*पंढरीची वारी… महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव*

भाग २
*पंढरीची वारी… महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव
वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा व अध्यात्मिक लोकशाही बळकट करणारी आहे. वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरु होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा होय. वारी करणार्या व्यक्तीस वारकरी म्हणतात.
पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक ऐश्वर्य आहे, वैभव आहे. ‘वारी’ म्हणजे पंढरीचीच!
तिरुपती, काशी, किंवा तिरुअनंतपुरम या तीर्थक्षेत्रांना या भेटींना वारी म्हटले जात नाही.पंढरीच्या वारीला शेकडो वर्षांचा प्राचीन इतिहास व वैभवशाली परंपरा आहे.आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या दिंडीसमवेत गात, नाचत, गर्जत पायी पंढरपूरला जाण्याचा सुखानंद, जीवन धन्य करणारा अनुभव आहे.
*आषाढी कार्तिकाचा सोहळा । चला जाऊ,पाहू डोळा ॥*
संत तुकाराम महाराजांचे हे अभंग चरण अवघ्या मराठी भाविक मनाचे मनोगत आहे.पंढरीची वारी करावी. असे वाटणे हेच मराठीपण आहे. मराठी मनाची हीच नेमकी व यथार्थ ओळख आहे. पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे,तसेच पारमार्थिक ऐश्वर्य आहे.
पंढरीच्या या वारीला प्राचीन इतिहास व परंपरा आहे. पंढरीच्या वारीचा उल्लेख असलेले चौथ्या-पाचव्या शतकातील ताम्रपट उपलब्ध आज ही आहेत. वारीचा हा सर्वात प्राचीन पुरावा आहे.
त्यानंतर होयसळ सम्राटांच्या काळातील शके ११५९ (इ.स.१२३७)चा शीलालेख आपणास वारीची प्राचीनता सांगतो. ताम्रपट, शिलालेख यानंतर संत ज्ञानदेवांच्या अभंगातून कागदोपत्री ठोस आधार मिळतो. संत ज्ञानदेवांच्या घरामध्ये पंढरीची वारी होती.या सर्व ठोस पुराव्यांवरून पंढरीची वारी गेली हजार-बाराशे वर्षे अखंड,अव्याहतपणे सुरू असल्याचे स्पष्ट होते.
‘माझी जिवीची आवडी।
पंढरपुरा नेईन गुढी ॥
असा संत ज्ञानदेवांचा एक अभंग प्रसिध्द आहे.पंढरीच्या वारीची आवड ही आपल्या जिवीची आवड आहे .असे सांगून, ‘भेटेन माहेरा आपुलिया।’ म्हणत ज्ञानदेव पंढरीला आपले’माहेर’ संबोधतात. ‘माहेर’ या विशेषणातच पंढरीचे अवघे माहात्म्य सामावलेले आहे. पंढरी सोडून देशातील अन्य
कोणत्याही तीर्थक्षेत्राला कोणत्याही संत-महात्म्यांनी ‘माहेर’ म्हटलेले नाही, हेच पंढरीचे वेगळेपण आहे. पंढरीची वारी एकटयाने नव्हे, तर सामूहिकपणे करण्याची वारी आहे. इथे वैयक्तिक नव्हे, तर सामूहिक भक्तीला विशेष महत्त्व आहे.आणि ही वारी कशी करायची? तर अभंग गात गात, खेळीमेळीने, आनंदाने नाचत.
“सोपे वर्म आम्हां सांगीतले संती ।
टाळ दिंडी हाती घेऊनी …
गर्जत,नाचत पंढरीकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या या दिंडया म्हणजे चैतन्याचा प्रवाह. या दिंडयांचे दर्शनही चित्त प्रसन्न करणारे. खुद्द संत ज्ञानदेवांनाही वारकऱ्यांच्या दिंडीचे वर्णन करण्याचा मोह अनावर झालेला दिसतो. ज्ञानदेव म्हणतात,
कुंचे पताकांचे भार। आले वैष्णव डिंगर ।
संत ज्ञानदेवांप्रमाणेच संत नामदेव, संत जनाबाई,संत चोखोबा, संत एकनाथ,संत तुकाराम महाराज,संत बहिणाबाई यांनी पंढरीच्या वारीचे -वारकरी दिंडीचे वर्णन करणारे अनेक अभंग उपलब्ध आहेत.
नामा म्हणे धन्य झाले ते संसारी ।
न सांडिती वारी पंढरीची ॥
संत नामदेव महाराज म्हणतात, ”जे पंढरीची वारी चुकवीत नाहीत, ते संसारी धन्य होतात.” संसार सोडून वा तुच्छ मानून परमार्थ करणाऱ्यांना संत नामदेव या अभंगातून संसार व परमार्थ दोन्ही सफल सुफल कसा करता येतो, ते सांगतात.संत नामदेव, संत एकनाथ ,दामाजी, संत तुकाराम, संत बहिणाबाई, संत निळोबा हे सारे संत संसारी होते. परमार्थ साधनेसाठी संसार सोडून संन्यास घेण्याची गरज नाही,हे या संतांनी सोदाहरण दाखवून दिले.
