्‍यावरून एकच ताल धरून एकाच सुरात गजर करतात. टाळकरी कधी बसतात. कधी उभे रहातात. कधी आडवे पडतात. मृदुंगवाले एका तालात सामुदायिकपणे उडी घेतात. असे अनेक कार्यक्रम होऊन रिंगण संपते.

 

३) कीर्तन :- वारकरी संप्रदायातील कीर्तन परंपरेचे प्रवर्तक संत नामदेव मानले जातात. यापद्धतीत इतर किर्तनासारखा पूर्वरंग, उत्तररंग, आख्यान असे काही नसते. या कीर्तनात सांप्रदायिक भजनाला प्राधान्य असते. कीर्तनात मृदुंग, टाळ, पखवाज व वीणा एवढी वाद्ये असतात. आणि देव, संत, नाममहात्म्य्,गुरुकृपा असेच विषय असतात. सुरवातीला मागे टाळकरी उभे राहून” सुंदर ते ध्यान” हा अभंग म्हणून कीर्तन सुरु करतात. मग कीर्तनकार वीणा हातात घेऊन “रुप पाहता लोचनी” हा अभंग म्हणतात. नंतर वीणा विणेकर्‍याकडे देऊन निरुपणासाठी निवडलेला अभंग चालीवर गातात. टाळकरी त्यांना साथ देतात. अभंगाचे निरुपण विद्वत्तापूर्ण असते. मधूनमधून नामसंकीर्तन होत असते.

 

४) प्रदक्षिणा :- वारीला आलेला भक्त पंढरपुरातील विविध मंदिरे आणि पवित्र स्थाने याचे दर्शन घेतो. तीच प्रदक्षिणा. ही दोन प्रकारची असते. छोट्या प्रदक्षिणेस ‘देव प्रदक्षिणा’ म्हणतात. भक्त महाद्वार घाटापासून सुरुवात करतो. नंतर तो पुंडलिक मंदिराकडे जातो. तेथून दत्तात्रेय, काळा मारुती ,चोपाळा यांचे दर्शन घेऊन शेवटी उद्धव घाटाची फेरी पूर्ण करतो. यात विट्ठल मंदिर व त्याच्या वर्तुळाकार टप्यातील मंदिरे असतात. मोठ्या प्रदक्षिणेला ‘नगर प्रदक्षिणा’असे म्हणतात. यासाठी भक्त आधी महाद्वार घाटापाशी चंद्रभागेत उतरतो, पुंडलिक मंदिराचे दर्शन घेतो. मग होडीतून विष्णूपद मंदिराकडे जातो. त्यानंतर नारद, अनंतपूर, गोपाळपूर, लखुबाई व अंबाबाई यांचे दर्शन करून महाद्वार घाटाकडे परत येतो.

 

लेखक : उध्दवबापु फड

महाराष्ट्र शासनाच्या प्रबोधन दिंडी प्रमुख म्हणून१२ वर्षे काम केले असून अध्यात्मिक साहित्याचे अभ्यासक आहेत .

 

संकलन : शाहीर उत्तम रामचंद्र गायकर भारत सरकार व महाराष्ट्र शासन पुरस्कृत !

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड नोंद ! मा. राज्यपालांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरस्काराने सन्मानित !


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!