अध्यात्मिक लोकशाही बळकट करणारी जगात भारी पंढरीची वारी….
भाग १
पांढरीची वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक ऐश्वर्य आहे, वैभव आहे….
वारी … शब्दच भारी असं काहीतरी चित्र डोळ्यांसमोर आणून ठेवतो. अन प्रवास सुरु होतो. धेय्यवेड्या पावलांचा एकाच दिशेने टाळ,मृदंग,वीणा,चिपळ्या आणि पताकांसोबत. वारी काय आहे ? हे जाणून घ्यायचं असल तर प्रत्यक्ष वारीत सहभागी होण्याशिवाय पर्यायच नाही.
मराठी माणसांची प्रमुख ओळख काय असेल तर ती एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरी म्हणजे “पंढरीची वारी” ! वारी आणि त्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन गेल्या दहा वर्षात कमालीचा बदललाय असं म्हणलं तर काही वावगं वाटणार नाही. वारी म्हणजे फक्त टाळ पताका घेऊन चालणारे वारकरी नाहीत. त्यामागे आहे एक प्रबळ एकतेचा समानतेचा विचार जो संतांनी दाखवलेल्या मार्गातून वर्षानुवर्षे अधिकाधिक दृढ होत चालला आहे.
वारीची व्याख्या
मार्ग दाऊनी गेले आधी | दयानिधी संत पुढे॥तेणेचि पंथे चालो जाता | न पडे गुंता कोठे काही॥
भागवत धर्माच्या तत्त्वज्ञानाचे जागरण घडविणारा वारकरी संप्रदाय म्हणजे मराठी संस्कृतीचा मेरुदंडच जणू ! तर, आषाढीची पायवारी म्हणजे वारकरी संप्रदायाच्या आचारधर्माचा मेरुमणी. पंढरीची वारी ही महाराष्ट्राची आत्मखूण आहे. संतांना बरोबर घेऊन त्याच संतांचे अभंग गात विठ्ठलाच्या भेटीस जाण्याचा वारीचा हा सोहळा आणि त्याची शतकानुशतकांची परंपरा जगात एकमेवाद्वितीयच. मराठी संस्कृती आणि प्रकृती यांचा मनोज्ञ संगम होतो या वारीत. महाराष्ट्रातील निसर्गाचे वेळापत्रक आणि वारीचे वेळापत्रक यांचा मेळ जुळविला आमच्या संतांनी. प्रपंचात राहून परमार्थ करण्याचा आचारधर्म शिकवते वारी. त्यामुळे, एखाद्या वर्षी पावसाचे आगमन पुढे-मागे झाले तर प्रस्थानाला हजेरी लावू न शकलेला वारकरी पुढच्या मुक्कामावर वारी सोहळ्यात सामील होतो. त्यामुळे काहीच बिघडत नाही. कारण वारकरी आणि श्री विठ्ठल यांचे नाते आहे निखळ प्रेमाचे.
‘वारकरी’ म्हणजे ‘वारी’ करणारा. ‘वारी’ याचा अर्थ ‘येरझारा’. असा जो, येरझारा करतो तो वारकरी. ही येरझारा आपल्या गावाहून उपास्य देवतेच्या गावी असते. ती नियमाने होते. उपास्य देवता खंडोबा, भवानी आई अशा भिन्न असू शकतात; पण ‘वारकरी’ हा शब्द मात्र पंढरपुरातील श्रीविठ्ठलाची उपासना करणा-या भक्तासाठीच योजला जातो.
‘हीच व्हावी माझी आस | जन्मोजन्मी तुझा दास॥
पंढरीचा वारकरी | वारी चुको न दे हरी॥
असे मागणेच तुकोबारायांनी पंढरीनाथांकडे मागितलेले आहे.
वारीची परंपरा ही माऊलीच्याही पूर्वीपासून चालत आलेली आहे. माऊलींचे पणजोबा श्री त्र्यंबकपंत कुलकर्णी हे सुद्धा आपेगाव ते पंढरपूर वारी करत. माऊली, श्री नामदेवमहाराज, सांवतामाळी, चोखोबा, तुकाराम महाराज आदी सर्व संतांची मांदियाळी त्यांच्या काळात पंढरीच्या पांडुरंगाची वारी करीत असे. किंबहुना, ज्या भागवत-धर्माची मुहूर्तमेढ श्री संतांनी रोवली त्याचा विस्तार करण्यासाठी त्यांचे एकत्र भेटण्याचे ठिकाण व समय म्हणजे पंढरीची आषाढ शुद्ध एकादशीची वारी असेच म्हणावे लागेल.