तुकाराम महाराजांची वारी पंढरीची वारी हा सकल समाजाला संतांनी दाखविलेला परमार्थाचा सर्वात सोपा असा महामार्ग आहे. पंढरीची वारी वारकऱ्यांचे व्रत आहे. तसेच ती उपासना व साधना आहे.म्हणून संत तुकाराम
महाराज म्हणतात.
संपत्ती सोहळा नावडे मनाला।
लागला टकळा पंढरीचा ॥
जावे पंढरीशी आवडी मनाशी।
कै एकादशी आषाढी ये ॥
संत तुकाराम महाराज वारकऱ्यांची दिंडी घेऊन आषाढी वारीस जात असत. दिंडीत त्यांच्यासमवेत १४०० (चौदाशे) वारकरी असत, असे संत चरित्रकार महिपती यांनी लिहून ठेवलेले आहे
तुक्याचे सप्रेम कीर्तन।
ऐकोन लागले भक्तीस जन।
ते चवदाशे पताका घेऊन।
पंढरीस जाण चालले॥
संत तुकाराम महाराजांनंतर त्यांचे बंधू व सुपुत्र नारायण महाराज घराण्यातील पंढरीच्या वारीची परंपरा पुढे चालवितात. संत ज्ञानदेव – संत तुकोबांच्या पादुका पालखीत घेऊन ते वारी करतात. त्याला सोहळयाचे रूप देतात.पुढे या परंपरेत काही विघ्न येते. पण विघ्न आले म्हणून वारी थोडीच बंद पडते?
देह जावो अथवा राहो। पांडुरंगी दृढ भावो।’
असा संकल्प करून इ.स.१८३२ साली ज्ञानदेवभक्त ,हैबतबाबा आळंदी ते पंढरपूर असा पालखी सोहळा सुरू करतात.हा पालखी सोहळा पाहून
ठिकठिकाणच्या संतभूमीतून विविध संतांच्या पालख्यांचा प्रारंभ होतो.
त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तिनाथांची, अदिलाबादहून संत मुक्ताईची, साताऱ्याहून संत रामदासस्वामींची, सासवडहून संत सोपानदेवांची, शेगावहून संत गजानन महाराजांची, पैठणहून संत एकनाथांची,पुणतांब्याहून संत योगी चांगदेवांची, सुदुंबरेहून संत संताजींची व संत गवरशेट यांची भगवानगडावरून भगवान बाबाची अशा शेकडो पालख्या आषाढी वारीसाठी पंढरीस पायी वाटचाल करीत असतात.
जाता पंढरीसी ! सुख वाटे जीवा
ज्येष्ठ महिना आला की वारकऱ्यांना पंढरीच्या वारीचे वेध लागतात. सासुरवाशीणीला श्रावणात माहेरची आठवण जशी व्याकूळ करते, तसे पंढरीच्या भेटीसाठी वारकरी व्याकूळ होतात.
‘जाईन गे माये तया पंढरपुरा ।
भेटेन माहेरा आपुलिया।’
अशा भावावस्थेत वारकरी सहभागी होतात. महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून
वेगवेगळया संतांच्या २५० ते ३०० पालख्या ज्येष्ठ महिन्यात समारंभपूर्वक प्रस्थान ठेवतात व पंढरीकडे मार्गक्रमण करतात. ‘जाता पंढरीसी।सुख वाटे जीवा।’ अशी ही पायी वाटचाल सुखाचा आनंद सोहळाच असतो. तथाकथित बुध्दिवादी पुरोगाम्यांना पंढरीची वारी ही रिकामी पायपीट वाटते, ती केवळ अज्ञानामुळे. वारीचा भावार्थ,वारीचे अंतरंग आणि वारीची समाजाभिमुखता,
समाजसंवाद याचा ते भौतिक अंगाने जवळून विचार-अभ्यास करतील, तर त्यांनाही पंढरीवारीचे अनंत-अगाध असे
माहात्म्य – म्हणजे वेगळया शब्दात ‘सामाजिक योगदान’ – लक्षात येईल.
पंढरीची वारी व अन्य तीर्थक्षेत्री होणाऱ्या यात्रा यामध्ये फरक आहे.पंढरीची यात्रा नव्हे, तर ‘पंढरीची वारी’.काशीला गंगास्नानास, ज्योर्तिलिंग दर्शनास जातो, ती काशी यात्रा. चार धाम दर्शनास जातो ती चारधाम यात्रा. या यात्रांना कोणी वारी म्हणत नाही. ‘वारी’ म्हणजे फक्त पंढरीचीच!
