देवळा : नाफेडचे राज्य संचालक केदा आहेर यांच्या मध्यस्थीनंतर देवळा तालुक्यात भावडघाट ते लोहोणेर ह्या राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व गटधारक शेतकऱ्यांनी स्वखर्चाने तातडीने गट मोजण्याचा निर्णय घेतला असून, भूमी अभिलेख कार्यालयात मोजणीचे पैसे भरण्यास प्रारंभ केला आहे. शेतकऱ्यांच्या ह्या सकारात्मक भुमिकेमुळे गत पाच महिन्यांपासून तालुक्यात राष्ट्रीय महामार्गाचे ( क्र. ७५२जी ) ठप्प झालेल्या कामास चालना मिळाली असून, ह्या धोकादायक मार्गावर जीव मुठीत धरून प्रवास करणाऱ्या नागरीकांना, व वाहनचालक रस्त्याचे काम लवकर सुरू होण्याची प्रतिक्षा करीत आहेत.
सदर रस्ता कामापैकी भावडघाट परीसरातील एस.के.डी विद्यालय ते रामेश्वर फाटा ह्या ६ कि.मी अंतरात एका लेनच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. सद्या दोन्ही बाजूकडून जाणाऱ्या वाहनांसाठी पूर्व बाजूकडील एक लेन खुला करण्यात आला असून ह्या एकेरी मार्गावरून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. परंतु दोन्ही बाजूने जाणाऱ्या वाहनांसाठी हा अरूंद रस्ता धोकादायक ठरत आहे.पूर्व बाजूला खचलेली साईड पट्टी व पश्चिम बाजूला दुसरे लेन तयार करण्यासाठी केलेले खोदकाम यामुळे वाहन चालकांना ह्या एकेरी अरूंद मार्गावरून वाहन चालवतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ह्या मार्गाचे उर्वरीत काम त्वरीत पूर्ण करण्याची मागणी नागरीक सातत्याने करत होते.
ह्या मार्गाचे रखडलेले काम सुरू करण्यासाठी बुधवार दि. ३ रोजी सकाळी ११ वाजता नाफेडचे राज्य संचालक केदा आहेर यांच्या अध्यक्षतेखाली भावडघाट ते देवळा ह्या महामार्गालगतच्या शेतकऱ्यांची देवळा येथेशासकीय विश्रामगृहावर बैठक घेण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी शासनाच्या कामाविषयी नाराजी व्यक्त करून राष्ट्रीय महामार्गाची रुंदी किती आहे? या बद्दल देखील शेतक- यांना कोणतीही अधिकृत माहीती वर्षभरापासून वारंवार मागणी करूनही मिळत नसल्याबद्दल तक्रार केली. केदा आहेर यांनी त्वरीत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला व सदर माहीती शेतकऱ्यांना दिली. यावेळी सर्व शेतकऱ्यांनी त्यांचे गट स्वखर्चाने तातडीच्या मोजणी करता त्वरीत पैसे भरण्याचा निर्णय घेण्यात येऊन त्यास सर्वांनी मान्यता दिली. केदा आहेर यांनी आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास देऊन ह्या मार्गावरील सर्व गटांची तातडीने मोजणी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
बैठकीस सरपंच चंद्रकांत आहेर, डॉ. हरीश्चंद्र आहेर, अमीत मोरे, विजय मोरे, दिपक भदाणे, दर्शन भदाणे, विजय आहेर, अशोक आहेर, पोपट आहीरराव, तुळशिराम आहेर, भाऊसाहेब गुंजाळ आदींसह शेतकरी उपस्थित होते.
एसकेडी विद्यालय ते रामेश्वर फाटा हे ६ कि.मी. कॉंक्रीटीकरणाचे काम रखडल्यामुळे ह्या मार्गावर सुसाट वेगाने जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेसनी मोठी दहशत निर्माण केली आहे. दोन दिवसांपूर्वी शालेय शिक्षणासाठी देवळा येथे जाण्यासाठी रस्त्याकडेला उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांवर सुसाट वेगाने जाणाऱ्या बसने एवढा चिखल उडवला कि ह्या सर्व विद्यार्थ्यांना घरी जाऊन कपडे बदलून शाळेत जावे लागले होते.ह्या अरूंद मार्गावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने, तसेच समोरून येणाऱ्या, व ओव्हरटेक करतांना वाहनाच्या गतीचा अंदाज न आल्यामुळे सातत्याने अपघात होत आहेत. पावसामुळे अपघातांचे प्रमाणात वाढ झाली आहे. मंगळवार दि. २ रोजी सकाळी पाऊस सुरू असतांना हॉटेल गोदावरी परीसरात समोरासमोर दोन कारचा अपघात होऊन एक कार दुसरे लेन तयार करण्यासाठी खोदकाम केलेल्या खड्यात कोसळली. एस केडी विद्यालय ते रामेश्वर फाटा ह्या ६ कि.मीचा मार्ग पावसाळ्यात सर्वात धोकादायक झाला असून त्यावर अपघात होण्याचे प्रमाण वाढू लागल्यामुळे अपघात प्रवण क्षेत्र होण्याकडे त्याची वाटचाल सुरू आहे.