आजच्या पालखी सोहळ्याची परंपरा ही जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनंतर त्यांचे चिरंजीव तपोनिधी श्री नारायण महाराज देहुकर यांनी इ.स. १६८५ साली म्हणजेच जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमनानंतर (इ.स. १६४९) ३६ वर्षांनी सुरू केली. तुकोबारायांच्या पादुका श्री देहू क्षेत्रावरून पालखीत घालून श्री क्षेत्र आळंदीत येऊन श्री माऊलींच्या पादुकांसमवेत पंढरीस घेऊन जाण्याची परंपरा अशी सुरू झाली. तपोनिधी श्री नारायण महाराज देहुकर यांनीच वारी सोहळ्यात आणि संप्रदायात ‘ज्ञानोबा-तुकाराम’ या भजनाची प्रथा सुरू केली. हा ऐश्वर्यपूर्ण पालखी सोहळा इ.स. १६८५ पासून इ.स. १८३० पर्यंत एकत्रितपणे सुरू राहिला. त्यानंतर पुढे देहुकर मोरे यांच्या सांगण्यावरून थोर भगवद्भक्त व पूर्वाश्रमीचे श्रीमंत शिंदे सरकार यांचे पदरी सरदार असणारे; परंतु नंतर विरक्त होऊन आळंदीस वास्तव्यास असणारे श्रीगुरु हैबतबाबा यांनी इ.स. १८३१ पासून श्री माऊलींच्या पादुकांची स्वतंत्र आषाढ वारी सुरू केली. आज जो पालखी सोहळा आपणास दिसतो त्याचे हे विशेष स्वरूप श्रीगुरु हैबतबाबा यांनीच सिद्ध केले.
सातारा जिल्ह्यातील आरफळ हे श्रीगुरु हैबतबाबांचे मूळ गाव. पुढे ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांच्या दरबारात श्रीगुरु हैबतबाबांनी सरदार म्हणून मोठा लौकिक प्राप्त केला. त्यानंतर, मूळ गावाची भेट घडावी या हेतूने लवाजमा व संपत्ती बरोबर घेऊन श्रीगुरु हैबतबाबा गावी यायला निघाले. मात्र सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये भिल्लांनी त्यांची सर्व संपत्ती हरण करून त्यांना व त्यांच्या बरोबरच्या लोकांना गुहेमध्ये कोंडून घातले. श्री ज्ञानोबारायांचे निस्सीम भक्त असणार्या श्रीगुरु हैबतबाबांनी अहोरात्र चिंतन आणि हरिपाठाचा घोष सुरू केला. योगायोगाने एकविसाव्या दिवशी भिल्ल नायकाची पत्नी प्रसृत होऊन तिला मुलगा झाला. त्या आनंदाप्रीत्यर्थ भिल्ल नायकाने गुहेवरील शिळा दूर केली तेव्हा श्रीगुरु हैबतबाबा व अन्य लोक अन्नपाण्याअभावी निश्चेष्ट पडल्याचे त्याला दिसले. त्या अवस्थेतही श्रीगुरु हैबतबाबांच्या मुखातून हरिपाठाचे अभंग उमटत होते. हे पाहून त्या भिल्ल नायकाने श्रीगुरु हैबतबाबांची पूर्ण शुश्रुषा करून त्यांची संपत्तीसह सन्मानाने मुक्तता केली. श्री ज्ञानोबारायांच्या कृपाप्रसादानेच आपला जणू पुनर्जन्म झाला या भावनेने श्रीगुरु हैबतबाबा आरफळला न जाता थेट आळंदीस आले व अखेरपर्यंत ते श्री माऊलींच्या सेवेत मग्न राहिले. रात्रभर श्री माऊलींच्या समाधीसमोर उभे राहून भजन करण्याचा परिपाठ श्रीगुरु हैबतबाबांनी अखंड जपला.
पालखी सोहळ्यास राजाश्रय असावा म्हणून श्रीगुरु हैबतबाबा यांनी श्रीमंत शिंदे सरकार यांचे दरबारी सरदार असलेले श्रीमंत अंकलीकर शितोळे सरकार यांच्याकडून घोडे, हत्ती, तंबू वगैरे लवाजमा, नैवेद्याची व्यवस्था, जरीपटका आदी सरंजाम घेतला. त्यातील हत्ती वगळता बाकीचा सारा सरंजाम आजतागायत चालू आहे. श्रीगुरु हैबतबाबा यांचा मूळ पिंड सरदार घराण्याचा असल्याने, त्यांनी वारी सुरू करताना संपूर्ण सोहळ्याला लष्कराच्या तुकडीसारखे शिस्तबद्ध स्वरूप दिले. त्यांना सहकार्य श्री. वासकर, श्री. सुभानजी शेडगे, खंडोजीबाबा वाडीकर, आजरेकर प्रभृतींचे होते. म्हणून आजही या सर्व दिंड्या त्याच प्रथेनुसार सुरू आहेत. आजही वारी सोहळ्यातील शिस्त, नियम, चालण्याचा क्रम, भजनाची पद्धत इतर प्रथा, निर्णय घेण्याची पद्धत श्रीगुरु हैबतबाबा यांनी इ.स. १८३१ पासून ज्या प्रकारे सुरू केली तशीच पाळली जाते. पुढे, १८५२ साली पंच समितीची स्थापना झाली.