यात्रा ही केव्हाही, सोईसवडीने केली जाते. यात्रेला विशीष्ट कालबध्दतेचे बंधन नसते. याउलट नियमितपणा व सातत्य हेच पंढरीच्या वारीचे मुख्य वैशीष्टय आहे. ‘वारी’ या शब्दाचा शब्दकोशातील अर्थ ‘फेरी, खेप’ असा आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी नियमितपणे,सातत्याने पुन्हा पुन्हा पंढरीला जाणे, फेरी करणे
म्हणजे ‘वारी’. यात्रा पुन्हा पुन्हा करण्याचे बंधन नाही. पण पंढरीची वारी एकदा घेतलेल्या संकल्पानुसार मरेपर्यंत आजीवन केली जाते. एवढेच नव्हे तर
वडिलांची-आजोबांची वारी त्यांच्या मृत्यूनंतर मुले-नातवंडे मोठया निष्ठेने करतात. म्हणून ‘पंढरीची वारी’ अनेक घराण्यांमध्ये अनेक पिढया चालत आलेली दिसते. ‘पंढरीची वारी आहे
माझे घरी’ असे अभिमानाने सांगणारी हजारो घराणी महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर आहेत.आपण काशीला, तिरुपतीला,चारधामला जातो. तेव्हा लोक आपणास ‘यात्रिक’,’भाविक’, ‘यात्रेकरू’ म्हणून संबोधतात, ‘वारकरी’ म्हणत नाहीत. पंढरीस येणारे सर्वजण भाविक असतातच, पण त्यांना ‘वारकरी’ म्हटले जाते.वारी म्हणजे पंढरीची आणि वारकरी म्हणजे पंढरीचाच. अशा प्रकारे वारी,वारकरी आणी पंढरी या शब्दांचा भावबंध आहे.
वारीतील प्रमुख विधी एखादा भाविक वारकरी होण्यासाठी पंढरीत जाऊन तुळशीची माळ विधिपूर्वक गळयात घालून पंढरीच्या वारीचा संकल्प करतो. आणि ‘वारकरी’ होतो. पंढरीमध्ये वर्षभरात चैत्री, आषाढी, कार्तिकी व माघी अशा ४ वाऱ्या भरतात. पैकी आषाढी व कार्तिकी यांना प्रमुख वाऱ्या मानले जाते.आषाढी वारीपासून चतुर्मास प्रारंभ होतो. व कार्तिकी वारीने चर्तुमासाची समाप्ती होते.आषाढी वारी व कार्तिकी वारीच्या सोहळयाएवढाच पंढरपुरातील चतुर्मास पारमार्थिकांना,साधकांना आत्मानंद देणारा असतो. संत पंढरीला
‘सर्व सुख आहे भिवरेची तिरी। माझी पंढरी कामधेनू।’
असे का गौरवितात, त्याचा रोकडा अनुभव,प्रचिती चतुर्मासात येते. अर्थात
त्यासाठी वारकरी होऊन भक्तिभावाने या श्रवणसुखाला सन्मुख गेले पाहिजे.
पंढरीच्या आषाढी वारीसाठी पायी जाणारे विविध संतांचे पालखी सोहळे हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक ऐश्वर्य आहे. ही केवळ एक धार्मिक घटना नसून जनजागृती करणारे भक्ती-आंदोलन आहे.पंढरीच्या वारीला शेकडो वर्षांचा इतिहास आहे.महाराष्ट्रावर मोगलांनी व
इंग्रजांनी शेकडो वर्षे राज्य केले, अनेक संकटे आली, पण वारकऱ्यांनी ‘पंढरीची वारी’ कधीही बंद पडू दिली नाही. या वारकरी निष्ठेला दंडवत. १९४४ साली इंग्रजांनी अन्नधान्य टंचाईचे कारण देऊन पंढरीच्या वारीवर बंदी घातली होती.पण
‘देह जावो अथवा राहो। पांडुरंगी दृढ भावो॥’
अशा जाज्वल्य निष्ठेच्या जोरावर, वीर सावरकरांच्या नेतृत्वाखाली व मार्गदशनाखाली वारकऱ्यांनी ब्रिटिश
सरकारला ही बंदी मागे घेण्यास भाग पाडले. व वारी पूर्वीप्रमाणेच पार पडली.
दिंडी, पालखी, वारी यांना घरात टी.व्ही.पुढे बसून नावे ठेवू नका. त्यामध्ये थोडा वेळ स्वत:सहभागी व्हा ! आणि मग बोला. सामाजिक अभिसरणाचा, सामाजिक समरसतेचा हा भक्तिसोहळा म्हणजे जगाच्या पाठीवरील एकमेवाद्वितीय आनंद सोहळा आहे.
🙏🏻
लेखक : उध्दवबापु फड
संत साहित्याचे अभ्यासक व
दिंडी प्रमुख म्हणून १२ वर्षे काम केले आहे .
संकलन : शाहीर उत्तम गायकर
भारत सरकार व महाराष्ट्र शासन पुरस्कृत वर्ल्ड बु
क ऑफ रेकॉर्ड नोंद व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरस्काराने मा. राज्यपालांच्या हस्ते सन्मानित !
