देवळा : तालुक्यातील लोहणेर-ठेंगोडा गावादरम्यान वाहणाऱ्या गिरणानदी पात्रातून बेसुमार वाळू उपसा होत असल्याची बातमी प्रकाशित झाल्यानंतर महसूल आणि पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर आले आहे. गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या होणारी वाळूची वाहतूक रोखण्यासाठी देवळा तालुका महसूल प्रशासनाने गिरणानदी पात्रात जाणाऱ्या रस्त्यांवर जेसीबीच्या साहाय्याने ठिकठिकाणी मोठे मोठे खड्डे खोदले आहेत. हे खड्डे बुजवल्यास संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देवळा तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी दिला आहे.
गिरणा नदीपात्रातून होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी भरारी पथके कार्यान्वित असून या पथकांच्या माध्यमातून अवैध वाळू उपशाला अंकुश लावला जाणार आहे. तसेच गिरणानदी पात्रात जाण्यासाठी वाळूमाफिया ज्या मार्गांचा वापर करतात त्या रस्त्यांवर महसूल प्रशासनाच्या वतीने जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर मोठया चाऱ्या खोदण्यात आल्या असून मार्ग बंद करण्यात आले आहेत.
हे खड्डे पुन्हा वाळूमाफियांनी बुजवल्यास अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहितांतर्गत गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी दिला आहे. यामुळे रात्री-बेरात्री होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.