*पालखी सोहळ्याचे स्वरूप*
पालखी सोहळ्यात सर्वात पुढे भोई समाज दिंडी असते. त्यानंतर श्री माऊलींचा अश्व (त्यावर श्री माऊली स्वत: आरूढ असतात, ही वारकर्यांची भावना आहे म्हणून या अश्वाच्या कपाळाला ते आदराने स्पर्श करून नमस्कार करतात). त्या पाठोपाठ श्रीमंत शितोळे सरकार यांचा, जरी पटका हाती धारणा केलेला घोडेस्वार असतो. जरीपटक्याच्या अश्वापाठोपाठ २६ दिंड्या, त्यांच्यामागे माऊलींचा रथ, त्या मागे इतर दिंड्या अशी ही रचना असते.
पालखी :
ज्ञानोबारायांच्या चांदीच्या पादुका ठेवण्यासाठी चांदीची पालखी असते. मार्गस्थ होताना तिला श्रींच्या विशेष रथात ठेवले जाते. जरीची सुंदर अबदागिरी, जरीची रंगीत छत्री, चांदीची चवरी श्रींच्या सेवेत असते. असे हे कैवल्य साम्राज्यचक्रवर्ती श्री माऊलींचे वैभव आहे. लोकांचा हा अनभिषिक्त राजा आहे. लोकप्रजा आपणहून त्याची सेवा करतात.
दिंड्या :
पालखीच्या मागे व पुढे सुमारे ४०० दिंड्या असतात. या दिंड्यांचा क्रमही श्री हैबतबाबांनी ठरवून दिल्याप्रमाणेच आजही पाळला जातो. दिंडी म्हणजे वारकर्यांचा एक विविक्षित समुदाय. त्यात विणेकरी, त्यापुढे टाळकरी व पखवाजवादक आणि सर्वात पुढे पताकाधारी असतात. श्री पंढरीनाथाला प्राणप्रिय असणारी पवित्र तुळशी आणि दिंडीतील वारक-यांची तहान भागविण्यासाठी पाण्याचा हंडा माथ्यावर घेतलेल्या महिला विणेक-यांच्या मागून चालतात.
श्री माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये रथापुढे अधिकृत २७ व रथामागे २०१ नोंदणीकृत दिंड्या आहेत. त्याखेरीज साधारण १०० दिंड्या या विनानोंदणीकृत आहेत. दिंड्यांचा अनुक्रम सेवेप्रमाणे ठरलेला असतो. नवीन दिंड्यांना सोहळ्यात प्रवेश करण्यापूर्वी पंचसमितीची परवानगी घ्यावी लागते. त्या दिंड्यांना रथामागे शेवटचा क्रमांक मिळतो. एका दिंडीत साधारण १०० ते १००० पर्यंत जनसमुदाय असतो. प्रस्थानाच्या वेळी साधारण दोन ते अडीच लाखांचा जनसमुदाय आळंदीत असतो. हाच समुदाय वाखरीपर्यंत सुमारे सात ते आठ लाखांवर जातो.
*वारीतील स्वच्छता*
कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या जागतिक साथीमुळे जगण्याची पद्धतच बदलली आहे. मात्र, स्वतःला आणि आपल्यापासून इतरांनाही या विषाणूची लागण होऊ नये, यासाठीचे काही खबरदारीचे उपाय सांगण्यात आले आहेत. WHO ने हे उपाय अवलंबण्याचा वारंवार पुनरुच्चार केलाय. वारीतील वारकरी यांनी हे उपाय अवलंबले तर तुम्ही कोरोनापासून तुमचा बचाव करू शकता.स्वतःचा बचाव कसा कराल?
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सांगितल्याप्रमाणे कोरोना व्हायरसची लागण होऊ नये, यासाठीच्या उपायांपैकी सर्वांत महत्त्वाचा आणि मूलभूत उपाय म्हणजे स्वच्छता राखणे.
वारीच्या निमित्ताने स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन यांचे प्रश्न प्रतिवर्षी निर्माण होत असत. त्यामुळे या यात्रेच्या निमित्ताने पुण्य कमविणारे वारकरी घरी जाताना मात्र आपल्यासमवेत रोग घेऊन जात असल्याचे चित्र नेहमीच पाहावयास मिळत असे. एका पावन सोहळ्याच्या माध्यमातून असे भीषण वास्तव उभे राहू नये आणि मनी निर्मळ भाव ठेवून येणारे वारकरीदेखील निर्मळ आरोग्य घेऊनच आपल्या घरी रवाना व्हावे, यासाठी स्वताच वारकरी यांनी काळजी घ्यावी.
साबण आणि पाण्याने किंवा अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझरने हात स्वच्छ आणि वारंवार धुवा. यामुळे तुमच्या हातावर असलेले विषाणू निष्क्रीय होतात.
डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळा. आपले हात बऱ्याच पृष्ठभागांना स्पर्श करत असतात. त्यातून हाताला विषाणू चिकटू शकतात. अशा हातांनी डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श केल्यास हाताला चिकटलेले विषाणू तुमच्या शरीरात जाऊ शकतात.
शिंकेतून किंवा खोकल्यातून विषाणू पसरून त्याची इतर कुणाला लागण होऊ शकते त्यासाठी शिंकताना तोंडाला रूमाल लावावा.
तसेच स्वच्छतेसाठी शौचालयाचा वापर करा, उष्टे अन्न, पत्रावळी कचरापेटीतच टाका, पुरेसे पाणी उपलब्ध होत नसेल, पुरेसा प्रकाश नसेल तर ते तेथील कर्मचार्यांच्या निदर्शनास आणून द्या,तसेच वारकरी यांनी महाराष्ट्र सरकारच्या महिला आयोगाने आषाढी आणि कार्तिकी वारी या कालावधीत महिला वारकऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता आणि सुरक्षा यांच्याविषयी नवीन निर्देश जारी केले आहेत. या निर्देशांनुसार वारी काळात दर १० ते २० कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय अन् न्हाणीघर यांची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येथे ‘सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग’ आणि ‘सॅनिटरी नॅपकिन बर्निंग’ यंत्रे उपलब्ध करुन दिली आहेत त्यांचा वापर करावा.
*वारी-काही ठळक वैशिष्ट्ये*
1) पालखी सोहळ्यात सर्वांत पुढे चालणारा श्री माऊलींचा अश्व हा श्री श्रीमंत शितोळे सरकार यांचे अंकली-बेळगाववरून श्रीक्षेत्र आळंदीस परंपरेनुसार पायीच आणला जातो. विशेष हे की या अश्वावर कोणीही मनुष्य स्वार झालेला नसतो. हा अश्व ज्येष्ठ शु॥११ ला अंकलीवरून प्रस्थान करतो आणि जेष्ठ वद्य ७ ला (पूर्ण ११ दिवस) आळंदीत प्रवेश करतो. आळंदीला इंद्रायणी नदीच्या पुलापाशी अश्व आले की श्रीमंतांचे प्रतिनिधी तसा निरोप मंदिरात सोहळ्याचे मालक व चोपदार यांना देतात. त्यानंतर श्री हैबतबाबांची दिंडी अश्वांना सामोरी जाते. अश्वांची पूजा केली जाते. त्यानंतर वाजतगाजत अश्वांना मंदिरात आणले जाते. अश्वांच्या स्वागतासाठी मंदिरात पायघड्या घातलेल्या असतात.
2) संपूर्ण सोहळ्यात श्रींची सामूहिक चार स्नाने होतात. पंढरीस जाते वेळी व परतीचे वेळी होणारे नीरा स्नान आणि श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढ एकादशी व आषाढ पौर्णिमेस होणारे श्री चंद्रभागेचे स्नान.
3) संपूर्ण वारीत सकाळच्या वेळीस फक्त दोनच ठिकाणी आरती होतात प्रथम- थोरल्या पादुका (चर्होली) आणि दुसरी पुणे येथे शिंदे छत्रीपाशी.
4) श्रीमंत शिंदे सरकार यांनी श्री माऊलींच्या मंदिर व्यवस्थेसाठी आळंदी आणि नाणज ही गावे इनाम दिली होती, श्री गुरु हैबतबाबादेखील शिंदे सरकार यांचे पदरी सरदार होते. माऊलींच्या मदिरातील महाद्वार, नगारखाना, वीणा मंडप हे श्री शिंदे सरकार यांनीच बांधले. श्रीमंत शिंदे सरकारांच्या याच सेवेचे स्मरण म्हणून त्यांचे समाधीस्थळ असलेल्या शिंदे छत्री जवळ सकाळची आरती होते.
5) वाखरी येथून पंढरीस वारी जाताना श्री माऊलींच्या पादुका रथातून उतरून घेऊन श्रीमंत शितोळे सरकार यांच्या गळ्यात दिल्या जातात.
6) वारीतील दिडयामध्ये काही वाद निर्माण झाल्यास तो वाद मालक, चोपदार, दिंडी प्रमुख, देवस्थान विश्वस्थ यांच्या सयुक्त बैठकित, श्रीमंत शितोळे सरकार यांच्या ध्वजाखाली निर्णय घेऊन सोडविण्यात येतो.
*राष्ट्रीय एकात्मतेच दर्शन*
पंढरीच्या वारीचा एक अविभाज्य घटक म्हणजे वारकरी,जात,पात,धर्म,पंथ याच्या पलिकडे विचार करणारा अर्थातचं पंढरीचा वारकरी.त्याला ठावूक असलेला एकच पंथ तो म्हणजे वारकरी आणी धर्म म्हणजे श्री अनंतकोटी ब्रम्हांडनायक पांडुरंग …जातीय तेढ ही समाजात कायम पहायला मिळते किंबहुना त्याच रुपांतर कित्येकदा दंगली पर्यंत पोहचते पण या सगळ्याला अपवाद जर काय असेल तर ते वारकरी बांधव,एकात्मता,बंधुत्व अनुभवायचं असेल तर ते नक्कीच वारीमध्ये पहायला मिळते.
पंढरीची वारी पंढरपूरपर्यंत पोहोचेपर्यंत अनेक गावांना काहीतरी देऊन जाते, काहीतरी शिकवून जाते. देहूतून निघालेले तुकोबा दरवर्षी अनगडशहा बाबांच्या दर्ग्यावर पहिला विसावा घेतात आणि वारी हा फक्त धार्मिक सोहळा न राहता, ऐक्याचा सोहळा होऊन जातो.
तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर पालखीचा पहिला मुक्काम अनगडशहा बाबांच्या दर्ग्यामध्ये झाला. अनगडशहा हे तुकोबांचे शिष्य समजले जातात. त्यांच्याच दर्ग्यामध्ये तुकोबा पंढरपूरला निघाल्यावर पहिला विसावा घेतात. गेल्या साडे तीनशे वर्षांपासून ही परंपरा आजही कायम आहे. या दर्ग्यामध्ये पालखीचा मुक्काम असताना अनेक मुस्लीम बांधवही पालखीचं दर्शन घेतात.
विठ्ठलाच्या भक्तीमध्ये धर्म, जाती याची बंधनं गळून पडतात. आणि उरतो तो फक्त भक्तीचा सोहळा. तुकाराम महाराजांचा अनगड वालीशाच्या दर्ग्यावरचा तुकोबांचा मुक्काम याचंच प्रतीक मानलं जातं.
*वारीतील शिस्त*
वारीच्या वाटचालीतील मुक्काम, विसावा, रिंगण, मालिकेप्रमाणे भजन, कीर्तन,भारुडे या
साऱ्यांचा उत्तम क्रम लावून वारीला खरोखरीच लष्करी शिस्तीचे रूप दिले.
वारीची शिस्त पाहिल्यावर लक्षात येते, की वारी म्हणजे लष्करी शिस्तीचा आध्यात्मिक आविष्कार आहे. अतीव श्रद्धा आणि त्या श्रद्धेला काटेकोर नियोजन व कार्यक्षम व्यवस्थापन यांची सक्षम जोड म्हणजे आषाढीची पायवारी. व्यवस्थापनशास्त्राचे शिक्षण देणा-या मोठमोठ्या संस्थांमध्ये प्रवेश घेऊनही व्यवस्थापनाचे जे पाठ शिकता येणार नाहीत त्यांचे मूर्तिमंत दर्शन घडते ते पालखी सोहळ्याच्या नियोजनात आणि व्यवस्थापनात. श्री क्षेत्र आळंदीपासून निघून श्री क्षेत्र पंढरीस पोहोचेपर्यंत पालखी सोहळ्यात लाखोंचा समुदाय सहभागी होतो.त्यामुळे, एक शहरच जणू फिरते आहे,फिरत्या नगरव्यवस्थापनाचे धडे वारीत गिरवायला मिळतात. एवढ्या प्रचंड संख्येने येणाऱ्या आणि
चालणाऱ्यांचे नियंत्रण, शिस्तबद्ध चलनवलन,राहणे-खाणे-निजणे या सगळ्यांची सोय, सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य, मलमूत्र विसर्जन व कचरा व्यवस्थापन, वाहतुकीचे नियंत्रण आणि पालखीच्या मुक्कामाचे संयोजन यांसारख्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टीमध्ये व्यवस्थापनशास्त्राची अक्षरश:अगणित सूत्रे दडलेली आहेत. व्यवस्थापनशास्त्राच्या अध्यापक-अभ्यासक विद्यार्थ्यांनी आवर्जून शिकावे असे वारीच्या व्यवस्थापनाचे हे ‘मॉडेल’ आहे.
अगणित दिंड्यांचा समावेश असणारा भव्य पालखी सोहळा आणि त्या सोहळ्याचे आज अनेक शतके होत आलेले स्वयंस्फूर्त, काटेकोर, शिस्तबद्ध नियोजन आणि व्यवस्थापन हा खरोखरच एक व्यापक अभ्यासाचा विषय आहे. शासनव्यवस्था, संस्थान समिती, सोहळ्याचे मालक, सर्व
मानकरी, दिंडी समाज यांच्या समविचारातून साकारणारे वारीचे संयोजन आणि व्यवस्थापन म्हणजे ‘पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप’च्या तत्त्वाचे सम्यक् दर्शनच होय.
माणसाशी रक्तापलीकडचे नेमके काय नाते आहे ते वारीतच समजू शकते. वारकरी आणि विठ्ठल यांचे नाते निखळ प्रेमाचे.
. तसं पाहिलं तर माझ्या “बा” अगोदरही मी कोणत्या“बा”ला मानत असेल तर ते म्हणजे “ज्ञानोबा, तुकोबा आणि शिवबाला”. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचे पालखी सोहळे करणे हे काम नव्हतेच ,ती तर “आनंदयात्राच” होती .
एका गोष्टीचं मला नेहमीच नवल वाटतं. कितीही लहान अथवा मोठा , शिकलेला अथवा अडाणी कोणीही असो , आपण ज्यांना भेटतो ज्याचं दर्शन घेतो तो साक्षात माणसाच्या रुपात माऊलीच. म्हणूनच समोर व्यक्ती कोणीही असो, इथं परस्परांच्या पाया पडलं जातं
अहो! एखादी सहल काढायची तर किती तयारी, विचार करावा लागतो जेवढी सहलीला येणार्यांची संख्या जास्त तेवढा तणाव अजून वाढतो. पण वारीचं तसं नाही वारी ठराविक तिथीला निघते ,आषाढीला पोहचते. कोणाला निमंत्रण नाही. वर्गणी नाही. सक्ती नाही. पण विणेकर्याच्या भोवती दिडींचा आराखडा. रांगा किती,महिला किती, महिला वारकरी कुठं, सगळं काही ठरवल्यासारखं. ‘गोपालकाल्यात’ सर्वांच्या शिदोर्या एक करतात आणि नंतर वाटून घेतात, नकळत एकमेकांची प्रांपंचिक दु:खेही वाटून घेतात खरंच वारीत मी जगायला शिकलो.जे कोणत्याही विद्यापिठात शिकायला मिळणार नाही ना. ते या वारीच्या लोकविद्यापिठात शिकायला,जगायला मिळते. व्यक्तीमत्वाचा विकास घडवणारे,जगण्याचा मुलमंत्र देणारे हे विद्यापीठ आहे.
वारी वारीत येऊन जगल्याशिवाय कळूच शकत नाही. त्यामुळे आयुष्यात एकदा तरी वारी नक्की करा.
एका गोष्टीचं मला नेहमीच नवल वाटतं. वारीत कितीही लहान अथवा मोठा , शिकलेला अथवा अडाणी कोणीही असो , आपण ज्यांना भेटतो ज्याचं दर्शन घेतो तो साक्षात माणसाच्या रुपात माऊलीच. म्हणूनच समोर व्यक्ती कोणीही असो, इथं परस्परांच्या पाया पडलं जातं.
वारीचा सोहळा हा सर्वांना समान सूत्रात बांधणारा, धर्मभेद मिटवणारा सोहळा म्हणावा लागेल .वारीच्या निमित्ताने, लक्ष लक्ष पाऊले… सुखी संसाराची तोडूनिया गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट…
वारीत कट्टरता, द्वेष, घृणा, दुसऱ्याच्या धर्माबद्दलचा तिरस्कार ,राग इथं नाही. इथं आहे सहिष्णुता, आदर, आपुलकी आणि धर्माची खरी शिकवण.अतीव श्रद्धा आणि त्या श्रद्धेला काटेकोर नियोजन व कार्यक्षम व्यवस्थापन यांची सक्षम जोड म्हणजे आषाढीची पायवारी.
वारीच्या वाटचालीतील मुक्काम, विसावा, रिंगण, मालिकेप्रमाणे भजन, कीर्तन,भारुडे या साऱ्यांचा उत्तम क्रम लावून वारीला खरोखरीच लष्करी शिस्तीचे रूप दिले.
वारीतील ऊर्जा स्थाने…
१) रिंगण
वारीला पायी जाताना येणारा थकवा जाण्यासाठी रिंगण घातली जातात.पालखीला केंद्रस्थानी ठेवून गोलाकार प्रदक्षिणा घातली जाते. रिंगणाचे बरेच प्रकार आहेत मेंढ्यांचे, विणेकऱ्यांचे, अश्वाचे, उभे खडे रिंगण व गोल रिंगण असे रिंगणाचे प्रकार आहेत.
. गोल रिंगण हा शब्दप्रयोग एकवेळ ठीक वाटत असला, तरी रिंगण उभे कसे असू शकते, असा प्रश्न काहीजण विचारतात. उभे रिंगण हे पालखी मार्गावरच केले जाते. टाळ-मृदंगाचा गजर करीत मार्गाच्या दुतर्फा वारकरी उभे राहतात व त्यामधून अश्व धावतात. अश्वाच्या काही फेऱ्या झाल्यानंतर रिंगणाचा हा सोहळा पूर्ण होतो.वारकऱ्यांचे शीण घालवणारा सोहळा म्हणजे “रिंगण”. टाळ मृदुंगाचा गजर, भगव्या पताकांची दाटी, अश्वाकडे रोखलेल्या नजरा ,अश्वांची भरधाव दौड,ग्यानबा तुकाराम, ग्यानबा तुकाराम” असं उत्साहवर्धक आणि स्फूर्तीदायी वातावर अश्वांच्या दौडीनंतर माती कपाळी लावण्यासाठी अक्षरशः झुंबड उडते. हे सगळं काही नेत्रदीपक डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. रिंगणा नंतर होणारा उड्यांचा खेळ , पावली , फुगडी हे सार पाहताना प्रत्येक जण दंग होतो. म्हातारी बाई तरूणींना लाजवेल अशी फुगडी घालते. म्हातारा टाळ वाजवत उड्या मारतो,नाचतो. या सर्वांना जर विचारलं ,की या वयात हे कसं शक्य होतं? तर सगळ्यांचं उत्तर एकच आहे की,आमचं सगळं आयुष्य आम्ही विठ्ठलाला वाहिलेलं आहे आणि तोच हे करवून घेतो.”भक्तिने भारलेला रिंगण सोहळा’पाहावा ‘याचि देही याचि डोळा’*
२)भारूड
लोकशिक्षणासाठी संतांनी भारुडांची रचना केली.तसं पाहीले तर वारकऱ्यांमध्ये भारूड अतिशय लोकप्रिय असून भजनी भारूड आणि सोंगी भारूड असे भारूडाचे दोन प्रकार आहेत.
हे दोन्ही प्रकार वारीत सादर होतात. कारण नवविधा भक्तीत संकीर्तन भक्ती ही सर्वश्रेष्ठ समजली जाते. पंढरीच्या वारीत आळंदी देहूपासून थेट पंढरपूरपर्यंत भारूडे सादर होतात.दुपारी विसाव्याच्या व मुक्काम ठिकाणी भारुडांना उधाण येते. थकलेला,भागलेला, वारकरी उत्साहने ठेका धरुन नाचायला लागतो.
पंढरीच्या वारीतील या भारूड या भक्तिनाट्यांची मोहिनी नव्या शिक्षित पिढीवरही आहे. सर्वसमावेशकता, समूहभान हे याभारुड भक्तिनाट्यांचे वैशिष्ट्ये आहे .
३)दिंडी :-
प्रत्येक दिंडीमध्ये एक वीणेकरी एक पखवाज वादक असतो. दिंडीपुढे पताकाधारी वारकरी असतो. शिवाय डोक्यावर तुळशी वृंदावन किंवा पाण्याचा हंडा घेतलेल्या महिला व टाळकरी असतात. दिंडीमागून महिला वारकरी जातात. वीणेकरी हा दिंडीचा प्रमुख असतो. तो सांगेल त्याप्रमाणे भजने, हरीपाठ इत्यादीचे गायन करत टाळ मृंदुंगाच्या तालात नाचत वारकरी पुढे जातात.
४) कीर्तन :- वारीतील किर्तने ही वारकऱ्यांना मेजवानीच असते.म्हणुन तर वारकरी संप्रदायातील कीर्तन परंपरेचे प्रवर्तक संत नामदेव महाराज म्हणतात की “नाचु किर्तनाचे रंगी..ज्ञानदिप लावु जगी यापद्धतीत इतर किर्तनासारखा पूर्वरंग, उत्तररंग, आख्यान असे काही नसते. या कीर्तनात सांप्रदायिक भजनाला प्राधान्य असते. कीर्तनात मृदुंग, टाळ, पखवाज व वीणा एवढी वाद्ये असतात. आणि देव, संत, नाममहात्म्य्,गुरुकृपा असेच विषय असतात. सुरवातीला मागे टाळकरी उभे राहून” सुंदर ते ध्यान” हा अभंग म्हणून कीर्तन सुरु करतात. मग कीर्तनकार वीणा हातात घेऊन “रुप पाहता लोचनी” हा अभंग म्हणतात. नंतर वीणा विणेकर्याकडे देऊन निरुपणासाठी निवडलेला अभंग चालीवर गातात. टाळकरी त्यांना साथ देतात. अभंगाचे निरुपण विद्वत्तापूर्ण असते. मधूनमधून नामसंकीर्तन होत असते.
५)धावा-
धावा म्हणजे धावणे. असे मानले जाते की पंढरपूरला पायी जाता असताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील छोटयाशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन झाले आणि विठ्ठलाच्या दर्शन ओढीने ते तिथून पंढरपूर पर्यंत धावत गेले. याचे स्मरण म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात.
६) प्रदक्षिणा :-
वारीला आलेला भक्त पंढरपुरातील विविध मंदिरे आणि पवित्र स्थाने याचे दर्शन घेतो तीच प्रदक्षिणा. ही दोन प्रकारची असते. छोट्या प्रदक्षिणेस ‘देव प्रदक्षिणा’ म्हणतात. भक्त महाद्वार घाटापासून सुरुवात करतो. नंतर तो पुंडलिक मंदिराकडे जातो. तेथून दत्तात्रेय, काळा मारुती ,चोपाळा यांचे दर्शन घेऊन शेवटी उद्धव घाटाची फेरी पूर्ण करतो. यात विट्ठल मंदिर व त्याच्या वर्तुळाकार टप्यातील मंदिरे असतात. मोठ्या प्रदक्षिणेला ‘नगर प्रदक्षिणा’असे म्हणतात. यासाठी भक्त आधी महाद्वार घाटापाशी चंद्रभागेत उतरतो, पुंडलिक मंदिराचे दर्शन घेतो. मग होडीतून विष्णूपद मंदिराकडे जातो. त्यानंतर नारद, अनंतपूर, गोपाळपूर, लखुबाई व अंबाबाई यांचे दर्शन करून महाद्वार घाटाकडे परत येतो.
७)‘काटवटकणा’!
नव्या पिढीला जास्त माहिती नसलेला असा हा खेळ आहे.
या खेळात बसून पायाचे अंगठे धरले जातात. व ते न सोडता पाठीच्या, कमरेच्या, पायाच्या आधाराने गोल फिरले जाते. असा काटवटकणा घालणाऱ्या महिलांना कंबरदुखी व गर्भाशयाचेविकार होत नाहीत. आणि हो हा खेळ पुरुषांसाठी देखील फायदेशीर आहे बरं! कारण यात एवढा पाठीचा व्यायाम होतो; जो कदाचित इतर कुठल्याच प्रकारात होणार नाही. या आणि अशा खेळांमुळेच या वारकऱ्यांचे आरोग्य, उतारवयातही निरोगी आणि सुदृढ राहत असावे. या खेळाची वारीत धमाल पहायला मिळते.
८) ‘फुगडी’!
महाराष्ट्रातील लोकप्रिय यात दोन व्यक्ती एकमेकांच्या हातात हात देतात आणि गोलाकार फिरतात. फुगडी बद्दल अजून एक सांगायचे आहे; यात पुढच्याचा हात घट्ट पकडून आपल्या शरीराचा भारमागे टाकत गोल फिरावं लागतं. या खेळाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर पुढच्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास ठेऊन फिरता यायला हवं. एकदा का हात सुटलानां तर…. न सांगितलेलंचं बरं! फुगडीच्या खेळातून एक फार चांगली गोष्टं शिकायला भेटली, जी दैनंदिन जीवनातही उपयोगी आहे… जर पुढची व्यक्ती तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवत असेल; तर आपणही त्या व्यक्तीवर तसाच विश्वास ठेवावा, त्याचबरोबर आपल्याकडूनही त्याचा विश्वासघात होणार नाही याचीही जाणीव ठेवावी. हे खेळ आपल्या पारंपारिक लोकनृत्याचाच एक भाग जरी असले; तरीही ते एक सर्वांगसुंदर व्यायामाचाच प्रकार आहेत. कारण या खेळांतून शरीर लवचिक बनते आणि हालचालींवर नियंत्रण मिळवता येते.ही फुगडी धमाल वारीत स्त्री-पुरुष खेळतात.वारीतील खेळ! जे मनोरंजकही आहेत आणि आरोग्याकारकही!
वारीत अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात.
वारी विषय सांगायचं झालं तर जे कोणत्याही विद्यापिठात शिकायला मिळणार नाही ना. ते या वारीच्या लोकविद्यापिठात शिकायला,जगायला मिळते. व्यक्तीमत्वाचा विकास घडवणारे,जगण्याचा मुलमंत्र देणारे हे विद्यापीठ आहे.
तसंही वारी वारीत येऊन जगल्याशिवाय कळूच शकत नाही. त्यामुळे आयुष्यात एकदा तरी वारी नक्की करा ..
“भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची| उभी पंढरी आज नादावली..
जरी बाप साऱ्या जगाचा परी तू|आम्हा लेकरांची विठू माऊली|
असं वारीतील प्रत्येक वारकऱ्यांना मनापासून वाटत हा आनंद सोहळा अवर्णनीय आहे.
लेखक : प्रसिद्ध वक्ते व संवाद तज्ञ उद्धवजी फड
महाराष्ट्र शासनाच्या प्रबोधन दिंडी प्रमुख १२ वर्षे कार्यरत.
संकलन : शाहीर उत्तम गायकर
भारत सरकार व महाराष्ट्र शासन पुरस्कृत !
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड नोंद व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरस्काराने मा. राज्यपालांच्या हस्ते सन्मानित !
सहज संपर्क : ९८५०६५४०८४